एकदा देवासमोर उभी होते मी
फुलांचा एक मोठा खच आला
हसणारी बागडणारी फुलं नुसता त्यांचा गोंधळ भला
मी पण त्यांना प्रश्न करीन म्हटले
सौंदर्य त्यांचे न्याहाळले….
कसं जमतं देवाला अर्पण व्हायला ?
फुलानेही बागडून माझ्याकडे पाहिले अन् खुदकन ते हसले
त्याच्या मनातले रितेपण माझ्या डोळ्यांनी वेचले
फुल म्हणे सारे बघता तुम्ही सौंदर्य आमचे
भेदक सत्य कोणी बघत नाही …..
अर्पण दिसते साऱ्यांना आमचे
दर्पण कोणीच आमचे नाही
झाडापासून वेगळे होताना नाळ आमचीही तुटत असते
थोडसं आयुष्य आहे याची जाण आम्हालाही असते
इतके बोलून फुलाने एक श्वास घेतला
उमललेल्या पाकळीचा अर्धा भाग कोमेजला झाला
ईश्वरशिरी असलेला सुंदर पुष्प सांगता सांगता थबकला
सौंदर्य माझे कळी पासून ते फुलापर्यंतचे आता मात्र संपत आले
प्रभाती देवाच्या भाळी चंदन कुंकवाचा आनंद लुटणारा मी
सायंकाळी माझे फक्त निर्माल्य झाले……..
सायंकाळी माझे फक्त निर्माल्य झाले …….

— रचना : सायली खांदेवाले – शेंडे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800
