Homeलेखताटी अभंग लेखमालिका : ४

ताटी अभंग लेखमालिका : ४

“कठपुतळ्यांचा खेळ”

“दुर्लक्ष करा ! माफ करा ! म्हटलं तर अनेकदा आपल्याला पटत नाही; स्वाभाविक आहे! आपण काही जितेंद्रिय नाही, साधूसंत किंवा तपस्वी नाही ! मनावर झालेला एखादा घाव बुजवायला कित्येक दिवस, कित्येक वर्षे खर्ची पडतील…! अशा वेळी स्वतः जळत असताना, समोरच्याला सहज सोडून द्यायचे ? नाही, नाही ! अजिबात नाही !
एका ज्ञानियाने तर थेट तुकाराम महाराजांचाच दाखला दिला—
‘देव्हाऱ्यावरी विंचू आला। देवपूजा नावडे त्याला॥
तेथें पैजारेचें काम।अधमासी तों अधम ।।’
आता साक्षात तुकाराम महाराज सांगतात, म्हणजे ते योग्यच असणार! विंचवाची नांगी जिथल्या तिथे ठेचलीच पाहिजे. पण, इथेच तर थोडासा वेगळा विचारही आहे; एखादा-दुसरा विंचू असेल तर ठीक, ठेचू आपण त्यांना! पण विंचवांची रांगच लागली असेल तर ? ठेचत बसणार की पूजा करणार? आपल्या रोजच्या व्यवहारातले उदाहरणच घ्या ना…

जगात अनेक गोष्टी घडत असतात; त्याबद्दलचे आपले मत समूहापेक्षा वेगळे असू शकते. अशा वेळी काही जण आपल्याशी चर्चा करतात, तर काही जण ट्रोलिंग! चर्चेला उत्तर दिले जाऊ शकते; पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करणेच बरे, नाही का? काही वेळा आपलीच उंची एवढी वाढवावी लागते की कुणी फेकलेला चिखल आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही! आणि त्या अवस्थेला पोहोचायचे असेल, तर सतत कार्यरत राहायला हवे; कुणी कितीही त्रास देत असला तरीही! कारण, प्रत्येक लढाई जिंकता येत नाही; अंतिम उद्देश तेवढा महत्त्वाचा. म्हणूनच मुक्ताई म्हणतात – ‘योगी पावन मनाचा। साहे अपराध जणाचा॥’
इथे सामान्य राग-लोभाची चर्चा नाही, लौकिक जय-पराजयाचा प्रश्न नाही; तर स्वतःच्या अंतरात्म्याशी भिडण्याचा विषय आहे! जगातल्या या सगळ्या उठाठेवी आपण का करतो? दिवसाखेरीस शांत झोप मिळावी म्हणूनच ना? मग आधी मनच शांत करून बाकी व्यवहार सांभाळला तर? करू द्या कुणालाही काहीही उठाठेवी… आपली शांती ढळलीच नाही, तर कोण काय बिघडवणार ?

‘विश्व रागें झालें वन्ही। संती सुखें व्हावें पाणी॥’
जगाने वणव्याचे रूप घेतले, तरी महासागर नाही जाळू शकत! आपण आतून शांत झालो, तर बाहेरची धग आपल्याला अस्वस्थ करू शकणार नाही. उलट आपली शांतताच बाहेरचा गोंगाट थांबवेल. आपण कशाला तिकडे वेगळे लक्ष द्यायचे ?पण मग याचा अर्थ इतरांकडे संपूर्ण दुर्लक्षच करायचे का? नाही! कोणी टीका करत असेल, तर त्यातून स्वतःचे आत्मपरीक्षण नक्की करावे; पण विखाराला उत्तर देऊ नये. मुक्ताई म्हणतात— ‘शब्दशस्त्रें झालें क्लेश। संती मानावा उपदेश॥’
“समोरच्याचा उद्देश काहीही असो, आपण मात्र भलं ते घ्यावं! ‘माझं तेच खरं’ म्हणण्यापेक्षा, ‘खरं ते माझं’ म्हणून पुढे सरकत राहावं. बिनकामाच्या शर्यतीत उर फुटेस्तोवर धावण्यात काय हशील? त्यापेक्षा शांतपणे ‘साक्षी’ व्हावे! हे विश्व म्हणजे तरी काय ? कठपुतळ्यांचा खेळ !

इथे सगळ्याच बाहुल्या हिरहिरीने नाचताहेत… पण त्यांचा दोर कुणाच्या तरी भलत्याच्याच हातात आहे. तो दोऱ्या ओढतोय म्हणून हा थयथयाट चाललाय. पुन्हा मुक्ताईंच्याच भाषेत सांगायचे तर—
‘विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥’
या ‘ऑटो ट्यून’मधून बाहेर पडायचं असेल, स्वतःची धून लिहायची असेल; तर आधी यातून बाजूला व्हायला हवं. प्रतिक्रियांच्या जंजाळातून बाहेर निघायला हवं. स्वतःचा दोर शोधून ताब्यात घ्यायला हवा. मग पुढची वाटचाल कठीण नाही !”
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments