आजपासूनी शाळेला सुट्टी
आतां फक्त खेळांशी गट्टी
आई, आतां जाऊया ग
मामाच्या त्या घरी
आते, मामे, मावस भावंडे
करू मजा त्या दारी
कधी लगोरी, लपंडाव कधी
खेळ पाठशिवणीचा
लहान, मोठे नसे कुणीही
सा-या भावंडांत
दुपार होता पत्त्यांमधल्या
राजाराण्या हाती
हातचलाखी, जादूचे ते
खेळ किती रंगती
ठिकरी, सागरगोट्यांची त्या
मजा असे आगळी
खेळात रंगूनी जाता आमुची
दुनिया ती वेगळी
अंगणातल्या आहे तेथे
हौदही पाण्याचा
डुंबत राहू मनःपूत
ना धाकही कोणाचा
करवंदे, वजांभळे खावया
रानामध्ये जाऊ
मनसोक्त फिरुनी आनंदाने
रानमेवा खाऊ
एक कपिला काळी
मागील पडवीत
हंबरून ती साद देई
आम्हां भावंडात
कट्टी बट्टी शाळेची सुट्टी
अशी करुया मजाचमजा
आता घेऊया निरोप आपण
पुढील वर्षी करू या मजा

— रचना : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
