माणसाने भरपूर प्रवास करावा. प्रवासाचे साधन कोणतेही असू दे, मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळेल शक्य असेल तेव्हा प्रवास जरूर करावा. बऱ्याच जणांना प्रवास म्हटलं की कंटाळा येतो, फिरायची हौस असते मात्र प्रवास कंटाळवाणा वाटतो. मी मात्र प्रवास खूप एन्जॉय करतो.योगायोगाने मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप प्रवास केला आहे. फिरणे आणि प्रवास यातही फरक आहे. मात्र तो तुम्हाला समजला तरच तुम्ही प्रवास एन्जॉय करू शकता. अन्यथा त्याची मजा तुम्हाला घेता येत नाही.
मी आजपर्यंत जवळपास सर्वच उपलब्ध वाहनातून प्रवास केला आहे. अगदी पायी प्रवासापासून, ते विमानापर्यंत सर्वच माध्यमातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळे ते सर्व अनुभव माझ्यासाठी एक मस्त आठवणींचा ठेवा आहे. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव तुम्हाला देत असतो, फक्त तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. प्रवासाच्या आठवणींच्या खिडकीतून डोकावणं मला नेहमी आवडतं. माझं आजोळ विदर्भातील देऊळगाव (ब्राह्मण) हे गाव. पातुर तालुक्यात ते येतं. माझ्या लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत अकोल्याला जायचो. मग मावशीच्या घरी आम्ही सगळे आत्ते, मावसभाऊ-बहीण असे एकत्र यायचो. आणि मग आम्ही देऊळगावला निघायचो.
अकोल्यात दोन बस स्टॅन्ड होते. जुना बस स्टँड आणि नवीन बस स्टँड. आताही कदाचित असतील, पण मला कल्पना नाही. त्यावेळी मात्र देऊळगावला निघताना देऊळगाव साठी बस कोणत्या स्टँडवरून मिळेल याविषयी घरातील मोठ्यांची चर्चा चाललेली असायची. ही चर्चा ऐकण्यातही गंमत वाटायची. बसचा प्रवास म्हटलं, की आमच्या विदर्भातील ती एक खूप मोठी सर्कसच असते. त्यात आमच्या भावंडांपैकी काही जणांना बस लागणं हा प्रकार होता. बस लागणे म्हणजे बस मध्ये बसले की मळमळ होऊन उलटी होणे. मला मात्र जगातील कोणत्याही वाहनात असा त्रास कधीच झाला नाही. मात्र जेव्हा आम्ही निघायचो, तेव्हा मग त्या काही खास प्राण्यांना ती एक प्रवासी गोळी देणे, त्यांनी काही खाऊ नये ही काळजी घेणे, जास्त पाणी पिऊ नये म्हणून सूचना करणे, असा सगळा प्रकार सुरू व्हायचा.
जुन्या आणि नवीन बस स्टँड बाबतची चर्चा संपली की मग आम्ही मुलं सायकल रिक्षा मागवायला जायचो. तेव्हा अकोल्यात ऑटो फार कमी होते. रिक्षा म्हटलं की सायकल रिक्षाच असायची. या सायकल रिक्षाला खाली घुंगरू बांधलेले असायचे. किंवा त्यावेळी कोलगेट टूथ पावडर मिळायची, जी पत्र्याच्या डब्यात असायची. त्या टूथ पावडरच्या रिकाम्या पत्राच्या डब्यात रेती टाकून ते सायकलच्या एक्सेलला बांधले जायचे. त्यामुळे ही रिक्षा चालताना एक विशिष्ट आवाज यायचा. या रिक्षाला आम्ही “छुन्नुक छुन्नुक ची रिक्षा” असे म्हणायचो. मग चौकात जाऊन चांगल्या तीन चार रिक्षा आम्ही आणायचो. कारण आमची फौज मोठी असायची. रिक्षावाल्याची रिक्षा ठरवताना किती सवारी आहेत, आणि कुठे जायचे आहे, यावरून मग किती पैसे घेणार याबद्दल चर्चा व्हायची. ही घासाघीस चांगली पंधरा-वीस मिनिटे चालायची. सवारी मध्ये लहान मुलं किती, मोठी माणसे किती, हे सर्व सांगणे आवश्यक असायचे. कारण ही रिक्षा प्रत्यक्ष माणूस चालवायचा त्यामुळे त्याला तो अंदाज घेणे आवश्यक असायचे.

प्रत्यक्ष रिक्षा दरात आल्यावर मात्र आम्ही पंधरा-वीस जण आमच्या हिशोबाने सामान घेऊन त्या रिक्षांवर चढाई करायचो. मग पुन्हा ते रिक्षावाले आणि आमच्या घरातील मोठे यांच्यात वाद सदृश्य चर्चा सुरू व्हायची. आम्ही बिनधास्त आमच्या हिशोबाने रिक्षात चढून धमाल करायचो. मग थोड्यावेळाने रिक्षावाला आणि आमच्या घरचे मोठे यांच्यात काहीतरी मार्ग निघायचा, आणि आम्ही सगळे बस स्टँडच्या दिशेने निघायचो. हा सायकल रिक्षाचा प्रवास म्हणजे थोडे फास्ट पायी चालण्याच्या पलीकडे नसतो. स्टॅंडवर पायी गेलो तर जिथे अर्धा तास लागायचा तिथे ही रिक्षा 20 मिनिटे घ्यायची. फक्त आपले शारीरिक श्रम वाचतात हा एकच भाग त्यात होता. सामान उचलून पायी जाण्यापेक्षा ही रिक्षा बरी असायची. ऑटो रिक्षा मात्र त्याकाळी परवडायची नाही. ऑटोने जाणे म्हणजे जणू काही विमानानेच जातोय असे वाटायचे.
सगळे मग नवीन स्टॅंडवर पोहोचायचो. इथे आल्यावर पातुरला जाणाऱ्या बस मध्ये बसण्याची वेगळी कसरत करावी लागायची. त्यातही मग आई, मावशी, यांची बडबड सुरू व्हायची. नवीन स्टॅन्ड ऐवजी जुन्या स्टॅन्ड वर गेलो असतो तर डायरेक्ट देऊळगाव ला जाणारी बस मिळाली असती वगैरे वगैरे….
या सगळ्या गोंधळात आम्ही बच्चे कंपनी त्या आधीच गर्दी असलेल्या बस स्टैंड वर आमचा धुमाकूळ सुरू करायचो. एकेका गावाला जाणाऱ्या त्या खास लाल बसचे आम्हाला आकर्षण होतेच, मग त्यातही छान चमकदार लाल रंगाची बस कोणती, बसते दार पुढे आहे की मागे वगैरे निरीक्षण आमचे सुरू व्हायचे. अचानक आम्हाला सांगण्यात यायचे की अमुक ठिकाणी येणारी बस आपली आहे तिथे जाऊन उभे रहा. मग आम्ही सगळे त्या बसच्या फलाटावर गर्दी करून उभे राहायचो. बस आली रे आली, की काही जण बसच्या दाराचा ताबा घ्यायचे, आणि काही जण बसच्या खिडकीतून रुमाल किंवा छोट्या सामानाच्या पिशव्या टाकून सीट पकडून ठेवायचे. उतरणारे, चढणारे, आणि खिडकीतून सामान टाकून जागा पकडणारे, सगळा एकच गोंधळ उडायचा. यात तेव्हा वेगळीच मजा यायची. ही सगळी लढाई पार करून आम्ही आत स्थिर स्थावर झालो की मग कंडक्टर बरोबर पुढील वाद असायचा. तो म्हणजे या सगळ्यात किती हाफ तिकीट आणि किती फुल तिकीट. बाबा, मामा, काका, आणि कंडक्टर अर्धा प्रवास होईपर्यंत हा वाद सुरू असायचा. आमच्यातील काही मुलांचे तो कंडक्टर पूर्ण तिकीट मागायचा. मग पातुर जवळ येऊ लागली की त्यातून काहीतरी मार्ग काढून हा वाद मिटायचा.
इतक्यात खामगावला माझे जाणे झाले होते. तिथे जेव्हा अकोल्यासाठी बस पकडायला मी उभा होतो, तेव्हा समोर एक बस आली आणि ती बस स्टॉप वर आल्याबरोबर लोकांची प्रचंड गर्दी दाराजवळ आणि खिडक्यांजवळ झाली. अगदी आजही मी ते रुमाल टाकून जागा पकडणे बघितले, आणि लहानपणीचे हे सर्व आठवले. मान्य आहे आज आपल्या देशाने बरीच प्रगती केली आहे. आज रस्त्यावर खाजगी वाहनांची संख्या ही वाढली आहे. खुद्द माझ्याकडे आज पाच गाड्या आहेत. तरीही बस संस्कृती आजही काही ठिकाणी अनिवार्य आहे. आजही त्या बसमध्ये गर्दी कायम आहे. अशा प्रवासाचा त्रास नक्कीच होत असेल, पण त्यात आजही एक मजा आहे हे नक्की.
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
