१. रिटायर्ड…
ऑफीसमधून रिटायर्ड झालेले आजोबा मोबाईलवरच्या फॉरवर्ड पोस्टची मजा घेत आरामात बसले होते. तर आजी सकाळची सगळी कामं आटोपून स्वयंपाकाची तयारी म्हणून भाजी निवडत बसली होती.
तिथेच खेळणारा त्यांचा नातू आजीकडे पाहत म्हणाला, “आजी तू गं कधी रिटायर्ड होणार ?”
आजी फक्त हसली.
२. मोल पाण्याचे….
बाथटब मध्ये आंघोळ करणाऱ्या लोकांना आणि ओसंडून वाहून जाणाऱ्या पाण्याला बघताच तिने रागाने टिव्ही बंद केला.
कारण ती पायपीट करीत उन्हातान्हात कोसभर जाऊन तळ गाठलेल्या विहीरीतील पाणी वाटी वाटीने खरडून हंड्यात भरून रोज आणीत होती.
३. विचारांचा ओघ…
मोठ्या वृक्षाला बिलगलेली आणि फुला पानांनी बहरलेली वेल वृक्षाला म्हणाली, “अरे वेड्या! किती विचार करशील? मी आहे ना तुझ्या सोबतीला.”
“अगं, म्हणूनच तर काळजी वाटते. बघ ना वृक्षतोड सुरू झाली अन् विचारांचा ओघही. वृक्षावर पडणारा प्रत्येक घाव काळीज पोखरतो गं.”
४. सेल्फी….
“ए ऐक ना ! आज गाडी मी चालविणार !”
“अगं ! चालवायला काही हरकत नाही. पण तुझे ते सेल्फीचे वेड !.”
व्हायचे तेच झाले. सेल्फीच्या नादात ब्रेक ऐवजी अॅक्सीलेटरवर पाय पडला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली.
५. जादूई पोतडी…
ती वृध्दाश्रमात आली ते नाराजीनेच. वृध्दाश्रमात येणाऱ्या इतरांसारखंच तिच्यासोबतही होतं फक्त एक गाठोडं.
इतरांसाठी जरी ते गाठोडं दिसत असलं तरी त्यांच्यासाठी ती जादूई पोतडी होती. ती उघडली की सारे जमा होत आणि आपली दु:ख विसरून एकमेकांच्या आठवणीत रमून जात.

— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800