Wednesday, February 18, 2026
Homeलेखमी शिल्पा….. ...

मी शिल्पा….. अमेरिका व्हाया केमन आयलंड

मूळ चंद्रपूर येथील पण गेली सोळा, सतरा वर्षे पती समवेत केमन आयलंड या देशात राहणार्‍या शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांची आणि माझी कोरोनाच्या काळात फेसबुक मैत्री झाली. पुढे 22 जुलै 2020 पासून आम्ही ते www.newsstorytoday.com हे पोर्टल सुरू केले.

शिल्पा तगलपल्लेवार गंपावार या सुरुवातीपासूनच ‘न्यूज स्टोरी टुडे’ पोर्टल साठी कविता आणि अन्य प्रासंगिक लेखन करीत आल्या आहेत. महाराष्ट्रातील एका कोपर्‍यात असलेल्या चंद्रपूर सारख्या शहरातील एक स्त्री तिच्या पस्तिशीत परदेशात जाते, इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला शिकते, संगणक वापरायला शिकते आणि मूळच्या अंगी असलेल्या चित्रकलेच्या गुणांवर, त्या देशात चित्रकार म्हणुन प्रस्थापित होते, ही शिल्पाची जीवन कहाणी मला खूप अद्भुत वाटली. म्हणुन मी शिल्पाने आत्मचरित्र लिहावे, अशी सूचना केली. जिद्दी शिल्पाने ही सूचना गांभीर्याने घेतली आणि अक्षरशः बोलता बोलता (व्हॉईस रेकॉर्ड द्वारे!☺️) तिने तिचे आत्मचरित्र अवघ्या चार महिन्यात लिहिले.

शिल्पाच्या, “मी शिल्पा…..
चंद्रपूर ते केमन आयलंड”
या आत्मचरित्राचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी संपन्न झाले.

तर त्याच दिवशी संध्याकाळी भव्यदिव्य प्रकाशन समारंभ 97 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, चित्रपट लेखक- दिग्दर्शक प्रदीप दीक्षित, आर्य वैश्य समाज मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश चक्करवार, हे आत्मचरित्र प्रसिद्ध करणार्‍या न्यूज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांच्याहस्ते आणि असंख्य साहित्य रसिक चाहते, स्नेही, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले.

या आत्मचरित्राच्या वेगळेपणामुळे अपेक्षेप्रमाणे पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला भरपूर प्रसिद्धी मिळाली.या पुस्तकावर विविध वृत्तपत्रांतून, या पोर्टलवर पुस्तक परीक्षण ही प्रसिद्ध झाले. या पुस्तकावर आधारित असलेले चित्रपट तयार करण्याचा मनोदय चित्रपट लेखक- दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांनी व्यक्त केला आहेच.

अशा या “मी शिल्पा…..
चंद्रपूर ते केमन आयलंड”
या आत्मचरित्राच्या तीन प्रती शिल्पाची चित्रे खरेदी करण्यासाठी आलेल्या अमेरिकन रसिकांनी विकत घेतल्या. हे इंग्लिश अमेरिकन मराठी पुस्तक कसे काय विकत घेत आहेत ? हे न राहवून शिल्पाने विचारले असता त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील त्यांचे तीन मित्र मराठी भाषिक आहेत, ते मराठी पुस्तके आवडीने वाचत असतात, हे आम्हाला माहीत आहे. म्हणुन त्यांना भेट देण्यासाठी आम्ही ही पुस्तके घेतली आहेत !

हे सर्व कळल्याने मला खूप आनंद झाला. कारण “हे विश्वची आपले घर” हे न्यूज स्टोरी टुडेचे ब्रीदवाक्य आहे.

सर्व विश्वात शांतता नांदावी, सर्व जातीधर्माच्या, वंशाच्या, भाषेच्या नागरिकांनी संकुचित दृष्टिकोन न ठेवता आपण या काळात विश्वाचे नागरिक आहोत हे लक्षात घेऊन विश्व बंधुत्व जोपासावे,ही भावना इंग्लिश अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या मराठी भाषिक मित्रांसाठी मराठी पुस्तक; ते ही मी शिल्पा…विकत घेऊन दाखवून दिली आहे, ही तशी क्षुल्लक वाटणारी घटना, अमेरिकेत सध्या जे काही चालू आहे, त्या सर्व पार्श्वभूमीवर खूप दिलासा देणारी आहे.

या अमेरिकन सुहृदांचे आणि शिल्पाचे मनःपूर्वक अभिनंदन.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments