Homeलेखमाझी जीवन नौका : 1

माझी जीवन नौका : 1

अक्षरशः सागरावर संसार केलेल्या वेदवती कुलकर्णी यांची चित्त थरारक लेखमाला “माझी जीवन नौका” आज पासून दर सोमवारी प्रसिद्ध होत जाईल.
वेदवती कुलकर्णी यांना मनःपूर्वक शुभेच्छा. वाचू या, पहिला भाग…
— संपादक

माझ्या जहाजावरच्या संसाराच्या आठवणी यायला लागल्या की समुद्राच्या लाटांना भरती यावी तशा असंख्य आठवणी मनात दाटून येतात…. काही नाजूक, गोड, अवखळ, काही आश्चर्यचकित करणाऱ्या, काही व्याकुळ करणाऱ्या, काही विलक्षण योगायोगाच्या, काही जीवघेण्या, तरीही अत्यंत आनंदच्या….. चिरतरुण आठवणी !

आज ६ एप्रिल !
५ आणि ६ एप्रिल या दिवसांशी माझ्या फार खास आठवणी जोडलेल्या आहेत. माझे पती मुकुंद अनंत कुलकर्णी हे मरीन इंजिनियर. व्यापारी जहाजांवर इंजिनीयर म्हणून काम करणारे.

५ एप्रिल हा आपल्या भारतात राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण असं की ५ एप्रिल १९१९ रोजी सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या ‘एस एस लॉयल्टी’ या पहिल्या भारतीय जहाजाने मुंबईहून लंडनची पहिली यशस्वी सफार केली. इंग्लंड आणि युरोपीय देश यांची सागरी मालवाहतूक क्षेत्रातल्या जहाजांची मक्तेदारी या घटनेने मोडून काढली.
या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून ५ एप्रिल हा दिवस १९६४ पासून दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो.

योगायोगाने १९७९ साली व्यापारी जहाजांवरून जगभर फिरणाऱ्या या मरीन इंजिनीयरची आणि माझी ५ एप्रिलच्याच संध्याकाळी प्रथम भेट झाली. दोघांच्या घरच्या मोठ्या मंडळींनी ही भेट घडवून आणली. आणि….. आणि काय, पाहता क्षणी आम्ही दोघेही मनानं एकमेकांचे होऊन गेलो. ६ एप्रिलला संध्याकाळी आमचं लग्न ठरलं सुद्धा !
मुकुंद या मरीनरचं जहाज वेदवती या जेट्टीला कायमचं बांधलं जाणार यावर शिक्कामोर्तब झाला.
माझी जीवन नौका मुकुंद नावाच्या खलाशाच्या हाती सोपवून मी निर्धास्त झाले….. भाग्यवती मी त्रिभुवनी झाले !

साखरपुडा एप्रिल १९७९.

जहाजाची माझी पहिली आठवण आहे ती मात्र मी खूप लहान असतानाची. पण हे जहाज मी कधीच पाहिलं नाही. माझ्या आईची धाकटी मावशी मालवणला राहायची. मालवणचे प्रसिद्ध डॉक्टर सदानंद वझे यांची पत्नी. त्यांना तीन मुलगे होते. प्रमोद, विजय आणि डॉ शरद असे आईचे तिघे मावस भाऊ.
मी सात आठ वर्षाची असेन. विजयमामाचं लग्न ठरलं. लग्नाच्या तयारीला माझी आजी, आईची आई, मालवणला पुढे जाणार होती. तिच्याबरोबर मी पण गेले. इतरही काही नातेवाईक मंडळी ही लग्नाच्या तयारीला मालवणला आली होती. त्यांची साधारण माझ्याच वयाची असलेली मुले जमली होती.

मालवण बंदरात त्यावेळी एक मोठी बोट आली होती. ती बघायला सर्व मामालोक, आईच्या मामेबहिणी वगैरे मंडळी निघाली. त्यांच्याबरोबर वयानं माझ्या एवढेच किंवा थोडे लहानच असलेले आईचे मामेभाऊ पण निघाले. मी मुलगी म्हणून मला मात्र नेलं नाही. मला फार वाईट वाटलं. अगदी सगळ्यांचा राग आला. डोळे पुसत मी जोरात म्हटलं, “नकाच नेऊ मला. तुमच्यापेक्षा खूप मोठी बोट बघीन मी !”

कोणत्या मुहूर्तावर मी ते बोलले ते देवच जाणे. कदाचित परमेश्वर माझ्या तोंडून माझीच भविष्यवाणी वदवून घेत होता, कारण पुढे लग्न झालं ते जहाजावर काम करणाऱ्या मुकुंद या मरीन इंजिनियरशी आणि मोठमोठ्या बोटीतून, जहाजाने समुद्रावर खूप प्रवास केला. जहाजाच्या भाषेत “बहोत दरिया देखा”. अनेक समुद्रातून, महासागरातून प्रवास झाला. खूप देश पाहिले. आर्कटिक आणि अंटार्क्टिक हे खंड वगळता सर्व खंडांना भेटी झाल्या. लाखो किलोमीटर्सचा जगप्रवासच घडला…..!

त्या जलप्रवासाच्या, जगप्रवासाच्या, त्या जहाजांच्या या आठवणी !
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

50 COMMENTS

  1. खूप छान वहिनी.
    सगळे प्रसंग तसेच डोळ्यासमोर उभे राहिले.

  2. प्रज्ञा, तू छान लिहितेसच. तुझ्या लग्नाच्या दरम्यान १९७९ मधे मी तुमच्या घरी येत असे. दहावी-अकरावीतील विद्यार्थी असताना. पण तुझ्या लहानपणची मालवणची गोष्ट माहिती नव्हती. बोट पाहायला नेलं नाही या अन्यायाची भरपाई पुढील आयुष्यात खूपच भरून निघाली. आता पुढच्या वर्णनाची उत्सुकता आहे.

  3. Teacher, you’ve written this so well! I literally had a whole movie in front of me when you narrated the story!!

  4. खूपच मनोरंजक dear Pradnyatai पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे !

  5. मुकुंद चा साखर पुड्याचा फोटो वालचंद हिराचंद इंजीनियरिंग कॉलेज ची आठवण करून दिली अतीशय सुंदर प्रसंग शब्दात व्यवस्थित मांडणी केली आहे.पुढील लेखनासाठी शुभेच्छा

  6. उत्कृष्ट लिखाण तुझे सागरी प्रवासाचे अनुभव वाचायला मनापासून आवडेल

  7. हा लेख आणि त्याची सादरीकरण शैली दोन्ही अतिशय अप्रतिम आहेत! विषय मांडण्याची पद्धत खूप प्रभावी आणि मनाला भिडणारी आहे. पुढील लेख कधी येणार याची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.

  8. फार छान लेखन, पुढच्या वेळी अजून एक सुंदर वर्णन तुम्ही नक्की कराल,याची खात्री आहे. फोटो जोडल्या मूळे लेख जास्त आवडला

  9. प्रज्ञाताई तुमची जीवन नौका हा लेख वाचून खूपच आवडला तुमच्या आठवणीतल्या गुलदस्त्यातील प्रत्येक फुलाचा सुगंध घ्यायला आवडेल .

  10. सुंदर शब्दांकन… अप्रतिम भाषा शैली. पुढे पुढे वाचत राहावे असे लेखन… पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा

  11. खूप छान ओघवती भाषा आहे ताई तुमची!! पुढील भागाची आतुरतेने वाट बघते आहे. खूप छान

  12. वेदवती,
    अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा !
    सहज सोपी ओघवती भाषा आणि उत्सुकता वाढेल अशी लेखनशैली तुमची ही लेखमाला वाचकांना नक्कीच भावणारी आहे.

  13. प्रज्ञाताई, तुझा पहिला लेख/ गोष्ट वाचून पुढचे भाग वाचायची ऊत्सुकता लागुन राहिली आहे. वाट पाहतोय.

  14. प्रज्ञाताई, लेखमालिका हा साहित्य प्रकार, वाचकांशी आपला एखाद्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव कथन करण्याचा उत्तम मार्ग आहे. पुढील भागाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहेच. वाट पहातो आहे.

  15. वेदवती,
    सहज सुन्दर शब्द, ओघवती भाषा, कथा कथनासारखी कुतुहल वाटावी अशी …
    👏👏👌👍💐

  16. वेदवती, तुझा पूर्ण प्रवास वाचण्याची उत्सुकता वाढवली आहेस. लवकर लवकर पुढचे भाग येऊद्यात.

  17. खूप छान वेदवती, उत्सुकता वाढली, तुझा पूर्ण प्रवास वाचण्याची.

  18. वाचक हो,
    या लेखमालेची संधी दिल्याबद्दल प्रथमतः न्यू स्टोरी टुडे या पोर्टलचे मनःपूर्वक आभार मानते.

    माझ्या या पहिल्या लेखाला तुम्ही सर्व जो प्रतिसाद देत आहात,कौतुक करत आहात त्याने मला फार आनंद होत आहे. लिहायचा उत्साह वाढत आहे.
    पण त्याचबरोबर आपल्या हातून चांगलं लेखन होईल ना असं मनात येतं. जबाबदारी ही खूप वाढत चालली आहे असं वाटतं.
    आपणा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा व शुभाशीर्वाद मला बळ देतील याची खात्री आहे. 🌷🙏

  19. खूप छान ओघवती भाषा शैली! पुढे वाचण्यासाठी उत्कट इच्छा निर्माण झाली आहे.तुझ्या जीवनप्रवास अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे 🙏 तुला हार्दिक शुभेच्छा सखे 🙏

  20. वा वा सुरवात मस्त झालीये . पुढचे भाग पटापट येऊ देत कारण तेवढी उत्सुकता वाढवणार तुझं लेखन आहे.

  21. वेदवतीताई, खूप छान लेख. लेखमाला वाचायला उत्सुक आहे.

    • लेखाची सुरवात दमदार आणि सहज आहे लगेच कनेक्ट होते, जिव्हाळा बांधते….सुंदर…पुढच्या लेखाची वाट बघतो.

  22. छान सुरुवात!!! एका वेगळ्या विश्वाची सफर घडणार आहे. उत्सुक…

  23. My say is based on the limited knowledge I have of Marathi. Vedavati of our Mythology was meant for Vishnu. This Vedavati of ours vowed in a childlike manner to avenge the loss of chance for a voyage. Lo! she was destined to prove it prophetic. She became the Consort of Mukund, another form of Vishnu. In his Merchant Ships, she encompassed seas and oceans round the Globe and realised her challenge. May she be successful in all her endeavours in life!

    • Trimbak Dada,
      I am blessed with your comment.
      The mythological analogy of Mukund Vedvati is really amazing.
      Your sincere appreciation comes from the bottom of your heart.
      I am reminded of my Baba when I read your message.
      Words are poor vehicles to convey my feelings enough.
      Dada, thank you very much. Let your blessings be always with me.
      🌷🙏

      • Reference to my revered MAAMAA moistened my eyes for a while and brought his picture before the curtain of my mind!

  24. वेदवती, व्वा ! प्रवास लेखनाची सुरूवात खूप छान झाली आहे. पुढच्या टप्प्यावर काय असेल ह्याची उत्सुकतेने वाट बघतेय. -नीलिमा/अनुजा बर्वे.

  25. *६.४.२०२६*
    *वेदवती ताई*
    राष्ट्रीय सागरी दिन म्हणजेच 5 एप्रिल या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही तुमच्या लेखमालेला 6 एप्रिल रोजी सुरुवात करून एक सुमुहूर्त साधला.
    सागरी भाषेतच तुमची दोघांची भेट झाली याचे सुंदर वर्णन तुमच्या अनेक वाक्यातून प्रकर्षाने जाणवले तसेच तुमच्या आयुष्यातील सागराचे महत्व ही.
    तुमच्या लहानपणी तुम्हाला जहाज बघता आले नाही केवळ एक मुलगी म्हणून परंतु त्याचा वचपा तुम्ही आपला जहाजाशी निगडित असलेला सहचर निवडून काढला. पुढील आयुष्यात तुम्ही *लेखनाच्या सागरात सुखाने,लीलया सैर करत आहात*. पहिल्याच लेखमालेत तुमचे कथन केलेले अनुभव खूप भावले.
    पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहोत.
    संपूर्ण लेखमालेतून आम्ही सागराची सफर केल्याचा आनंद मिळवू याची खात्री आहे.
    लेखन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
    *डॉ. सुरेखा विवेक जोशी*

  26. सुरुवात तर छानच झाली आता उत्सुकतेने वाट बघतोय पुढील लेखाची

    • मामा
      तुझे आशीर्वाद कायम पाठीशी असू देत.
      ते माझ्यासाठी अनमोल आहेत. 🌷🙏

  27. खुपच छान लिहिलय. MTआयवा मारू अनंत सामंत नंतर जहाजावर लिहिलेले एक छान पुस्तक वाचायला मिळेल ते सुद्धा एका स्त्रीने याचा खूप आनंद होतो

  28. वाह… ही किमया तुझी छान आहे. मधाच बोट लावलेस आणि सोडून दिलास आम्हाला … बघा आता वाट पुढील सोमवारची 😄

  29. वेदवती, तुझा पहिला भाग खूपच आकर्षक झाला आहे. तुझ्या जलप्रवास आणि जगप्रवासाच्या आठवणी वाचायला खूप उत्सुक आहे.

  30. वेदवती, तुझा पहिला लेख खूपच आकर्षक झाला आहे. लहानपणी तुझ्या तोंडून खरंच भविष्यवाणीच निघाली!! तुझ्या जलप्रवास आणि जगप्रवासाच्या आठवणी वाचायला खूप उत्सुक आहे.

    खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  31. खूपच छान . पहिल्याच भागाने पुढील भाग वाचण्याची उत्सुकता वाढली आहे

  32. मरीन इंजिनियर बरोबर लग्नगाठ आणि मग फ्लॅशबॅक. लहानपणची एक आठवण.एक सुखद योगायोग. मला वाटतं, पुढे काय होणार याची ती पूर्वसूचनाच असावी.खूपच सुंदर सुरूवात. Well begun is half done.आमचाही नौका प्रवास सुरू झाला आहे.खूप छान वाटत आहे.ही लेखमाला सुरू केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.

  33. व्वा!वेदवतीताई,पहिला भाग वाचूनच उत्सुकता लागली पुढचा भाग वाचायची.

  34. प्रथम तुज पाहता असाच तुमच्या लग्नाचा योग आला. आता पुढील प्रवासाची उत्सुकता लागली आहे.

  35. खूप छान अनुभव. बोट बघण्याचं स्वप्न असं पुरं होईल असं स्वप्नातही नसेल ना वाटलं,वेदवती ताई. मस्त
    शितल काळवणकर

  36. सुंदर, उत्कंठावर्धक लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

  37. प्रज्ञाताई, सुरुवात वाचून खूपच उत्कंठा वाढली आहे छानच लिहिलयस पुढचे लेख लवकर लवकर पाठव वाचायची उत्सुकता आहे
    नितीश

  38. वेदवती ताई
    तुमचा लग्नापर्यंतचे वर्णन वाचले आता उत्सुकता पुढील अनुभवांची लागली आहे
    अनुभवांचे एक पान उलगडणार व तुमच्या अप्रतिम लेखणीतून उतरलेले वर्णन वाचण्यास डोळे अतूर आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments