‘अफसाना लिख रही हूॅं’ ‘
गेल्या काही महिन्यांपासून समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, अध्यात्मिक, पुस्तकांविषयी दर आठवड्याला लिहिल्यानंतर थोडं रूची पालट वा थोडासा शौक म्हणून चित्रपटातील गीत संगीतावरचे पुस्तक वाचावे यासाठी संगीत तज्ञ डॉ.प्रा.मृदला दाढे यांचं काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झालेलं ‘अफसाना लिख रही हूॅं’ हे पुस्तक अगदी निवडून निवांतपणे दोनदा वाचून काढले. खुप आवडले. चित्रपट गीतांच्या जुन्या आठवणी नकळत जाग्या होत गेल्या.
१९५५ ते १९७५ हा काळ चित्रपट गीतांचा सुवर्ण काळच म्हटला पाहिजे. तो एक जमाना होता, जेव्हा हिंदी चित्रपटात ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटातील काही गाणी तर कथानक पुढे नेत भार उचलत. जणू काही कथानकाचा ते गाणं एक भागच असे ! अशी गाणी रचतांना, ती संगीतबद्ध करतांना, व ती चित्रित करतांना त्यात कथेचे प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जात होतं.
३… चित्रपट संगीतातील एक चतुरस्त अभ्यासिका डॉ मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळविलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे.त्यात अनाडी, अनुराधा, बंदिनी, गाइड, सफर, अनुभव, अभिमान, रजनीगंधा, मौसम, चितचोर घरोंदा, घर, साथ साथ, आणि अलिकडच्या बाजार व इजाजत या चित्रपटांची निवड केली आहे.
या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्य स्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ.मृदला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगुडून दाखविली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता, आणि दिग्दर्शकाची दृष्टी पुस्तकात अधोरेखित केली आहे. त्यांच्या विचारांतल्या अनेक छटा, अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळतात. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील परस्पर मेळ हे ‘अफसाने’ अतिशय काव्यमय रसास्वाद लिहून वाचकाला एक निरागस आनंद देतात.याचे सारे श्रेय मृदलाजींना निश्चितपणे आहे.
या पंधरा चित्रपटातील काही गाण्यांचं स्थान कथानकाचा भाग म्हणून असायचं, कथा पुढे नेण्याच्या दृष्टीने पुढे वेगळं वळण घेणार आहे हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी किंवा ‘जर्क’ न देता सांगण्यासाठी गाण्यांचा वापर बेमालूमपणे केला गेलेला आहे.विस्तारभयापोटी काही निवडक चित्रपटातील गाणी सांगायची म्हटले तर एखादं दोन उदाहरणे देता येतील ती अशी आहेत; देव आनंद- वहिदा रेहमान यांच्या गाजलेल्या ‘गाइड’ या चित्रपटामधील सगळ्या भावभावनांचं, मानसिक उद्रेकाचं, उत्फुलतेचं प्रतिबिंब प्रेक्षकांपर्यंत पोहोचते ते शैलेंद्र यांच्या शब्दातून, सचिनदांच्या अनवट गीत रचनेतून, तसेच ते वहिदाचा (रोझी) मूड चिमटीत पकडणाऱ्या वाद्य वृंदाच्या मेळ्यातून आणि या सर्वांना न्याय देणाऱ्या लतादीदींच्या स्वरातून अर्थातच “आज जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है” या गाण्यात किंवा “पिया तो से नैना लागे” या गाण्यातही नायिकेला नृत्यांगना म्हणून यशस्वी होण्याचा प्रवास आणि चढत्या क्रमाने तिला मिळत जाणार व्यावसायिक यश हे चार कडव्यांच्या गाण्यातून किती खुबीने आणि कलात्मकरित्या सांगितलं गेलं आहे ते लक्षात येतं. याच चित्रपटातील “दिन ढल जाए, हाय रात ना जाए” हे गाणं नायक नायिका मध्ये निर्माण झालेला टोकाचा दुरावा सांगून कथानक पुढे जाते. शिक्षा भोगून नायक ज्यावेळी परत येतो त्यावेळी जायचं कुठे? त्यापेक्षा स्वतःच वाट शोधू, हा अनोळखी रस्ता कुठे नेतो ते बघू ,मनात असे विचार करता करता नायक वाट दिसेल, तिथे प्रवास करायला लागतो आणि पार्श्वभूमीला सचिनदांच्या थेट काळजात शिरणाऱ्या आर्ततापूर्ण आवाजात गाणं सुरू होतं “वहाॅं कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाॅं| दम भरले घडीभर ये छैया पाएगा कहाॅं” शैलेंद्रने लिहिलेल्या या गाण्याचे बोल नायकाची मनस्थिती सांगतात, भरकटलेली मनोवस्था दर्शवितात, आणि जीवन विषयक तत्त्वज्ञानही या मनोवस्थेला जोडत जातात.हे मृदलाजीं सरसपणे सांगून जातात.
‘अनाडी’ चित्रपटातील नायक राजकपूर व नायिका नुतन एकमेकांवर अनुरक्त झालेत, पण ‘इजहार’ कुणी, कसा, कधी करायचा ? एकांतात भेटल्यावर कितीही उसनं अवसान आणलं तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगताना नि:शब्द झालेली दोघं शेवटी ‘नजरे’तून बोलून मोकळी होतात ते गाणं “दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमे बता दे” यांचा छान रसास्वाद लेखिकेने घेतला आहे. याचं चित्रपटातील नायक जेव्हा म्हणतो की साध्या साध्या गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत सगळं शिकलो जगात, पण ही चतुराई, वागण्यातले डावपेच, समजले नाहीत, मग अडाणीच आहोत आपण.!असे जेव्हा सांगतो त्यावेळी प्रचंड दुखावलेला नायक गातो
“सब कुछ सीखा हमने,
ना सीखी,होशियारी,
सच है दुनियावालो के
हम है अनाडी”.
यावर मृदुलाजींच्याच शब्दात ‘या गाण्यात उपरोध आहे व्यथा आहे निराशा आहे, मुकेशचा आवाज एक बापूडवाना टोन घेऊनच येतो. ही निरागसता आपल्यात नसते, आसपासही पटकन दिसत नाही, पण अशी भेटली की त्या निरागसतेला कडकडून मिठी मारावीशी वाटते, पडद्यावर न पाहताही, कथा माहीत नसतांनाही हे गाणं रडवू शकतं, याहून मोठी कुठली पावती असू शकते’?
अमोल पालेकर, झरिना वहाब यांच्या प्रमुख भूमिका, बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित व रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चितचोर’ या चित्रपटातील गाण्याभोवती कथा अप्रतिमरित्या गुंफत गेली आहे.
“गोरी तेरा गाॅंव बडा प्यारा,
मै तो गया मारा,आके यहाॅं रे,
उसपर रूप तेरा सादा,
चंद्रमा जो आधा,
आधा जवाॅंरे”
या गाण्यात यशुदास यांच्या आवाजाची खोली, त्यातला घुमारा, स्वरावरचा त्यांचा ठहराव असा हा अगदी सुखद असा आवाज आहे असे लेखिकेचे मत आहे. “जब दीप जले आना, जब शाम ढले आना” या गाण्यात नायकाची नायिकेच्या घरी गाणं शिकवणं यातून साकार झालेले नातं, यमन रागात विलोभनीय रुप घेऊन येतं असंही मृदुलाजीं म्हटलं आहे.
डॉ.प्रा.मृदला दाढे यांचे विविध नियतकालिकात संगीत विषयांवर लेख येत असतात. त्या मानसशास्त्र व संगीत विषयाच्या एम.ए..असून विद्यापीठात सर्व प्रथम आलेल्या आहेत. तसेच ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयावर पीएच.डी प्राप्त केली आहे. शास्त्रीय संगीताचे व उर्दू उच्चार, गझल गायिकेचे खास शिक्षण झालेले असून त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यांचे यापूर्वी ‘रहे ना रहे’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. हे पुस्तक तर storytel या अँपवर ऑडियो बुक स्वरुपात मृदुलाजींच्या आवाजात उपलब्ध आहे.
याच पुस्तकाच्या नावावर ‘चित्रपट संगीत विषयक जाण वाढविणे’ ही एक चळवळ मृदुलाजी चालवतात आणि त्याला अनसरुन हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्ये सांगत त्यातील बारकावे उलगडून दाखवत कार्यक्रम सादर करतात . ‘अमरलता’, ‘साहिरनामा’ ‘याद ना जाये’ असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत.’अफसाना लिख रही हूॅं’ या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात त्यांच्या विचारांतल्या अनेक छटा, अनेक ‘अफसाने’ वाचकांना आढळतील म्हणून ते सर्वच वाचकांचा औत्सुक्यभंग होऊ नये म्हणून अधिक विस्ताराने लिहितं नाही. पुस्तकातच संपूर्ण वाचलेलं बरं ! संगीताचा कान असलेल्या व चित्रपटातील गाण्यांचा शौक असणाऱ्या रसिकांनी तर संपूर्णच अवश्य वाचावं, अभ्यासावं असं हे उत्तम पुस्तक आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर पुस्तक परिक्षण, श्री सुधाकर तोरणे सरांची पुस्तक परिक्षण करण्याची एक वेगळीच हातोटी आहे. संपूर्ण पुस्तकात काय आहे हे त्यांचं परिक्षण वाचून कळतं.
अप्रतिम, अभिनंदन
You are doing a great job…It shortly tells about a book
Good book review