Homeसाहित्यभूतान सावरकर संमेलन : अध्यक्षीय भाषण

भूतान सावरकर संमेलन : अध्यक्षीय भाषण

भूतान मध्ये नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री सुधीर सेवेकर यांच्या भाषणाचा सारांश…
— संपादक

“सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार अंगीकारणे ही काळाची गरज”

नमस्कार मंडळी.
प्रारंभीच मी इतक्या महत्त्वपूर्ण संमेलनाचे अध्यक्षपद मला भूषविण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि विषयाकडे वळतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व बहुपेडी होते. आपल्या प्रेरणादायी भाषणातून करोडो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे आणि देशप्रेमाचे फुल्लिंग जागविणारे म्हणून आपण त्यांना ओळखतो. तद्वतच एक प्रतिभाषाली कवी, नाटककार, कादंबरीकार, स्फूर्ती गीतकार म्हणूनही त्यांचे साहित्य लोकप्रिय आहे. हजारो छापील पृष्ठे भरतील इतक्या त्यांच्या साहित्यात राष्ट्राच्या आणि मानवाच्या स्वातंत्र्याचे चिंतन आढळते. त्यापैकी विज्ञाननिष्ठ सावरकर हा विषय मी आज याप्रसंगी चर्चेणार आहे.
त्याची प्रामुख्याने जी कारणे आहेत ती अशी: दिवसेंदिवस भारतीय समाजातील विज्ञाननिष्ठता क्षीण होत चाललेली आहे असे अनुभवाला येते. आणि म्हणून सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांची उजळणी करणे भाग आहे. आज कधी नव्हे एवढा भोंदू बाबा, बुवा यांचा सुळसुळाट समाजामध्ये आढळतो. या भोंदू बाबांना केवळ अडाणी आणि अल्पशिक्षित लोकच बळी पडतात असे नव्हे तर उच्च शिक्षित लोक, राजकीय नेते, उच्च पदस्थ लोक हेही मोठ्या प्रमाणावर भोंदू बाबांच्या आहारी जातात. हे चित्र कोणाही सुबुद्ध नागरिकाला अस्वस्थ करणारे आहे. सचोटी, परिश्रम, कष्ट, डोळसपणा आणि विज्ञाननिष्ठ वर्तन यांच्या आधारेच आपण प्रगती करू शकतो नव्हे तोच उद्धाराचा एकमेव आणि खरा मार्ग आहे, यावरचा विश्वास लोकांचा दिवसेंदिवस पातळ होत चाललेला आहे आणि म्हणून भोंदू बाबा, मंत्रतंत्र, करणी, नवससायास, या मागे समाज जातो आहे. तद्वतच समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर देव भोळेपणा वाढतो आहे आणि देव भोळ्या भावड्या जनतेच्या भावभावनांचा कसा दुरुपयोग होतो आहे हेही आपण सर्वत्र पाहतो आहोत. मोठ-मोठी देवालय, देवाच्या नावाने चालणारी संस्था त्यांच्यातील आर्थिक घोटाळे हे सगळे आपल्या समोरच आहे. देवधर्माच्या नावाखाली समाजामध्ये शोषण विशेषतः स्त्रियांचे शोषण जेवढे झाले आहे तेवढे ते अन्य रुपात झाले नसावे. म्हणूनही सावरकरांचे विज्ञान निष्ठ विचार समजून घेतले पाहिजे.

सावरकरांची जडणघडण ही समजून घेण्याकरता सावरकरांचा काळ आणि त्यापूर्वीचा सुमारे 100 वर्षांचा काळ नवजागृतीचा काळ म्हटले जाते आणि ज्या काळात युरोपा सह भारतातही मोठ्या प्रमाणावर वैचारिक घुसळण चालू होती, त्या काळातील अनेक थोर विचारवंत, पत्रकार, राजकीय नेते सामाजिक चिंतक, समाजशास्त्रज्ञ अशा अनेकांचा प्रभाव पडलेला आहे आणि त्या सर्वातून सावरकरांची जडणघडण झालेली आहे. सावरकर हे स्वतः विलक्षण बुद्धिमान असल्यामुळे पाश्चात्य विचारवंतांचे तत्त्वज्ञान, त्यांचं चिंतन, यांच्या जोडीलाच देशातील विचारवंतांनी केलेले समाज चिंतन याचाही त्यांनी चिकित्सकपणे अभ्यास केलेला होता. चिकित्सक हा शब्द मुद्दामच वापरलेला आहे. कारण सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेचा तोच पाया आहे.

कुठलाही विचार किंवा तत्वज्ञान आंधळेपणाने स्वीकारणे यातून वैज्ञानिक दृष्टी तयार होत नाही. म्हणून सर्व प्रकारच्या व्यक्ती पूजेला पोथीनिष्ठतेला आणि आंधळेपणाने विचार स्वीकारण्याच्या प्रवृत्तीला सावरकरांनी विरोध केलेला आहे. सावरकरांनी या संदर्भात जे लेखन केलेले आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेले 11 विज्ञान निष्ठ निबंध महत्त्वाचे आहे. त्यांचा एक एक निबंध पंधरा-वीस पानांचा आहे म्हणजे छोट्या पुस्तीके एवढा होतो. त्यातल्या काही निवडक निबंधांची फक्त शीर्षकेच इथे मांडतो म्हणजे त्यातून निबंधाचा विषय आणि सावरकरांचे मत त्यातून समजायला मदत होईल. ती शीर्षक अशी: मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव, ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय, खरा सनातन धर्म कोणता, यज्ञाची कुळकथा, गोपालन हवे गो पूजन नव्हे, यंत्राने का बेकारी वाढते असे हे निबंध खरे तर एकेक व्याख्यानाचे असे विषय आहेत. त्यातील केवळ गोपालन हवे गो पूजन हवे हा त्यांचा निबंध, जो जुन्या शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट केलेला होता त्याविषयी आणि यंत्राने का बेकारी वाढते याविषयी विस्ताराने मांडणार आहे.

गाय हा उपयुक्त पशु आहे, त्याच्याशी कोणतेही धार्मिक व अन्य संदर्भ जोडलेले नाहीत. हे लक्षात घेऊन गाईचे पूजन करणे किंवा तिच्या मल मूत्राला पवित्र मानून त्याचे प्राशन करणे हा विलक्षण चीड आणणारा प्रकार आहे, असे सावरकर लिहितात. गायीच्या उपयुक्ततेमुळे तिचे पूजन सुरू झाले हे खरे. परंतु नंतर त्याचा एवढा अतिरेक झाला की मल्हारराव होळकरांनी जेव्हा तेव्हा मोघलांच्या ताब्यात असलेल्या काशी तीर्थक्षेत्रावर हल्ला केला, तेव्हा आम्ही तुमच्या गाई मारू तुम्ही परत जा अशा प्रकारची धमकी मोघलांनी मराठा फौजेला दिली त्यामुळे मराठा फौजेचे झुंजार सेनापती मल्हार रावांना नाईलाजाने माघारी परतावे लागले ! गोपूजनाच्या संदर्भात अशी अंधभक्ती कामाची नाही. गोपूजन करायचेच असेल तर ज्यांना सकस आहार द्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या म्हणजे त्यांचे पूजन झाल्यासारखे होईल असेही सावरकरांनी या निबंधात ठळकपणे म्हटलेले होते.

यंत्राबाबतही आणि यंत्र संस्कृती बाबतही सावरकर विलक्षण आग्रही होते कारण सावरकरांनी युरोपातील देश औद्योगिक क्रांतीला सामोरे गेले आणि म्हणून ते प्रगत झाले हे सत्य त्यांना नीट उमगलेले होते. समाजाची आणि देशाची प्रगती मंत्र बळाने नव्हे तर यंत्रबळानेच होऊ शकते हे त्यांनी ठळकपणे मांडले आणि यंत्राने बेकारी वाढत नाही, बेकारी वाढते ते विषम वाटणीमुळे. यंत्रे ही निर्जीव ,दूरदृष्टी शून्य, इच्छा शून्य, आणि परतंत्र असतात म्हणून त्यांना दोष देणे हे आपल्या मूर्खतेचे लक्षण आहे. अग्नी स्वयंपाक ही बनवतो, ऊर्जाही देतो, आणि घरेही जाळतो. यात अग्नीचा काय दोष ? अशा प्रकारचा युक्तिवाद सावरकर आग्रहाने यंत्र संस्कृतीचे स्वागत करत असताना आवर्जून मांडतात.

नवे तंत्रज्ञान, नवे विज्ञान, याचा आपण अंगीकार केला नाही तर काळाच्या ओघात आपला समाज, आपला देश मागे पडेल हे त्यांनी बजावले. यंत्रामुळे नोकऱ्या जात नाहीत उलट यंत्रामुळे मानवी क्षमता आणि काम वेगाने आणि अचूकपणे होते. यंत्र संस्कृतीला विरोध करणारे जसे तेव्हा युरोपात होते तसे आपल्याही देशात संगणकीकरण, डिजिटलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ताज्या वैज्ञानिक विषयांबाबत विरोध होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या जातील अशी एक भीती अलीकडे फार प्रखरतेने मांडली जात आहे. हो ! नोकऱ्या जातील, काही जणांच्या निश्चित जातील. पण कोणाच्या जातील, तर जे लोक नवे तंत्रज्ञान शिकणार नाहीत आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी हिताकरता करण्याची विवेकशीलता दाखवणार नाही असे स्थितिशील लोक यांच्या नोकऱ्या जातील. एरवी ही त्या गेल्याच असत्या ! म्हणून नव तंत्रज्ञानाचा अंगीकार याबाबत सावरकर नेहमी आग्रही असत भारतीय समाज आणि भारत देश मागास राहण्याचे विवेचन करताना ते म्हणतात की आपल्या देशातील जातीव्यवस्थेचे निर्मूलन होणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी भारतीय समाजाला सात बेड्यातून मुक्त करा अशा प्रकारचा एक सविस्तर निबंध लिहिलेला आहे. त्यामध्ये वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, मंदिर बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, असे सात महत्त्वाचे अडसर आपण दूर केले पाहिजे हे त्यांनी आग्रह पूर्वक मांडले आहे. सावरकरांना समर्थ, समृद्ध अशा भारताची स्वप्ने नेहमीच पडत आणि म्हणून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांनी आपल्या निबंधातून, विज्ञान विषयक कथांमधून, आग्रहाने मांडलेले आहे.

सारांश रूपाने सावरकरांच्या संदर्भात आपल्याला एवढेच म्हणता येईल की काळाच्या पुढची दृष्टी असलेल्या या थोर क्रांतिकारकांच्या विज्ञान विचारांकडे देखील आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments