नोकरीचा पहिला दिवस
कुणी ही विसरत नसतो !
निवृत्ती नंतरचा पहिला दिवस
आरामशीर सरत असतो !
सकाळी जाग येताच लक्षात येते,
ऑफिसला कायम सुट्टी !
पुन्हा ऑफिसच्या आठवणीने
रमते, मन असते हट्टी !
बायको निघून जाते कामावर,
देवून भली मोठी यादी !
कपडे सुकत घालायचे आहेत
घरातून निघण्याआधी !
आंघोळीला नंबर शेवटी,
कशाला तुमची एवढी घाई !
चहा ठेवतोस का जरा,
फर्मान सोडते मुलांची आई !
सोसायटीत हळू हळू खबर लागणार,
विचारतील सारी !
येत्या निवडणुकीत असायला हवे
तुमच्यासारखे सेक्रेटरी
वाचन, योगा, अभिनय, गाणे
यातील कशात बरे मन रमेल !
केसात आलीय चांदी,
चरित्र अभिनेत्याचा रोल जमेल !
बरेच आहेत निवृत्त मित्र,
एकदा घेतो त्यांची भेट !
ऐकावे जनाचे करावे मनाचे,
निर्णय घेईन थेट !
करावा का उद्योग स्वतःचा,
पैसे मिळू दे प्रथम सारे !
मोकळी हवा येवू द्या घरात,
उघडली बंद खिडक्या – दारे !
कोवळे ऊन अंगावर घेईन,
ते तर राहूनच गेले !
चिंब पावसात भिजायचं
आज पुन्हा लक्षात आले !
आपल्या शिवाय सुद्धा आज कार्यालय,
राहील चालू मस्त !
कुटुंबासोबत वेळ घालवायचा
आता जास्तीत जास्त !
— रचना : गजाभाऊ लोखंडे, सानपाडा, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
