मैत्रीण म्हणवणारी मैत्रीण.
शाळा, कॉलेज, शेजार पाजार, नोकरीतले सहकारी, नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास ह्यामुळे बंध जुळून येतात. मैत्री होते. मला ही मैत्री अनेक रंगी अनुभवायला मिळाली. काही अगदी देवाने पाठवावी तशी प्रेमळ मैत्री. काही मैत्री दाखवत वैर करणारी. आणि तिसरा प्रकार मैत्री दाखवत मैत्री नसणारी. कदाचित सर्वांनाच असे अनुभव असतील.
हा तिसरा प्रकार म्हणजे इंटरेस्टिंग आहे, बरं का. त्याच्या शेड्स आहेत, माझ्या आठवणीच्या खजिन्यात. त्यातलीआज एक पेश करते !
सरिता माझी सहकारी मैत्रीण. एकाच डिपार्टमेंटला काम करत असलो की जुळवून घ्यावे लागते. लंच टाइम,कामाची वाटणी अॅडजस्ट करताना ओळख होते.
संवाद होतो. मैत्री होते.पुरुष सहकारी असो की स्त्री सहकारी कितीतरी अशीच माणसं जोडली जातात हा माझा अनुभव आहे. तशीच सरिता. एकूणच परिस्थिती विचाराल तर तशी सारखीच म्हणावी अशी. लोन काढून घर घेतलेले, घरातले वृद्ध साधारण एकाच वयाचे. दोघींची मुले एकाच वयाची. घरातल्या छोट्या मोठ्या तक्रारीसुद्धा जुळायच्या !
कधी आवडीची भाजी किंवा पदार्थ एकमेकींना देऊ लागलो. पूर्वकल्पना देऊन रजा घेत असू. मग कारणे सांगताना घरगुती बोलले जायचे,ते पण वेगळे नसायचे.
घरी जाताना भाजी किंवा सांसारिक खरेदी, सणावारी रंग ठरवून साड्या नेसणे असे सुरू झाले. आम्ही एकाच रंगाच्या साड्या नेसलो की,
“ आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या, जोडीच्या ! ” असे चिडवत बाकीचे. जितकं बालिश आमचं वागणं, तेवढीच बालिश कॉमेंट. मजा वाटायची.
सरिता एकदा म्हणाली,” आपण शॉपिंग करूया ? नवरात्रीसाठी कुमारिकांना गिफ्ट द्यायचे आहे. आणखी पण छोटी मोठी खरेदी करायची आहे. मिस्टर कंटाळतात शॉपिंग म्हटलं की.”
मलाही वाटलं. करूया एक दिवस बदल. मुलं आणि नवरा नेहमीच जातो शॉपिंगला.
” मला तर आवडेल शॉपिंग.त्यात पैसे तर तू खर्च करणार शॉपिंगची मजा मात्र मलासुद्धा लुटायला मिळेल. आवडलं तर मीदेखील घेईन काही .”
मी जरा बंडखोरीच्या सुरात घरी सांगितलं,
“ ह्या रविवारी मी आणि माझी मैत्रीण सरिता एन्जॉय करणार आहोत”.
“ आता ही कोण मैत्रीण ? ती तुझी कलीग होय ? तुझी काय रस्त्यावर चालताना धक्का लागला तरी मैत्रीण होते म्हणा.”
शनिवारी पुनः जाण्याचे नक्की केले. रविवारी सकाळी मी तिला गुड मोर्निंग टाकले.एरवी कधी असा मेसेज केला नव्हता. कारण रोज तर भेटतो आम्ही ! मेसेज पोचला नाही.
उठली नसेल, असं वाटलं.
नऊ वाजता कॉल केला.तो पोचत नव्हता.मला इतके विचित्र वाटले.
मी नाश्त्यासाठी पोहे करत होते,पण चित्त ठिकाणावर नव्हते.
पोहे झाल्यावर घरात पाकसिद्धीची तयारी चालू झाली. ऑनलाइन भाजी खरेदी झाली.
मुलगी चक्क सुरी घेऊन भाजी चिरत होती. मुलगा मटार सोलत होता.
” बाबा बिर्याणी करणार आहेत,आई. मूग भजी ऑर्डर करायची.”
“छान आहे ना, कॉम्बो ?”
” मग आईस क्रीम ! “
” आम्ही पण एन्जॉय करू.”
माझे काही नीट लक्ष नव्हते.
अकरा वाजता सरिताला कॉल लागला.
” अगं कधी निघायचे ? शॉपिंग कधी आणि जेवायचे कुठे ? फोन लागत नव्हता तुझा !”
” फोन लागेल कसा ? नाशिकला निघालोय.घाटात होतो. नणंदेचे मिस्टर आजारी आहेत.सकाळी निघालो आम्ही…”
” अरे बापरे.असं होय. ठीक ठीक. मी आपली शॉपिंगच्या नादात… सॉरी…”
माझा हिरमोड झाला, पण तिकडे तो माणूस आजारी. अचानक हिला जावे लागले. आपल्या शॉपिंगचे काय घेऊन बसायचे ? आणि अशा वेळी तिने आपल्याला बेत रद्द झाला हे सांगणेदेखील महत्वाचे नाही.
कायम स्वतःची समजूत घालायची, दुसऱ्याला समजून घ्यायची सवय असते ना !
शॉपिंग रद्द झाले तरी घरी सुग्रास आणि आयता बेत होता.
दुसऱ्या दिवशी सरिता येणार नाही किंवा आली तरी
नाशिकहून डायरेक्ट येईल असा अंदाज.
पण ती वेळेवर, नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन आलेली होती.
” कसे आहेत नणंदेचे मिस्टर ? कधी आलात नाशिकहून ?”
मी चेहऱ्यावर जरा सिरियस बिरीयस भाव आणून !
” जेवलो आणि निघालो, ह्यांना सुट्टी नसते. शिवाय मुलं घरी होती. आजारी असतातच गं ते. दहा वर्षांपूर्वी बायपास झाली,तेव्हापासून ते भितात. ती ह्यांची चुलतबहीण . ह्यांना या म्हटलं की जावं लागतं. ऐंशी प्लस आहेत गं. अधून मधून तिकडे फेरी असतेच.”
म्हणजे फोन करायला सुचलं नाही,अशी परिस्थिती नव्हती तर !
“ असं होय !”
ती अगदी थंड आणि शांत होती. आपलं काय ठरलं होतं, तिनंच सुचवलं होतं,ह्याचा उल्लेख नाही !
शेवटी मीच म्हटलं,
“ फोन तरी करायचास. “
“ ते राहिलंच बघ. तुझा फोन आल्यावर मिस्टर म्हणाले मला, फोन तरी करायचास. ”
बस्स. एव्हढंच. स्वतःच्या तालात जगणारी अशी माणसे. कसलं भानच नसतं !
एक अनुभव जमा झाला. आमचं डिपार्टमेंट एकच. सगळं मागील पानावरून पुढे चालू राहिलं. पदार्थांची देवाणघेवाण, साड्यांची ठरवा ठरवी आणि आमची सो कॉल्ड मैत्रीसुद्धा !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800
