शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांवर पी.एच.डी करूनच न थांबता, पुढे या बालकांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या म्हणून डॉ राणी खेडीकर ओळखल्या जातात.
या पूर्वी आपल्या पोर्टलवर त्यांची “लालबत्ती” ही अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेली लेखमाला प्रसिध्द झाली आहे. या लेख मालेमुळे त्यांच्या कार्याला देश विदेशातून बळ मिळत आहे, या बद्दल सर्व सहृदयी वाचकांचे, व्यक्तींचे मनःपुर्वक आभार.
आता डॉ राणी खेडीकर या समाजाच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या महिलांवर आपल्यासाठी लेखन करणार आहेत.
त्यांची “रण रागिणी” ही लेखमाला दर पंधरवड्यातून एकदा, शुक्रवारी प्रसिध्द होत जाईल.
डॉ राणी खेडीकर यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा. आपला या लेखमालेस चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
– संपादक
न्याय देण्यास सज्ज
धीर, गंभीर मुद्रा
संवेदनशील मन
विष्णूची गादी
सक्षमतेने सांभाळता
तुम्हास नमन…..
न्याय देवता या शब्दाचा उच्चार करताच, डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि हातात तराजू घेतलेली तसेच दुसऱ्या हातात तलवार घेतलेली प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येते.
न्यायदान करणारी व्यक्ती ही निःपक्ष असते. न्याय देण्यासाठी रंग, वर्ण, समाजातील स्थान या व अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता न्याय देते आणि प्रतिकात्मकरित्या ही बाब दर्शविण्यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसून येते. निष्पक्ष, निरपेक्ष वृत्तीने सगळ्या बाजूंनी न्याय देण्यासाठी जी व्यक्ती नेमली जाते ती न्याय देवता असते.
अश्याच एका न्याय देवतेची आपल्या सगळ्यांना ओळख करून देण्याची संधी मला मिळाली ती जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिनाच्या निमित्ताने.
बाल कल्याण समिती, पुणे ची अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे पोलिसाद्वारे पीडित बालिका, बालक सादर होतात. त्या बालकांची काळजी व संरक्षण आणि पुनर्वसन हे या समितीचे मुख्य कार्य आहे. तसेच पॉक्सो गुन्हयातील पीडित बालिका आणि बालक यांच्या पुनर्वसन हेतु त्यांना न्याय मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
पॉक्सो गुन्हा आणि त्यातील पीडित संदर्भात पॉक्सो कोर्टाच्या विशेष न्यायाधीश साहेबा यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. त्यांच्या विषयी आणि त्यांच्या निर्भिड फैसले सुनावणी बाबत खूप ऐकलं होतं. त्यांच्याशी मोकळेपणे चर्चा झाली तेंव्हा, त्यांची आणि त्यांच्या कामाची ओळख आपल्या सगळ्यांना करून द्यावी असं मनापापासून वाटलं आणि न्यूज स्टोरी टुडे हे वेबपोर्टल जे ८८ देशात वाचलं जातं या माध्यमातून या विशेष महिला न्यायाधीश यांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली आहे, त्या म्हणजे, माननीय श्रीमती श्रीपदा पोंक्षे मॅडम.

संवेदनशील, निर्भिड, खंबीर या गुणांचा सुरेख मिलाफ म्हणजे पोंक्षे मॅडम. त्या पोक्सो कोर्टाच्या विशेष न्यायमूर्ती आहेत.
वेदना, घाव, आघात, अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघून पीडित बालकांसाठी न्याय देण्याची ही गादी सांभाळत, मुळात संवेदना जाग्या ठेऊन तितकच खंबीर राहून, निर्भिडपणे आरोपीस शिक्षा करण्याची पात्रता असणाऱ्या सक्षम न्यायाधीश म्हणजे पोंक्षे मॅडम. नेहेमी अतिशय आपुलकीने त्या मला भेटल्या आणि
बालकांविषयीच्या अनेक पैलूंवर आत्मीयतेने बोलल्या.
पोंक्षे मॅडम यांच्याशी बोलताना नेहेमी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे, पीडित बालकासाठी, बालिकेसाठी त्यांच्या मनात, विचारात आणि कृतीत असणारी प्रेमळ आणि न्यायी भावना. बालपणी चौथी पर्यंत त्यांच्या वाड्याच्या परिसरात नियमित शाळेत जाणाऱ्या त्या एकट्याच होत्या. त्यांच्या वडिलांचा आणि संयुक्त कुटुंब याचा भक्कम आधार आणि शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांची आग्रही भूमिका त्यांना मुक्तपणे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत गेली.
बालपणी शिक्षिका होण्याचे स्वप्न मनात बाळगणाऱ्या या जज साहिबांचा फिजिक्स हा आवडता विषय होता म्हणून त्यांनी बीएससी केलं .त्यानंतर मात्र त्यांची दिशा त्यांनी निश्चित केली होती ती म्हणजे एल एल बी करून यशस्वी वकील होण्याची.
पुढे वकील म्हणून काम करत असताना, डायस वर विराजमान माननीय जज यांना बघून त्यांच्या मनात न्याय देवता या गादीची आस्था निर्माण झाली आणि आज बावीस वर्ष त्या न्याय देवतेचे कार्य करत आहेत.त्यांचा हा ज्ञानार्जन करण्याचा प्रवास त्यांना अनेक प्रकारच्या विषयाशी जोडत गेला आणि आपल्या प्रत्येक अनुभवातून समृध्द, सफल होत गेलेल्या या न्यायमूर्ती आज खरोखरी समाजासाठी एक आदर्श आहे.
पॉक्सो ची वाढती प्रकरणे हे आमच्या कामाशी निगडित असल्या कारणाने या विषयावर त्यांच्याशी बोलत असताना पोंक्षे मॅडम काहीश्या चिंता व्यक्त करताना जाणवल्या. पॉक्सो मधील पीडित बालिकेच्या वेदना तिच्या निरागस चेहर्यावरील अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह याचा बाल कल्याण समिती अध्यक्ष म्हणून मलाही खूप जवळून अनुभव येतोय.
पॉक्सो च्या वाढत्या केसेस बघून बदलत्या समाजाचे दर्पण आपल्या पुढे येत आहे.आणि, बालिकांच्या सूरक्षे बाबत बोलायचे झाले तर परिस्थिती फार वेगळी नव्हती पण कुटुंबातील व्यक्तींनी केलेले अत्याचार हे आता जास्त प्रमाणात समोर येत आहेत असं त्या म्हणाल्या .त्यातील जटिल, किचकट तथ्य आणि त्यातील निरागस बालिका एक पीडिता म्हणून समोर येते तिच्या आरोपीस जास्तीतजास्त शिक्षा व्हावी असं समाजातील प्रत्येक व्यक्तीस वाटतं.
न्याय मिळवून देण्याची ही जबाबदारी किती मोठी आहे आणि एका व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारी आहे.अश्या प्रसंगी मनस्थिती कठीण होते का? असा प्रश्न मनात आला आणि आम्ही बोलत असताना तो मी पोंक्षे मॅडमना विचारला .डायस वर धीर गंभीर वाटणाऱ्या पोंक्षे मॅडम अगदी सहज, हसुन शांतपणे म्हणाल्या, “एकदा डायस वर गेले की, आता तुमच्या समोर बसून तुमच्याशी बोलणारी मी आणि डायस वर ची मी यात मोठा फरक असतो. तिथे बसून एखादा निर्णय देताना एक परमेश्वरी ऊर्जा असते. त्यामुळे या विष्णूच्या गादीवर असताना कधीही मनस्थिती द्विधा होत नाही. न्याय देताना अचूक निर्णय घेतले जातात”. हे त्या बोलत असताना, न्याय देण्याच्या कार्यातून त्यांना मिळणारं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं .
आज ज्या परिस्थिती आणि घटनांना बालक, बालिका तोंड देत आहेत त्याचा निम्मा वाटा हा सोशल मीडिया, अनोळखी व्यक्तीशी बालकांचा येणारा संबंध, आभासी जगात जगण्याची बालकांची वाढती वृत्ती या गोष्टीचा आहे, यात दुमत नाही.
बालक बालिका आज एका बेधुंद विश्वात वावरत आहेत.त्याचा परिणाम गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी त्यांचा संपर्क वाढत आहे. अनेक प्रकारचे आमिष दाखवून बालकांना वेगवेगळ्या असामाजिक, अवैध जगात सामील करून घेण्यात येत आहे.या विषयावर बोलताना पोंक्षे मॅडम यांनी बालिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी आणि व्यक्ती ओळखण्याची कला अवगत करून स्वतः ला सुरक्षित ठेवावे, बालकांच्या पालकांनी आपल्या मुलामुलीसोबत त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करावी तसेच बालकांना त्यांच्या भावना, गरजा यावर ताबा ठेवून जर त्यांनी बालिका सोबत काही चुकीचे केले तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात याबाबत जरूर माहिती द्यावी, असं सांगितलं.
यावर उपाय म्हणजे बालकाना शालेय कालखंडात मैत्री, प्रेम, आकर्षण या संकल्पना नीट उलगडून सांगण्यात याव्या तसेच त्यातून होणारे गंभीर परिणाम याबाबत कायद्याची जुजबी माहिती देण्यात यावी अशी चर्चा आमच्यात झाली.
योगा, ध्यान याकडे बालकांना प्रवृत्त करावं. संयुक्त कुटुंब आणि त्यातून मिळणारे संस्कार याचा देखील बल्यावस्थेवर सकारात्मक परिणाम होतो, असे विचार पोंक्षे मॅडम यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले.
श्रीपदा पोंक्षे मॅडम यांनी जपलेली सामाजिक जाणीव, बालका साठी त्यांच्या ठायी असलेली संवेदनशीलता पॉक्सो कोर्टात विशेष न्यायाधीश पदावर कार्य करताना त्यांच्या कडून होणारे न्यायी फैसले यातून समाजात निश्चितच एक सकारात्मक संदेश जात आहे. आणि न्याय व्यवस्थेवर पीडित बालकांच्या पालकांचा विश्वास बळावत आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या अमानवी समाज कंटकांना सजा सूनावताना त्यांची निर्भिड वृत्ती पीडित बालकांना न्याय देत आहे.
पोंक्षे मॅडम या जज सहिबांच्या मनात न्याय मूर्ती पदावरून निवृत्त झाल्यानंतर शाळकरी बालकांसाठी कार्य करण्याचे स्वप्न आहे. बालकांना वेळीच आवश्यक ते ज्ञान दिल्यास त्यांचं बालपण सुरक्षित होईल आणि त्यांना मुक्तपणे फुलण्यास संधी मिळेल अशी मॅडम ची योजना आहे.
श्रीपदा पोंक्षे मॅडम यांच्या कडून न्याय देवतेचे कार्य घडत राहण्यास त्यांना सूर्य ऊर्जा प्राप्त व्हावी आणि निरागस बालकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळून बालक रुपी ही फुले अनोखा रंग, सुगंध घेऊन बहरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800