“सोनदरा गुरुकुल”
डोंबिवली येथील सौ पुनम आणि श्री महेश खरे या सुस्थापित संवेदनशील दांपत्याने गेल्या वर्षीपासून “सोनदरा गुरुकुल” या संस्थेतच राहून संस्थेसाठी पूर्णवेळ काम सुरू केले आहे.
त्यांची प्रेरणादायी कथा यथावकाश प्रसिद्ध करीत आहोतच. दरम्यान “सोनदरा गुरुकुल” विषयी आज आपण वाचू या. संस्थेसाठी काय, कसे योगदान देता येईल याचा विचार करू या. संस्थेचे संस्थापक, विद्यमान आधारस्तंभ आणि खरे दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार…
— संपादक
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बालाघाटाच्या डोंगररांगांत, मयूर अभयारण्यालगत सोनदरा गुरुकुल वसले आहे. शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडविण्याचे काम इथे गेली ३९ वर्षे सुरू आहे.
गेल्या वर्षभरात मला काही गोष्टींची इथे भर घालता आली याचं समाधान आहे. त्यातलं एक म्हणजे रोपवाटिका. सोनदरा गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. बिया रुजवून रोपं तयार करण्यात काय गंमत असते हे मी काही उत्साही मुलांना दाखवलं. मग काय त्यांनी कामाचा धडाकाच लावला आणि शेवगा, आंबा, चिंच, शिकेकाई, रिठा, काजू अशा दोनेकशे रोपांची वाटिका तयार झाली.
आत्ता उन्हाळा सुरू झालाय. मराठवाड्यातील प्रसिद्ध ‘उष्ण’ हवेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुलं नियमितपणे पाणी देत असूनही काही रोपं कोमेजू, करपू लागली. रोप वाटिका मोठमोठ्या झाडांच्या सावलीत तयार केली असली तरी पानगळीमुळे झाडाची सावली विरळ झाली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंतचे ऊन या रोपांना बाधक ठरत होते. मग यावर उपाय झाला आणि रोपवाटिकेमध्ये १० फूट रुंद व १५ फूट लांब असे हिरवे जाळीदार कापड लावण्यात आले. लगेच रोपांचे कोमेजणे कमी झाले. आता स्प्रिंक्लरने पाणी घालण्याची व्यवस्था होणार आहे. पुढचे तीन महिने ही रोपं चांगली तग धरतील. मग पावसाळ्यात ती योग्य ठिकाणी लावली जातील. त्यांची फुलं, फळं, सावली आम्हांला आनंद देतील. सोनदऱ्याच्या हिरवाईत भर पडेल.
पण अजून काही रोपं सोनदऱ्याच्या परिसरात कोमेजत आहेत. इथल्या भौगोलिक-सामाजिक वातावरणाच्या उष्ण झळा त्यांना सुकवत आहेत. ही रोपं म्हणजे इथल्या मुलीं आहेत, त्यांच्या बद्दल बोलतोय मी…
सोनदरा गुरुकुल सुरुवातीपासून केवळ मुलांसाठी होते. इथे विद्यार्थिनींनाही शिक्षण मिळावे ही नानाजी देशमुखांची इच्छा पूर्ण करता न आल्याची खंत गुरुकुलाचे संस्थापक सुदामकाका भोंडवे यांना होती. दोन वर्षांपूर्वी एका दुर्दैवी अपघातामध्ये सुदामकाका, त्यांच्या पत्नी सिंधूमामी, सून कार्तिकीताई व नात आनंदी यांचे निधन झाले. या धक्क्यातून सावरून त्यांचा मुलगा अश्विन आणि सोनदरा गुरुकुलाचे अन्य विश्वस्त, कार्यकर्ते यांनी निर्धाराने गुरुकुलाचे वाटचाल प्रगतिपथावर सुरू ठेवली. गेल्या वर्षी गुरुकुलात ‘कार्तिकी विद्यार्थिनी योजना’ या अंतर्गत विद्यार्थिनींसाठी दिवसभराचे गुरुकुल शिक्षण सुरू करण्यात आले. यात शिक्षणाच्या जोडीने सकाळी न्याहारी, दुपारी भोजन, संध्याकाळी खाऊ, भरपूर खेळ व पोहणे, संगणक प्रशिक्षण इ.चा समावेश आहे. मुलींना नेण्या-आणण्यासाठी वाहनव्यवस्था केली आहे. या सर्वांसाठी शुल्क अतिशय माफक म्हणजे प्रतिवर्षी रु. १८,०००/- इतके आहे.

असे असले तरी पहिल्या वर्षी केवळ १२ मुली गुरुकुलात दाखल झाल्या. गेल्या वर्षभरातील त्यांची प्रगती, त्या विविध उपक्रमात घेत असलेला आनंद बघताना खूप समाधान वाटत असलं तरी अशा अनेक विद्यार्थिनी परिसरात असूनही त्या या आनंदाला केवळ परिस्थितीमुळे मुकत आहेत ही जाणीव मनाला टोचत राहते आहे. अर्थात ज्यांना हे शुल्कही भरणे शक्य नसते अशांना गुरुकुलात सवलत दिली जाते. देणगीदार मिळाले तर पूर्ण शुल्कही माफ केले जाते. यंदा अधिक मुली गुरुकुलात प्रवेश घ्यायला उत्सुक असतील. पण त्यांची परिस्थिती त्यांच्या पावलात बेड्या घालून त्यांना अडवेल. अशावेळी कुणा सुजाण, संवेदनशील व्यक्तीचे एक सत्कृत्य त्यांच्या पायातील या बेड्या तोडेल.

अशा सत्कृत्याला निमित्त कोणतेही जोडता येईल… स्वतःच्या मुलीचे वा मुलाचे शिक्षण घेताना/झाल्यावर आणखी एका गरजू मुलीला आधार देणे असेल, आपल्या घरातील मंगल कार्यामध्ये हौसेने खर्च करताना टाकलेले एक सामाजिक बांधिलकीचे पाऊल असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिलेली देणगी असेल, स्वतःचा/कुटुंबियाचा वाढदिवस असेल, एका चांगल्या कामाने केलेली नववर्षाची सुरुवात असेल किंवा उद्याची सायना-सिंधू, सुनीता विल्यम्स घडवण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असेल ! कोणत्या का निमित्ताने होईना,
ही कोमेजणारी रोपं तरारतील, बहरतील. मोठी होऊन आपल्या फळाफुलांनी, सावलीने एक कुटुंब, समाज, देशाला आनंद देतील. आपली ओंजळ त्यांच्यासाठी उघडूया.
कृपया खालील तपशिलांचा आधार घेऊन आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या देणगीला ८० जी सवलत मिळू शकेल. कृपया देणगी दिल्याचे सोबतच्या फोनवर आवर्जून कळवा. तसेच आपले पूर्ण नाव, पिनकोडसह पत्ता, फोन नंबर, इमेल, पॅन नंबर, जन्मतारीख आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चा उल्लेख आमच्या नोंदीसाठी व पावतीसाठी कळवा. ऑनलाईन देणगी दिल्यास स्क्रिनशॉट व तपशीलही नक्की पाठवा. आपल्याला गुप्तदान द्यायचे असेल वा कर सवलत नको असली तरी शासकीय नियमांप्रमाणे पावती करणे संस्थेसाठी अनिवार्य आहे.
संस्थेचा पत्ता :
दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुल, डोमरी,
ता. पाटोदा, जिल्हा बीड 414204
संपर्क : 7035707033
निधी देण्यासाठी तपशील :
Account Name : Deendayal Navarachana Pratishthan
Account No. : 36894281349
IFSC Code : SBIN0011509
Bank Name : State Bank of India
Branch : Shivaji Chowk, Patoda
UPI ID : 7588069571@sbi
परदेशातून देणगी देण्यासाठी तपशील
Account No : 40096323668 (FCRA Current Account)
Account Open Date : 24/03/2021
Branch Code : 00691
IFSC : SBIN0000691
SWIFT : SBININBB104
Address : FCRA Cell, 4th Floor, State Bank of India, New Delhi Main Branch, 11, Sansad Marg, New Delhi – 110001
अधिक माहितीसाठी वेबसाइट – https://sondara.in/
फेसबुक पेज –
https://www.facebook.com/sondara.beed?mibextid=ZbWKwL
अधिक माहिती साठी:
सौ. पूनम खरे (९८६९१२९३०४)
महेश खरे (९३२०३०४०५९)

— लेखन : महेश खरे.
— समन्वय : सुनीता नाशिककर.
निवृत्त पोलिस उप अधीक्षक, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
.