माझं माहेर सांगलीचं. सांगलीच्या सिटी हायस्कूल या खूप जुन्या नावाजलेल्या शाळेत शिकवणाऱ्या डी. एस्. कुलकर्णी या इंग्रजीच्या सुप्रसिद्ध शिक्षकांची मी मुलगी. माझे बाबा इंग्रजीचे फार अधिकारी, विद्वान शिक्षक होते. ते एस एस सी बोर्डाच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचे संपादकही होते. त्यांनी उत्तम इंग्रजी भाषांतरं केलेली आहेत. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी शिकवलंच आणि अक्षरशः घडवलं. माझ्या आईचं नाव मुक्ता. ती ही फार उत्कृष्ट शिक्षिका होती.
आई-बाबा,थोरला भाऊ प्रसन्नदादा, मी मधली बहीण आणि धाकटा भाऊ राघवेंद्र उर्फ अतुल असं आमचं पाच जणांचं कुटुंब. आता मोठा भाऊ प्रसन्नदादा सी. ए. आहे.धाकटा भाऊ राघवेंद्र उर्फ अतुल एम्.डी. डॉक्टर आहे. मुलांनातवंडांनी भरलेले दोघांचेही संसार छान सुरू आहेत.

आमच्या घरी पाहुणेरावळे, नातेवाईक यांचा सतत राबता असायचा. आई-बाबांच्या सात्विक, प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी खूप माणसं जोडली.
पुढच्याच गल्लीत माझं आजोळ होतं. दोन्ही घरातून अपारंपार प्रेम तर मिळालंच आणि शिस्तही !
अशा सांगली सारख्या छोटेखानी शहरात, बाळबोध वातावरणात, आई-वडिलांच्या मायेच्या, कौतुकाच्या सुरक्षित कोशात संथ आयुष्य जगणारी मी एका मध्यमवर्गीय घरातली सर्वसामान्य मुलगी… अगदी महाराष्ट्रीयन वळणाची आणि मराठी संस्कारातली !
सांगलीच्या डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर या शाळेत प्राथमिक आणि सिटी हायस्कूल या शाळेत माध्यमिक शिक्षण झालं.
विलिंग्डन महाविद्यालयात कॉलेजचे शिक्षण झालं. इंग्रजी हा विषय घेऊन बी. ए. केलं. पुढे एम ए चं प्रथम वर्ष सुरू झालं.
माझ्या सासरची कुलकर्णी मंडळी पण सांगलीचीच. माझे सासरे अनंत नारायण कुलकर्णी. त्यांना त्यांचे मित्र बंडोपंत म्हणत. घरी सगळे दादा म्हणायचे. सासुबाईंचं नाव सुमती. घरचे त्यांना वहिनी म्हणायचे.
सासर्यांचं वास्तव्य नोकरीनिमित्त मुंबईत पार्ल्याला होतं. घरी सासू-सासरे, मुकुंद, त्यांचा धाकटा भाऊ श्रीकांत (आता डॉक्टर, प्रसिद्ध सर्जन) आणि धाकटी बहीण वृंदा (बँकेत नोकरी आणि मिरजेच्या विजयराव कुलकर्णी सी.ए. यांची पत्नी.आज दुर्दैवाने कॅन्सरने देवा घरी गेली आहे) असं कुटुंब.
इथेही सतत पाहुणे मंडळी, शिक्षण नोकरी या साठी राहिलेले दीर, पुतणे असा राबता होता. सासूबाई सर्वांचं खूप प्रेमानं अगत्यानं करायच्या.

मुकुंदांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले. पुढे इंजिनिअरिंगला सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये ते आले. मुकुंद आणि त्यांचे मित्र सायकलवरून इंजीनियरिंग कॉलेजला जात.
सांगलीत मुकुंद त्यांचे काका – प्रभाकरकाका यांच्याकडे राहायचे. घरी मुकुंदांचे आजी आजोबा म्हणजे आई-नाना, प्रभाकाका, पुष्पाकाकू त्यांची मुले राहत.
या जुन्या घराच्या अगदी जवळ माझ्या सासर्यांच्या काकांचा आशीर्वाद हा मोठा बंगला होता. तिथे काकाआजोबा – काकूआजी रहायचे. खालच्या मजल्यावर बाळूकाका (प्रा.डॉ.बी.एन्. कुलकर्णी) व कुमुद काकू(स्वतःची लॅबोरेटरी चालवणाऱ्या ॲगमार्क केमिस्ट) आणि त्यांची मुलं असे राहायचे.
घरची शेती प्रभाकर काकाच बघायचे. घरी गाईंचा गोठा, दुधाचा व्यवसाय होता. घरी खूप मोठा राबता होता. सतत येणारे जाणारे, मुक्कामाला असणारे पाहुणे. लग्नकार्यं, सणवार, कुलाचार सर्व काही होतं.त्यात शिक्षणासाठी येऊन राहिलेली ही पुतणे मंडळी पण असायची. या साऱ्यांची देखभाल, स्वयंपाकपाणी पुष्पाकाकू प्रेमाने, आनंदाने करायच्या.
मुकुंद म्हणतात सहसा लहान गावातून मुंबईला मुलं उच्च शिक्षणासाठी जातात. पण आम्ही मात्र मुंबईहून सांगलीला उच्च शिक्षणासाठी आलो. कधी घरची गडी माणसं आली नाहीत तर प्रभाकाकांच्या बरोबर धान्याची पोती उचलून ठेवणं, भिजवलेलं भात सायकल वरून गिरणीत नेऊन पोहे कांडून आणणं, गाईंच्या धारा काढून डेअरीला दूध नेऊन घालणं ही कामं कधी कधी मुकुंदांच्याकडे असायची.
त्या दिवसांच्या खूप मजेच्या, धमाल आठवणी मुकुंद सांगतात.
दोन्ही घरातले आजी-आजोबा, काका-काकू यांच्या मायेच्या छत्राखाली मुकुंदांचं कॉलेजचं शिक्षण झालं. बी ई, मेकॅनिकलची डिग्री घेतली आणि ते मुंबईला परत गेले. त्यानंतर मोगल लाईन या व्यापारी शिपिंग कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीत दाखल झाले. मर्चंट नेव्ही हेच त्यांचं कार्यक्षेत्र बनलं.

आमची दोन्ही घराणी दोन-तीन पिढ्यांपासून एकमेकाला ओळखणारी. त्यामुळे माझ्या आजेसासूबाई आई-बाबांना त्यांच्या लहानपणापासून ओळखत होत्या. माझे वडील आणि सासरे तर कॉलेज पासूनचे मित्र.
गंमत म्हणजे मी आणि मुकुंदानी मात्र एकमेकाला कधीच पाहिलं नव्हतं. आमची कधीही भेट झाली नव्हती. त्यामुळे प्रेमविवाह वगैरेचा प्रश्नच नव्हता.
मी बी. ए. ला शिवाजी युनिव्हर्सिटीला इंग्रजी विषयात पहिली आले म्हणून पेपर मध्ये माझा फोटो, नाव वगैरे आलं होतं. घरी आलेल्या पेपरातली ती बातमी पाहताच, “अरे ही तर आपल्या डी.एस्. आणि मुक्ताचीच मुलगी” असं माझ्या आजेसासूबाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या या नातवासाठी मला मागणी घातली.
मे १९७९ मधे आमचं लग्न झालं. मी एम्. ए. करायचं थांबवून टाकलं आणि एम्. ए. कुलकर्ण्यांची (मुकुंद अनंत कुलकर्णीं) पत्नी झाले.
लग्नापूर्वी कु. वेदवती धीरेंद्र कुलकर्णी होते, तिची आता सौ. वेदवती मुकुंद कुलकर्णी झाले. त्या बदललेल्या मधल्या मुकुंद या नावाने सगळं आयुष्यच बदलून टाकलं.

मुकुंद मरीन इंजिनियर आहेत, जहाजावर नोकरी करतात, त्यासाठी जहाजावर राहून अनेक देशांना ते जात असतात, एवढेच मला माहीत होतं. यापलीकडे मरीनरचं आयुष्य, जहाजावरचं जीवन, समुद्र प्रवास याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

फारच छान! तू सौ वेदवती “M.A” झालीस, यात जो master stroke मारलास, तो भावला मनाला. सात्विक”प्रसन्न “चेहरा व “अतुल”निय संस्कार यांना तू मानवी रूप दिलेस. सर्व माहेर/ सासरच्या माणसांची ओळख, फोटोज यामुळे मूर्तिमंत चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
The Narrator recourses, in this episode, to drawing a word-picture of how Miss Vedavati Dheerendra became Mrs. Vedavati Mukund. This transition was smooth mainly because both families were in close contact for decades in Sangli. I wonder why there isn’t a single reference to “Prajnya” by which nomenclature she is known in the family!
Rightly does she praise my Maama’s (Younger brother to my mother ) reputation & scholarship, professional competence as also of her teacher-mother. Though heer paternal Grandfather was a Kannadiga, circumstantially she became, as she is proud to declare, a Maharashtrian. Her “Worse Half” Mukund, also belongs to a respectable family. He is a Mechanical engineer, but chose to be on the sea! He keeps company with Merchant Ships. Prajnya chose marriage in preference to prosecuting post-Graduate studies seems today, to be a little out of the box In toto, the autobiographical sketch makes absorbing reading.
वेदवती,जीवननौकेत तुझ्यासोबत असलेल्या सर्व जिवलगांची तू छान ओळख करून दिली आहेस. जीवननौकेचा आता हळूहळू प्रवास सुरू झाला आहे. तुला मिळालेले उत्तम ,दर्जेदार शिक्षण, संस्कार , आपल्या लोकांचा आशीर्वाद,जीवनसाथीदाराची साथ हे सर्व सोबत घेऊन तू प्रवासाचा प्रारंभ केला आहेस. आम्ही वाचकही हा प्रवास करतो आहोत.
तुझ्या बहारदार लेखनास आमच्या शुभेच्छा.
वेदश्री,जीवननौकेत तुझ्यासोबत असलेल्या सर्व जिवलगांची तू छान ओळख करून दिली आहेस. जीवननौकेचा आता हळूहळू प्रवास सुरू झाला आहे. तुला मिळालेले उत्तम ,दर्जेदार शिक्षण, संस्कार , आपल्या लोकांचा आशीर्वाद,जीवनसाथीदाराची साथ हे सर्व सोबत घेऊन तू प्रवासाचा प्रारंभ केला आहेस. आम्ही वाचकही हा प्रवास करतो आहोत.
तुझ्या बहारदार लेखनास आमच्या शुभेच्छा.
ताई,
खूप छान!अगदी सहज वर्णन! फोटोही छान👌🏻👌🏻 त्यामुळे वर्णनात जीव ओतल्यासारखं वाटलं.
लेख वाचून माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझे काका आणि डॉक्टर बी. एन्. कुलकर्णी खूप चांगले मित्र होते. काकांसोबत मी अनेकदा बी. एन्. काकांच्या घरी गेले आहे. मला आवडायचं जायला. आई काकूंसोबत आशीर्वाद मधल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमालाही नेहमी जात असे. तुमच्या सासूबाई ही आठवतात नऊवारी नेसलेल्या. बी. एन्. काकूंचा (कुमुद काकू) हसरा चेहरा आजही अगदी ठळक आठवतो😊
सुसंस्कृत शिक्षकांचे घराणे असा वारसा लाभलेल्या वेदवतीचाही उत्तम शिक्षिका झाले आहे अपेक्षितच होते त्यांच्या आईचा फोटो पाहिल्यानंतर क्षणभर वेदवची ताईच वाटल्या. माहेर सासरचे आडनाव कुलकर्णी असल्याने वेदवती ताईंनी माहेरची ओळख कायम राखली. एकत्र कुटुंबामध्ये वागल्याने त्यांचा असलेला प्रेमळ स्वभाव कसा ते कळते.
वेदवती म्हणजे ज्ञानी स्त्री हे त्यांच्या लेखनामुळे सर्वांना ज्ञात आहे. श्री मुकुंद कुलकर्णी (स्वातंत्र्य देणारा)यांची साथ लाभ भल्यामुळे त्यांना आयुष्यात यश लाभले.
वेदवती ताईंना आयुष्यातील पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.
*डॉ. सुरेखा विवेक जोशी*
आजच दोन्ही भाग वाचले.संपूच नये असं वाटतं होतं.आजच्या युद्ध परिस्थितीमुळे तुला आठवलेल तुझ पूर्वायुष्य वाचून गहिवरून आलं.त्यावेळी तुझी काय मानसिक अवस्था झाली असेल हि कल्पनाच न केलेली बरी.तुझ बालपण,माहेर सासरच्या मंडळींची माहिती व फोटो बघून छान वाटलं.पिल्लूचा फोटो खूप सुंदर.तुझ खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा 🙏
डी. एस. सरांची नेहमीच आठवण येते. फार भरभरून इंग्लिश शिकवलं त्यांनी. त्यांच्याकडे शिकता शिकता सगळ्या कुटुंबातील सर्वांशीच मी जोडला गेलो. त्यामुळे हे सारं वाचताना ते दिवस पुन्हा डोळ्यांसमोर तरळतात. छान लिखाण!
तुझं बालपण आणि सासर माहेरच्या लोकांची माहिती आणि फोटो, हे सगळं पाहून, वाचून खूप छान वाटलं.
बदललेल्या मधल्या नावामुळे मिळालेलं पुढचं आयुष्य आणि त्यातील वेगळ्याच प्रकारचे आलेले अनुभव वाचायला खूप छान वाटतील. पुढच्या भागांची वाट पाहते आहे
प्रज्ञाताई, तुझा आजचा लेख वाचून जुन्या सांगलीतल्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा मी अगदीच लहान होतो पण आठवणी अजूनही ताज्या आहेत. खूप छान वाटलं वाचून धन्यवाद.
येत्या सोमवारची परत वाट बघत आहे
Pradnya tai, Reading this feels like binge watching a show & eagerly awaiting the next episode …. thoroughly enjoying it !
सहज सुंदर लिखाण.सगळ्यांचे फोटो पाहून छान वाटले
खूप छान लेख पुढच्या सोमवारच्या प्रतिक्षेत
तुझा लेख आल्यावर कधी एकदा सगळी कामं संपवून तो पूर्ण करतोय असं होतं. तुझं लग्नाआधीचं आयुष्य, परिवार आणि तो सगळा काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहिला. खूपच सुंदर लिहिलं आहेस!. पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहे.
छान इंट्रो!! 👍
खूप छान लेख लिहिला आहे प्रज्ञा. दादा-वहिनी व तुझ्या आई-बाबांचे फोटो बघून खूप आनंद झाला. व्रुंदा गेल्या नंतर तू तिची उणीव दादा- वहिनींना भासू दिली नाहीस. छान वाटलं वाचून सर्व. 👌👏👏👏
माझेही ma लग्नामुळे राहिले. 79 मार्च. छान लिहितेस.
The brief but essential information about both the families is good. We are looking forward for your next portin the journey.
खूप छान….
छान