“मोमोज”
मोमोज हा अलीकडे लहान मुलांपासून तरुणाईला अक्षरशः वेड लावणारा पदार्थ बनला आहे. यात एकतर तळलेले, वाफवलेले नाहीतर बेक केलेले असे प्रकार बनवले जातात.
मोमोजच्या कोटींग, स्टफींग करण्याच्या असंख्य पद्धती आहेत. आपण आज एक क्रिस्पी डीप् फ्राय मोमोज चा प्रकार करूया.
साहित्य :
पारी साठी : 1 वाटी मैदा, अर्धी वाटी कणिक, 3 चमचे तेल, मीठ. बॉल्स डिप करण्यासाठी : अर्धी वाटी मैदा,1 चमचा लाल तिखट, मीठ,1चमचा ओवा, चिमूटभर मिरपूड, हिंग.
बॉल्सच्या स्टफींग साठी :
200 ग्राम पनीर खिसून घेतलेले, 1 वाटी बारीक कट केलेला कोबी,15 ..17 लसूण पाकळ्या बारीक कट करून, 1 सिमला मिरची व 1 गाजर बारीक चिरून, कांदा पात बारीक चिरून, कोथिंबीर, आले एकदम बारीक कट करून, मिक्स हर्बज, मिरपूड, 5..6 मिरच्यांचे एकदम बारीक कट केलेले तुकडे,1उकडुन खिसलेला बटाटा, अर्धी वाटी खिसलेले चीझ, मीठ. शेवटच्या वरच्या कोटींग साठी अर्धीवाटी पोहे मिक्सर मधून काढलेले व 2 वाटया प्लेन कॉर्नफ्लेक्स हाताने बारीक करून मीठ, तिखट घालून मिक्स करून घेणे.
कृती :
प्रथम एका बाऊल मध्ये कणिक, मैदा घेऊन त्यात पाव चमचा मीठ घालून 1 चमचा तेल घालावे व हळू हळू पाणी घालत छान भिजवावे. वरून पुन्हा तेल लावून घट्ट झाकून ठेवावी. म्हणजे छान मुरते व पाती सहज छान लाटली जाते. बॉल्स डिप करण्यासाठी अर्धा कप मैद्यात तिखट, मीठ, ओवा घालून पाणी घालून जरा पातळसरच पीठ भिजवावे. तिखट, मीठ, ओवा यामुळे चव छान राहते. आता मुख्य स्टफींगचे सारण बनवून घेऊ त्यासाठी पनीर कपड्याने कोरडे करून खिसून हातानी छान मॅश करावे .बटाटा सुद्धा छान मॅश करावा. आता बारीक कट केलेल्या सर्व भाज्या एकत्र करून मीठ घालून थोडावेळ तसेंच ठेवावे. हे शक्यतो पातीचे पीठ भिजवल्यावर करावे. म्हणजे बाकीचे हे सर्व होईपर्यंत भाज्यांना मिठामुळे पाणी सुटलेले असेल. ते घट्ट पिळून काढावे म्हणजे पुन्हा पाणी सुटणार नाही व स्टफींग व्यवस्थित बनेल. आता या भाज्यात मिक्स हर्बज, मिरपूड, लसूण तुकडे, पनीर व बटाटा, किसलेले चीझ हे सर्व् घालून चवीनुसार मीठ घालून बॉल्स बनवून घ्यावेत. पात्या करण्याचे पीठ पुन्हा छान मळून एकजीव करून घ्यावे. तेल लावून छोटे गोळे बनवून पातळ पात्या लाटून घ्याव्यात व प्रत्येक पातीत गोळा स्टफ करून पुन्हा व्यवस्थित बंद करून पातळ केलेल्या मैद्याच्या डिप मध्ये बुडवून मग शेवटी कॉर्नफ्लेक्स व पोह्याच्या केलेल्या शेवटच्या वरच्या कोटींगच्या मिश्रणात छान घोळवावेत व असे सर्व बॉल्स बनवून ठेवावेत.
शेवटी कढईमध्ये तेल चांगले गरम करून त्यात हे मोमोज बॉल्स छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळावेत व टिशू पेपरवर काढून मेयोनीजच्या डिप बरोबर छान डिशमध्ये सर्व्ह करावेत.
वैशिष्ट्य :
हे मोमोज इतके टेस्टी, क्रिस्पी, चीझी, यम्मी लागतात की पोट भरले तरी मन भरत नाही अशी अवस्था होते. मग नक्की करून बघाच, नक्की पुन्हा पुन्हा वन्स मोअर मिळणार याची 100% खात्री आहे.

— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
