Homeसाहित्यपाऊस : 2 कविता

पाऊस : 2 कविता

1) सृष्टी बहरली

आला पहिला पाऊस
वनराई शृंगारली
मोतियाच्या शिंपणान
सृष्टी कशी बहरली |१|

दिन रात वाट पाही
देव घालती पाण्यात
होई जीवाची काहिली
डोळे वाट पाहण्यात |२|

पावसाच्या अभावाने
जीव होई वर खाली
छाती धडधड करी
आळविण्या सारी आली |३|

पाणी जपून वापरा
देती सर्वत्र इशारा
जल संचय थोडासा
नेता देई गोषवारा |४|

वरुणाची कृपा दृष्टी
आला पाऊस उशिरा
येता सुखावली सारी
धावू लागला फकिरा |५|

जेथे तेथे तळे साचे
गाड्या अडकल्या रस्ती
पावसाच्या साफल्याची
फाडू लागली पावती |६|

– रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई

2) चला, पेरणी करू या…

काल आमच्या गावी गड्या
मेघ राजा बरसला
काय सांगू तुम्हाले
शेतकरी खूप सुखावला !१!

लय वाट पाहून पाहून
परेशान होता बिचारा
आता कुठं त्याच्या मनाले
थोडा धीर आला खरा !२!

लगबग सुरू झाली आता जुळवाजुळव करण्याची तिफण-डवरे तासून तुसुन

तयारी करतोय पेरणीची !३!

ज्यांच्या घरी बैलं नाही
त्यांची मोठी पंचाईत
काय करावे कळेना
सगळेच आहे घाईत !४!

जमाना आला ट्रॅक्टरचा
आधुनिक शेती करण्याचा
कळते पण वळत नाही
हाच प्रश्न शेतकरी राजाचा !५!

सवायी-दिडीने कर्ज घेऊन
बेगमी केली पेरणीची
मुलीचेही हात पिवळे केले
हीच गरज होती त्याची !६!

आडातच नाही तर
पोह-यात कसे येणार?
शेतकऱ्यांचे मुळ प्रश्न
कोण समजून घेणार? !७!

पुढे मागे काही होवो
पुढच्या पुढे पाहू
मनसोक्त पाऊस पडला ना
चला तर पेरणी करू !८!

चला तर पेरणी करू !

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments