Homeलेखआनंदी भूतान...

आनंदी भूतान…

सर्व जग आपली प्रगती पैश्यात मोजत असताना चिमुकल्या भूतान देशाने जगाला आनंदी निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना दिली. वाचू या, या आनंदी भूतान विषयी लिहीले आहे श्री जयंत वाकोडकर यांनी.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे स्वागत आहे.
— संपादक.

भूतान मध्ये नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तिथे जाण्याचा योग आला आणि त्या बरोबरच भूतान बघण्याचा योग आला.

बऱ्याच वर्षापासून भूतान या देशाबद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्षात हा देश पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. सुखद, मनाला व शहराला प्रफुल्लित व उत्साहवर्धक निसर्गाचे सान्निध्य येथे मिळाले. दाट झाडी, जंगल, वळणावळणाचे रस्ते, धबधबे, खळखळणाऱ्या नद्या, भरपूर ऑक्सिजन यामुळे मन खूप प्रसन्न झाले. या सगळ्या गोष्टीचा मनमुराद आनंद घेता आला.

या देशाविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी लक्षात आल्या. फक्त आठ लाख लोकसंख्येचा हा देश असून ३८३९४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. वीस जिल्हे आहेत. भूतान मध्ये राजसत्ताक पद्धती असून जिग्मे घेसर वांगचूक हे विद्यमान राष्ट्रप्रमुख आहेत. तेथील लोकांमध्ये राजा बद्दल अतिशय आदर आहे. राजाला ते देवाचे रूपच मानतात.

17 डिसेंबर भूतानचा स्वातंत्र्य दिन. जोगंखा ही त्यांची राष्ट्रभाषा आहे. टकीन हा राष्ट्रीय प्राणी असुन तिरंदाजी हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे. या देशाचा 70 टक्के भाग हा जंगलाने व्यापला आहे. निसर्गाप्रती लोकांच्या मनात अपार प्रेम व श्रद्धा असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे 75 टक्के पेक्षा जास्त लोक हे बौद्ध धर्माला मानणारे आहेत. हिंदूंची संख्या बरीच कमी आहे. तेथील नागरिकांना शिक्षण आणि आरोग्यसेवा ही मोफत उपलब्ध आहे. काम करणाऱ्या लोकांमध्ये मुलींची व महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून त्या अतिशय मेहनती, कष्टाळू आणि विशेष म्हणजे खूप हसतमुख असल्याचे पहावयास मिळाले.

येथील लोक खूप आनंदी व समाधानी आहेत. भौतिक सुखसोयीपेक्षा आनंदी व समाधानी वृत्तीला त्यांच्याकडे खूप महत्त्व आहे. ग्रॉस नॅशनल हॅपिनेस या संकल्पनेला त्यांच्याकडे अनन्यसाधारण असे स्थान आहे. घरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना हे त्या देशाचे वैभव आहे.

भूतान मध्ये गुन्ह्याचे प्रमाण नगण्य असून लोक कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. वाहतुकीला शिस्त असून कोणीही नियमभंग करत नाही हे विशेष. तिथे कुठेही सिग्नल यंत्रणा नाही, कोणतेही वाहन पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतेला देखील तिथे खूप महत्त्व आहे.

भारत व भूतानचे संबंध अतिशय सुलोख्याचे व मैत्रीपूर्ण असे आहेत. भारताला ते आपला मोठा भाऊ समजतात. हायड्रोपावर म्हणजेच जलविद्युत निर्मितीमध्ये भुतानने भारताच्या सहाय्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पर्यटन, शेती व लाकूड उद्योग हे तेथील लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. शेतीमध्ये तांदूळ, गहू, बटाटा अशी पिके घेतली जातात.

भूतानमध्ये, पारो येथे एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते सुद्धा वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. तेथील हवामानामुळे दुचाकी किंवा तीन चाकी वाहने पाहण्यात आली नाहीत.

विवाह या विषयाबाबत अधिक माहिती घेतली असता तेथील लग्न अतिशय साध्या पद्धतीने, उधळपट्टी न करता व कमी खर्चात होतात. मुलाच्या व मुलींच्या आई-वडिलांची संमती असली की कुठलाही मोठा समारंभ न करता साध्या पद्धतीने लग्न संपन्न होतात. घटस्फोटाचे प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणात नाही असे कळले. हुंडा देणेघेणे हा प्रकार नाही असे तेथील गाईडने सांगितले.

निसर्गाने भरभरून दान या देशाला दिले आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा छोटासा देश जगात आठव्या क्रमांकावर आनंदी देश म्हणून ओळखला जातो. येथील लोक खरच प्रेमळ, आनंदी तर आहेतच पण त्यांच्यात हॉस्पिलिटी हा गुणधर्म जाणवला.

माझ्या अनुभवातून व आकलनानुसार भूतान समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

जयंत वाकोडकर

— लेखन : जयंत वाकोडकर. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments