वेळ अगदी छान गेला !
आमच्या सोसायटीत एन्ट्रन्सपाशी मोठे कट्टे आहेत. म्हातारी कोतारी मंडळी नेहमीच तेथे येऊन बसतात. मध्यम वयाचीसुद्धा असतात, त्यांची मुले आवारात खेळत असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष राहावे हा उद्देश असतो त्यांचा. अनायासे छोटी मीटिंगच होऊन जाते तेथे असं म्हणा.
कट्ट्यावर येणाऱ्यात अण्णा सर्वात म्हातारे. ऐंशी ओलांडलेले पण सर्वात तरुण वाटतील इतके उत्साही ! संध्याकाळची फेरी तर त्यांची कधीच चुकत नाही. सर्वांच्या आधी येऊन बसतात आणि रोज ठरलेली वाक्ये त्यांच्या तोंडून आपसूक बाहेर पडतात, “आपली सोसायटी बघा, मोठं आवार, ही पसरलेली झाडं, हे ऐसपैस कट्टे ! पार्किंगसाठी मोकळी जागा. असं शक्य आहे कुठे ? शोधून सुद्धा सापडणार नाही !”
त्यांची ही रोजची प्रार्थना असावी जणू. मोकळ्या जागेचा त्यांचा आनंद घेणं, तो रोज दिलखुलास व्यक्त करणं मला कौतुकाचं वाटतं. नेहमीच वाटतं, असा आनंद घेणं हेच असावं त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य !

“अण्णा आपली सोसायटी जुनी आहे म्हणून, रीडेव्हलोपमेंट साठी जाईल तेव्हा बघा आवार गायब होईल. बंदिस्त जिमखाना असेल. “वझेकाकांचा शेरा. अण्णांची ‘प्रार्थना’ जशी रोज तसे कुणीतरी हे म्हणतेच.
वझेकाका नसतील, तर पाच वर्षांपूर्वी राहायला आलेले सोमाणी हे वाक्य म्हणतात. रीडेव्हलोपमेंट हा विषय सोमाणीना आवडतो. रीडेव्हलपमेंटचं मनात ठेऊनच इथे फ्लॅट घेतला त्यांनी.
आम्हीही संध्याकाळचे फिरून आल्यावर कट्ट्यावर बसतो खूपदा. मग वझेकाकांचे वाक्य मी म्हणते किंवा माझे मिस्टर म्हणतात. पण त्या आधी ती ‘प्रार्थना‘ असतेच अण्णांची ! आम्ही सगळेच हे बोलत असतो त्यात, नंतर ही मोकळी जागा नसेल ह्याचे वाईट वाटते. आपल्या नंतर पुढच्या पिढीला अंगण, आवार, हुंदडायला जागा नसेल ही खंत असते. विकास म्हणजे मातीचा वासच नष्ट होणे जणू ! ही हळहळ असते.
“पुढचं कोणी पाहिलंय ? मी नसेन तेव्हा जिवंत ! तुम्ही काय तो घाला गोंधळ !“ ख्या ख्या ख्या करून अण्णा हसतात.
“तुम्ही काय तो घाला गोंधळ म्हणजे ? यांनासुद्धा मुलं नातवंडं आहेत ना ? पुढच्या पिढीसाठी जीव तुटत नाही !“ मी असे पुटपुटले की मिस्टर म्हणतात,
“मुळात आत्मकेंद्री आहे गं, म्हातारा ! स्वतःचा आनंद शोधतो. शिवाय आपल्याला उगीच उचकवतो“
आजूबाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. आमची इमारत दिसतेच आहे ओढगस्तीला आलेल्या गरीब म्हातारीसारखी.
“माझा वृद्धाश्रम आहे हा ! मी आहे तोपर्यंत रीडेव्हलोपमेंटसाठी हा टॉवर जाणार नाही ..”
अण्णा बजावतात. सात मजली इमारतीला टॉवर म्हटलं की तरुण मुलं खिदीखिदी हसतात. अण्णा हे जाणून आहेत.
“ ह्या एरियातला पहिला टॉवर हा. लिफ्टवाली पहिली इमारत ! ” त्यांचा अभिमान ओसंडून वहातो.
‘चाळीस एक वर्षांपूर्वीचे‘ काही अण्णा सांगायला लागले की सगळे बाकावरून उठायला लागतात. जणू ते समारोपाचे शब्द.
आधीची प्रार्थना आणि समारोप त्यातले त्यात जास्त सहन करतात, सोमाणीच.
रीडेव्हलोपमेंट सोडून बाकी सगळ्यांत अण्णा उत्साही असतात. गप्पा, उपदेश, सल्ले ! कोणी आजारी असेल तर भेटायला नक्की जाणार. सोसायटीतले किंवा नात्यातले कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यास हातात काठी घेऊन रिक्षा करून हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात. त्यांना स्वतःला अजून बी.पी. किंवा शुगरची गोळी मागे लागलेली नाही हे ते अभिमानाने त्या पेशंटला आवर्जून सांगतात. हे सांगण्याची काय गरज देव जाणे.
मग दुसऱ्या दिवशी कट्ट्यावर हॉस्पिटलचे वर्णन ! तिथली व्यवस्था, दर्शनी भाग, सोयी सुविधा ! अगदी इत्थंभूत माहिती. सगळी हॉस्पिटलं पालथी घातली आहेत त्यांनी.
“तिथे स्वतःची टिमकी वाजवून येतात अण्णा. कित्येकदा त्यांनी स्वतःचा फिटनेस संगितल्यावर पेशंट उदासच होतो. मुळात पेशंटच्या आस्थेवाईक चौकशीचा भाग कमी आणि त्यांच्या विरंगुळ्याचा अधिक असतो. खूपशा हॉस्पिटलमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ किंवा फळे आणण्याची बंदी असते. त्यामुळे रिक्षाचा काय असेल तो खर्च. स्वस्तात त्यांचा जीव रमतो“
अशी माझ्या मिस्टरांची मल्लिनाथी असते त्यावर !
“तुम्ही जाता का लगेच कोणाला असे भेटायला ? रमवू देत त्यांचा जीव.“
विरंगुळा म्हणजे काय ? मन रमवणे. अण्णांना कमी श्रमात, कमी पैशात विरंगुळा हवा असतो. तो मिळतो. चवीनं चघळून तो पुरवायचा. विरंगुळा शोधण्याची अण्णांची नजर आहे. त्याची गंमत मात्र वाटते.
ती नजर दिसेल, अधिक समजेल असा एक किस्सा एकदा माझ्या बाबतीत घडला. तर असं की आमच्या लिफ्टमध्ये मी अडकले. ह्या इमारतीची, अहं, ह्या टॉवरची ही तिसऱ्यांदा बसवलेली लिफ्ट आहे ! जाळीची खाडकन् उघडणारी लिफ्ट होती आधी. हाताने ऑपरेट करावी लागायची. ती पार बिघडली. दुसरी तशीच नविन आणून बसवली होती.
ती पण जुनी झाली आता. सात आठ वर्षांपूर्वी अॅटोमॅटिक डोअरवाली लिफ्ट बसवली. बंदिस्त. मला तर ते गॅस चेंबर वाटायचे सुरुवातीला ! दरवाजा उघडण्याचा त्रास नसल्याने हातात जड सामान असले तरी, सोपे जाते हा शोध तिच्यामुळे लागला. मग ते आवडू लागले.
मी अडकले आणि गॅस चेंबरची पुन्हा आठवण आली खरी. लिफ्ट बंद पडली. दरवाजा उघडेना. बझर वाजेना. फॅन बंद. कोणत्या मजल्यावर अडकले आहे ते पण कळेना. शून्य ते सात बझरसकट सगळे दिवे नुसते चमकत होते. पण ते जिवंत नव्हते. इंटरकॉमवर घरात कळवले की मी अडकले आहे.
थोड्याच वेळात अख्खं पब्लिक जमा झालं. बाहेर नुसता गलका ! अण्णांनी खुर्ची मागवून घेतली. आणि बंद पडलेल्या दरवाजासमोर ठिय्या देऊन बसले.
“दरवाजा उघडण्याची चावी असते आई, घाबरू नकोस” आमचे चिरंजीव.
“अलाईनमेंट गेली आहे वहिनी, चावी काम करणार नाही” वझेकाका.
“लगेच गुदमरून मरून जायला होत नाही. भीतीने गाळण उडाली असेल तुझी.” मिस्टर.
“डरिये मत ! भाभीजी, मेकॅनिक आयेगा.“
“वेळ लागेल. काकू खाली बसून घ्या ..”
“रेंज असेल तर रील बघ गं, आई !” आमची कन्यका. सकारात्मकतेची साक्षात मूर्ती !
“कपडे धुता येतात, किंवा ड्राय क्लीनला दे हवं तर. पण खाली बसून घे गं.. ”ही स्वप्ना ! माझी सख्खी शेजारीण. सफोकेट होण्यापेक्षा मी कपड्यांची चिंता करेन हे तिला बरोब्बर ठाऊक.
“बझर कसा वाजला नाही ?”
“हवाय कशाला बझर ? मदतीला बोलवायला ना ? आले की सगळे ! बझरमुळे काय दरवाजा उघडतो का !”
दरवाजा आणि मजल्यावरचा लिफ्टमध्ये जाण्यासाठी असलेला ‘उंबरठा’ म्हणूया, जो असतो हे दोन्ही एका लेव्हलमध्ये नव्हते. बिघडली होती पार लिफ्ट. अलाईनमेंट गेली होती. चावीचा उपयोग होत नव्हता. मेकॅनिक यायला अर्जंट म्हटलं तरी तास लागला.
मेकॅनिकने सांगितलं, “लिफ्टची पुली गेलीय.“
“अशी कशी गेली ?“
“ए. एम. सी. करून काय फायदा ?”
“रात्री बेरात्री असं झालं तर, बाई गं !”
“घाबरून मरतात हो माणसं, गुदमरण्याआधी !”
“भयानकच हे !”
शेवटी मेकॅनिकने करामत केली आणि मी बाहेर आले एकदाची. संपला एपिसोड !
समोर खुर्चीवर बसलेले अण्णा बघून मला हसायलाच आलं.
लिफ्ट तात्पुरती दुरुस्त झाली. पुली उद्या आणण्याचा वादा करून मेकॅनिक निघाला. लाटकरकाकूनी प्रसंगावधान राखून माझ्यासाठी शहाळ्याचं पाणी आणून ठेवलं होतं !
इतका वेळ शांत बसलेले अण्णा समाधानाने म्हणाले,
”पण वेळ अगदी छान गेला.”
मी थक्क. ही काय व्हरायटी एंटरटेनमेंट होती ? खुर्चीवर एवढा वेळ चिकटून बसलेले ते, एंटरटेनमेंट संपल्याने उठले. उभे राहात म्हणाले, “एकीकडे गुगलवर सर्च केलं मी. लिफ्टमध्ये अडकण्याचे रेकॉर्ड एक्केचाळीस तासांचे आहे !”
कोणाच्याही, कोणत्याही प्रसंगातून आनंद घेणं हेच असावं अण्णांच्या दीर्घायुष्याचं रहस्य !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
