Homeलेखखिडकी : 11

खिडकी : 11

“गणपती बाप्पा मोरया !”

आज खिडकीतून बाहेर डोकावताना गणपती उत्सवाचे आत्ताचे स्वरूप आणि आमच्या बालपणी असलेले स्वरूप यातील फरक प्रकर्षाने जाणवतो. केवळ गणेशोत्सवच नाही तर आज कुठल्याही सण-समारंभाची इव्हेंट करण्याची पद्धत झालेली आहे. करायचे ते अगदी भव्य दिव्य आणि त्यातही ते डी.जे आणि लेझर लाइट्स हा प्रकार नेमका कुठून आला, कसा अंगवळणी पडला ते समजलेच नाही.

एक काळ होता जेव्हा दीड-दोन महिन्यांआधी गणपतीच्या मूर्तींची दुकान सुरू व्हायची आणि आम्ही मुलं शाळेत जाता येता ती दुकान कौतुकाने बघायचो. बरेचदा तर बाबा थेट मूर्ती घेऊन यायचे. आताच्या या पिढीला आश्चर्य वाटेल, पण मूर्ती बुक करणे मग ती अदल्या रात्री वाजत गाजत ढोल ताशे बडवत आणणे वगैरे हे आत्ता दहा-बारा वर्षांपूर्वी सुरू झालेले प्रकार आहेत. आधी दुकानातील आवडलेली मूर्ती कागदात गुंडाळून पिशवीत घालून घरी आणली जायची आणि कपाटात ठेवून दिली जायची. मग गणेश चतुर्थीच्या दिवशी रीतसर तिची पाटावर बसवून प्राणप्रतिष्ठापना केली जायची.

आजही विदर्भात बरेच घरांमध्ये अगदी साधेपणाने देवघरातच एक छोटी मूर्ती आणून बसवली जाते. मुंबई-पुणे यासारख्या शहरात, हल्ली इतक्यात, या सणाचा नवीनच पॅटर्न आलेला आहे. म्हणजे दुकानातून मूर्ती घरी नेतानाच ते अगदी पाट, पूजेचे ताट, घेऊन तिथे दुकानात जातात. त्या मूर्तीवर तिथेच हळद-कुंकू अक्षत वाहून, हार, फुले, अगरबत्ती, लावून पूजा करून मग मूर्ती त्या पाटासकट घेऊन जातात. आता मला सांगा, चतुर्थी आधीच आणि भलत्याच ठिकाणी, भलत्याच वेळेला, अशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करून मग घरी नेणे, तेही ढोलताशे बडवित, यात काय लॉजिक आहे, देव जाणे ! अशीच काहीशी अवस्था सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची देखील आहे. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागे लोकमान्यांचा जो उद्देश होता तो आज या मंडळांच्या लक्षात तरी आहे की नाही हे देव जाणे ! कारण या मंडळांचे काहीतरी भलते सुरू असते. लालबागचा राजा मंडळापुढे तर हातच जोडावे. त्यांनी तर मूर्तीचे पाय बनले की त्याची पाद्यपूजा नावाचा इव्हेंट तयार केला आहे. हे कुठले शास्त्र आहे? लोकांची, या मंडळाची आणि अशा अजब नवीन प्रथांचा प्रचार आणि प्रसार, करणाऱ्या मीडियाची कमाल वाटते. चतुर्थीला दोन-तीन दिवस अवकाश असतानाच लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन, मुखदर्शन आणि काय-काय खेळ मांडले जातात. कमाल वाटते आणि लोक देखील मूर्खासारखे रांगेत उभे राहून या सर्व माकडचाळ्यांना प्रोत्साहन देतात याचे खरे आश्चर्य वाटते.

लोकमान्यांनी ज्या जनजागृतीसाठी गणेशोत्सव हा घरातून समाजात आणला, त्याला सार्वजनिक रूप दिलं, त्याच सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुकीच्या वेळी मारामाऱ्या होताना बघून वाईट वाटतं. प्रत्येक गल्लीत त्या-त्या गल्लीचा राजा म्हणून गणपती बाप्पाचा उल्लेख केला जातो. प्रत्येक मंडळ एकमेकांशी स्पर्धा करण्यातच धन्यता मानतो. सामाजिक एकतेसाठी म्हणून सुरू केलेल्या केलेला हा उत्सव त्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.

लहानपणी डोंबिवलीला सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये एक वेगळी स्पर्धा असायची. आमच्या इथे गोपी टॉकीजचा गणपती आणि नवापाड्याचा गणपती, या दोघांचे डेकोरेशन म्हणजेच देखावे एकापेक्षा एक असायचे. दीड-दोन महिने आधीपासून ही दोन्ही मंडळे मंडप तयार करून त्यात डेकोरेशनचे काम सुरू करायचे. आम्ही शाळेतून येता-जातांना त्या मंडपाचा कापड बाजूला करून आत काय सुरू आहे हे बघायचो, मजा यायची त्यावेळी. मंडळाचे कार्यकर्ते आत वेगवेगळे पुतळे किंवा इतर काही काम करताना दिसायचे. आम्ही मुलं आत वाकून बघतोय म्हटल्यावर, ‘काय रे झाली का शाळा’ ‘कुठे राहता ?’ वगैरे चौकशी केली जायची. कधी ते नाश्ता करत असतील तर त्यांच्यातील भजे किंवा वडापाव आम्हाला मिळत असे. त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते कुणावर खेकसत नसत किंवा वायफळ शिवीगाळ त्यावेळी ऐकू यायची नाही. अगदी रात्री देखील मंडपात काम करताना चहा, वडापाव अशा पार्ट्या असायच्या. त्या तरुणांबरोबरच महिला व लहान मुले देखील बिनधास्त जागरण करताना दिसायचे. एक निखळ संवाद व वेगळेच वातावरण तेव्हा असायचे.

गणेशोत्सव काळात रिल्स किंवा बेसुमार कॅमेरे नसायचे. प्रत्येक जण सर्व देखावा केवळ डोळ्यात आणि मनात साठवून निघायचा. मला अजूनही आठवतं, गोपी टॉकीज, नवा पडा, या गणपतीच्या देखाव्यासाठी दोन-दोन तास रांग लागायची. कारण हा देखावा म्हणजे दहा-पंधरा मिनिटांचा एक खेळ असायचा. ज्यात एखादी पौराणिक कथा, पुतळे आणि लाइटिंग च्या माध्यमातून छान देखाव्याच्या रूपात सादर केली जायची. एका वेळी पन्नास एक लोकांचा समूह मंडपात घेऊन मग लाईट बंद करून एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा देखावा दाखवला जायचा. तेव्हा त्या देखाव्याला, त्या दर्शनाला महत्त्व असायचे. तेव्हा कोण किती दान टाकतोय, किती पैसे मोजतोय, कोणत्या गणपतीला कोण सेलिब्रेटी येतोय, याला महत्त्व नसायचे. सर्वसामान्य भक्त कुठे जास्त ते मंडळ मोठे असा सोपा हिशोब त्यावेळी होता.

विसर्जनही अगदी असेच असायचे. दुपारनंतर एका रांगेत गणपती खाडीवर जायचे, रात्री दहापर्यंत सर्व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झालेले असायचे. आज मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. काही ठराविक गणपती हे स्टार झालेले आहेत. सर्वसामान्य भक्तांपेक्षा सेलिब्रिटींना महत्त्व आलेले आहे. गणपती पेक्षा त्या ठिकाणी जाऊन रील बनवण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. लोकांची भाषा बदललेली आहे. समोर कोण आहे याची तमा न बाळगता सर्रास शिवीगाळ केली जाते. गणेश चतुर्थी काय किंवा अनंत चतुर्दशी काय, त्या तिथीला काहीच महत्त्व नाही. विसर्जनाची मिरवणूक जितकी लांबवता येईल तितकी लांबवली जाते. मुंबईत तर चक्क दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत विसर्जन कार्यक्रम चालतो, याला काय म्हणावे !

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आश्चर्य आहे ते अशा प्रकारच्या व्यवस्थेला जन्म देणाऱ्या सामान्य लोकांचे. का अशा ठिकाणी गर्दी करून आपण याचे महत्त्व वाढवतो? तिथे होणारा अपमान आपल्या जिव्हारी लागत नाही इतके आपण बधिर झालो आहोत का ? माझ्या परिचयातील एक व्यक्ती चक्क दोन दिवस लालबागच्या राजाच्या रांगेत उभी होती आणि दर्शन घेताना काही सेकंदात त्याला गणपतीच्या मंडपातून हकलून लावले. बाहेर आल्यावर त्याने प्रसादाचे लाडू देखील पाचशे रुपयांना विकत घेतले. हे सर्व वर्णन तो कौतुकाने सांगत होता, आणि मी त्याच्याकडे बघत होतो…
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments