नाना पाटेकर आणि छत्रपती संभाजीनगर यांचे आगळे वेगळे नाते होते. “पुरुष” या त्यांच्या गाजलेल्या या शहरातील नाट्यप्रयोगाच्या वेळी त्यांच्या भूमिकेने संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने थेट पायातली चप्पल काढून त्यांच्यावर भिरकावली होती. ही नानाच्या अभिनयाला दिल्या गेलेली बहुधा सर्वोत्कृष्ट दाद असावी. हा प्रसंग नाना पाटेकर अनेक ठिकाणच्या त्यांच्या भाषणांमध्ये आवर्जून सांगत.

त्याकाळी छत्रपती संभाजीनगर मध्ये श्री सुरेशजी देशपांडे उर्फ बापू हे नाटकांचे प्रयोग लावत असत. कुंभारवाड्याच्या एका जुन्या वाड्यातील त्यांच्या छोट्याशा कार्यालयात सुरेश बापू मुळे माझी आणि नानाची भेट झाली. भरपूर गप्पागोष्टी झाल्या. त्याकाळी नाट्यप्रयोग करण्यासाठी संभाजीनगरमध्ये येणारे कलावंत यांच्या उतरण्याची व्यवस्था मुख्य टपाल कार्यालय शेजारच्या गीतांजली हॉटेल नामक एका जुन्या लॉजवर केली जाई. कारण तिथून नाट्यगृह जवळ होते. या गीतांजली लॉज चे मालक श्री नागोरी हे नाट्य कलावंतांना अत्यंत उत्तम सेवा देत. नानाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या खोलीवर भेटायला बोलावले. दिलेल्या वेळेवर मी गेलो तेव्हा खोलीचे दार बंद होते. बाहेर श्री चंद्रकांत गोखले बसले होते. मला ते म्हणाले, नाना बहुधा आत मध्ये व्यायाम करीत असावा. तोपर्यंत तू माझ्याशी गप्पा करू शकतोस. त्यामुळे त्यांच्यासारख्या पितृतुल्य व्यक्तिमत्वाशी माझी खूप बातचीत झाली.
नाना पाटेकरांनी त्यांच्या व्यायामानंतर खोलीचे दार उघडले. तेव्हा महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती, जातीव्यवस्था, विविध सामाजिक आंदोलने, संभाजीनगर मधील सांस्कृतिक चळवळी इत्यादीवर त्यांनी माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
नाना पाटेकरांना मी त्यापूर्वीही मुंबईत अनेकदा भेटलेलो होतो त्यामुळे ते नि:संकोच पणे माझ्याशी बोलत. नाना पाटेकरांच्या स्वभावाबद्दल विशेषतः त्यांचा हेकट, शीघ्रकोपीपणा याबद्दल हिंदी चित्रपट सृष्टीत एका अर्थी खूप दहशतही होती. परंतु कामाच्या बाबतीत नानाला पर्याय नाही हे मराठी, हिंदी सह एकूणच कलासृष्टीने मनापासून मान्य केलेले होते.
भालू या मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही मिरज या शहरी गेलो होतो तेव्हा नाना पाटेकर वरीलच काही दृश्य दिग्दर्शक राजदत्त तिथे चित्रित करीत होते. तेव्हाही नाना सोबत भरपूर गप्पा करण्याच्या योग मला आला.
कलाक्षेत्राप्रमाणेच सामाजिक संदर्भातही नानाचे योगदान मोठे आहे. त्याच्या निरपेक्षपणे केल्या जाणाऱ्या नाम फाउंडेशन या संस्थेचे कार्य मराठवाड्यातील ग्रामीण भाग, दुष्काळग्रस्त भाग कधीही विसरू शकणार नाही. नानाच्या स्मृतीस माझी भावपूर्ण श्रद्धांजली !

— लेखन : सुधीर सेवेकर. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
