पुन्हा ससा आणि कासव !
येता-जाता तिला बघण्यासाठी तो सतत धडपडत असायचा. त्याचे मित्र तिच्याशी बिनधास्त बोलायचे. त्याचा स्वभाव मात्र थोडा बुजरा होता. तो भिडिस्त होता. कुणी काही विचारलं की पटकन त्याला काहीच बोलता यायचे नाही. काही वेळा तर काहीच न समजल्यासारखा तो नुसता बघत उभा राहायचा. पण तरीही मनातल्या मनात मात्र तो बराच काही विचार करायचा.
तो कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता तेव्हा त्या वर्षी तिची ऍडमिशन पहिल्या वर्षाला झाली होती. नवीन ऍडमिशन झालेले लवकर लक्षात येत नसत. कॉलेजमध्ये बरेच कोर्स होते, आणि सुरुवातीला विस्कळीत वेळापत्रक असायचे, त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस गोंधळाचे वातावरण असायचे. तरीही कोण-कोण नवीन आले याची उत्सुकता प्रत्येकालाच असायची. याच्या वर्गात एक डेरिंगबाज बिनधास्त अशा मुलांचा ग्रुप होता. 8-10 जण होते त्या ग्रुपमध्ये. हा कोणत्याच ग्रुप मध्ये नव्हता, मात्र त्या ग्रुपमधील मुलांसोबत त्याचा चांगला परिचय होता. पहिल्या वर्षी जेव्हा हा कॉलेजमध्ये नवीन होता तेव्हा काही सीनियर्स याचे रॅगिंग घेण्याचा प्रयत्न करत होते. एकदा काही सीनियर्सने याला कॉलेज ग्राउंड मध्ये गाठून याची रॅगिंग देखील सुरू केली होती. हा बुजरा होता, गोंधळून गेला, आणि भीतीने त्याची गाळण उडाली. थोड्या वेळात त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याचे सीनियर्स तो रडतोय म्हटल्यावर हसून त्याची अजूनच थट्टा करू लागले. नेमके तेव्हाच त्याच्या वर्गातील हे आठ-दहा मुलं तेथून जात होते, आणि त्यांनी हे बघितले. आपल्या वर्गातील मुलाला हे सीनियर्स त्रास देत आहेत बघून यांनी त्यात उडी घेतली. आणि सीनियर्सला समजेल अशा भाषेत बोलून मार्गी लावले.

वर्गातील हा ग्रुप वात्रट, बेधडक, बेफाम, होता. मात्र हा त्यांना आवडला. एक साधा सरळ मार्गी मुलगा. कधीतरी, कुठेतरी, कामात येईल असे वाटून त्यांनी याला सोबत घेतले. अर्थात हा सोबत म्हणजे केवळ नावालाच होता. बाकी कुठल्याही कार्यात याचा सहभाग कधीच नसायचा. बरं हा अभ्यासात हुशार वगैरे असाही नव्हता. मात्र तरी देखील तो होता हे नक्की. काहीजण असतात असे की, ज्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नसतो. मात्र तरीही ते असतात. हा अशाच प्रकारातील मुलगा होता. ना बोलणारा, ना अभ्यास करणारा हुशार, किंवा दिसायलाही काही खास असा नाही की ज्याला बघताच तरुणी त्याच्या प्रेमात पडतील. हा फक्त होता बाकी काही नाही.
वर्गातील, कॉलेजमधील हुशार दंगा करणारे, खेळात पुढे असणारे, तसेच नाटक व गाणे किंवा अशाच विविध स्पर्धा गाजवणारे, असे बरेच ग्रुप होते. मुलं होती. हा त्या गर्दीत हरवलेला होता. अर्थात हा एकटाच तसा होता असे नाही, अजूनही काही होते जे काहीच करू शकत नव्हते. मात्र निदान ते चार लोकात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचे. निदान ते घाबरून पळायचे नाही. थोडी बहुत धडपड करण्याचा प्रयत्न त्यांचा दिसून यायचा. मात्र हा सर्व शस्त्र टाकून सरळ शरण जायचा. हा कॉलेजपर्यंत तरी कसा आला? हा एक मोठा प्रश्नच होता. कोणी काही बोलत असेल, कुठे काही चर्चा सुरू असेल, याचे स्वतःचे असे काहीच मत याने कधीच मांडले नाही. याचा आवाज कसा आहे हे देखील बहुदा कोणालाही माहीत नव्हते. मात्र तरी देखील जेव्हा हा सेकंड इयरला होता, आणि ती फर्स्ट इयरला आली, तेव्हा अचानक जादूची कांडी फिरावी तसा प्रकार झाला आणि तो चक्क तिच्या प्रेमात पडला.
काही ना काही बहाणा करून तो, ती जिथे असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करू लागला. आणि तो कुणाच्याच लेखी काहीच नसल्याने कुठे जातो, काय करतो, याच्याशी कुणालाही देणे-घेणे नव्हते. तो नेमका तिच्या आजूबाजूला असतो हे देखील कोणाच्याही लक्षात आले नाही. ती आकर्षक होती, नक्कीच! याच्याच वर्गातील तो जो आठ-दहा जणांचा ग्रुप होता त्यातील एका मुलाला ती आवडत होती. आणि इतरांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित तिची माहिती काढायला सुरुवात केली. ती कोण आहे? तिचे आई-वडील, भावंड, कुठे राहते, वगैरे वगैरे….
एकीकडे या टोळक्याचे हे सगळे उद्योग सुरू असताना, हा मात्र शांतपणे ती जिथे असेल तिथे जाऊन फक्त तिला बघत बसायचा. हे बाकी काय करत आहेत याच्याशी त्याला काहीही देणं-घेणं नव्हतं. दरम्यान हा ज्या पद्धतीने तिच्या आजूबाजूला घुटमळत फिरायचा, व एकटाच तिला बघत राहायचा हे तिच्या लक्षात आलेले होते. एक-दोन वेळा हा तिच्याकडे बघत असताना तिने अचानक त्याच्याकडे नजर वळवून, खुणेनेच काय आहे? असा सवाल त्याला केला होता. आणि जेव्हा हे घडले तेव्हा तो कमालीचा दचकला. त्याला घाम फुटला. व कावराबावरा होऊन तो तेथून निघाला. पण निघताना देखील तो धडपडला. आणि ती खळखळून हसली. त्याला ते हसणे खूप आवडले. मग त्यानंतर ती जोपर्यंत त्याला, तिला बघताना बघत नाही तोपर्यंत तिला बघत राहायचा….. कारण नंतर धडपडत जेव्हा तो पळून जायचा तेव्हा ती छान हसायची…. त्याचे ते भोळसट, बावळट, बघणे तिला आवडू लागले होते… आणि तिचे ते अचानक बघणे आणि नंतर खळखळून हसणे त्याला आवडू लागले होते….
एकीकडे या बिनधास्त, बेधडक टोळक्याला या प्रकाराची माहितीच नव्हती. म्हणायला एक-दोनदा हा तिच्याकडे बघत असल्याचे त्यांनी बघितले होते. मात्र हा काय आहे, हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी जास्त विचार केला नाही. ती याला झोपणारी नव्हती. ती सुंदर होती, हुशार होती, आणि हा दोन्ही नव्हता! शिवाय त्या टोळक्यातील ज्याला ती आवडली होती तो श्रीमंत व दिसायला हँडसम होता, त्यामुळे कुठल्याच अँगलने तशी कॉम्पिटिशन नव्हतीच. आता ते तिच्याशी बोलू लागले. हळूहळू एकेक डाव खेळू लागले. ती तशीही आधुनिक विचारांची होती. ती बिनधास्त या टोळक्यात मिक्स झाली. त्यांच्याशी बोलू लागली. अधून-मधून हा देखील त्यांच्यासोबत असायचा. मात्र त्यांच्यासमोर कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्याने केला नाही.
असेच दिवस जात होते. मजा, मस्ती, अभ्यास, परीक्षा, गॅदरिंग, कॉलेजमधील फेस्टिवल्स, प्रत्येक वेळी हे टोळके काही ना काही निमित्ताने तिच्याशी संवाद करत होते. मात्र तरीही तिचा नेमका अंदाज कुणालाच येत नव्हता. आणि जेव्हा हे शेवटच्या वर्षात होते तेव्हा एक अजबच प्रकार यांना समजला. शेवटच्या वर्षातील शेवटचा पेपर झाल्यावर चक्क तो आणि ती एकत्र हातात हात घालून बोलत जाताना यांनी पाहिले… हा सगळ्यांनाच धक्का होता. जी मुलगी सगळ्यांना हवी होती ती चक्क याच्यासोबत! त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
त्यांनी त्याला गाठले, आणि हा काय प्रकार आहे विचारले. त्यावर त्याने शांतपणे उत्तर दिले. पहिल्यांदा तो बोलला, न घाबरता, न गोंधळता, ‘आयुष्यात दोन थेअरी असतात, एक म्हणजे अपोजिट अट्रॅक्ट्स. भिन्न स्वभावाच्या व्यक्ती फार लवकर एकमेकांच्या जवळ येतात. आणि दुसरी थेरी म्हणजे, ससा आणि कासवाची गोष्ट! आपण कितीही आधुनिकतेच्या टीमक्या गाजवल्या, व भरधाव वेगाने धावणारा ससा बनलो, तरीही तो ससा शेवटी हरतोच. शांतपणे हळूहळू वाटचाल करणारा कासव हा नेहमी जिंकतो !’

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
