1) आगळा नटसम्राट
मुरूडचे विश्वनाथ दिनकर पाटील
एक जानेवारी एकावन्न ला ते जन्मले
नाना पाटेकर म्हणून राज्यात लौकिक
शिक्षणासाठी नंतर ते मुंबईला गेले -१-
बालपण हलाखी नि संघर्षात सोसले
स्पष्टवक्ते परखड रोखठोक नि साधे
जिद्द आणि चिकाटीचे मूर्तीमंत प्रतिक
खडतर आर्थिक स्थिती मुळे केली कामे -२-
कसदार दमदार भूमिकांनी लक्षात
अभिनय मराठी नाटके सिनेमात तो
मराठी रंगभूमी नि हिंदी चित्रपटात
प्रसिद्धी मिळूनही पाय होता मातीत तो -३-
गरीब शेतकऱ्यांच्या दुःखात ते सामील
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबा साह्य
नाना मकरंद यांची नाम फाऊंडेशन
नैसर्गिक आपत्तीत दिला हात सहाय्य -४-
निस्वार्थ जनसेवा करणारे देवरूप
पुनर्वसनाने दिली ती मायेची सावली
दुष्काळग्रस्त भागात कार्य त्यांचे अजोड
आत्मीयता त्यांची सामान्य जनांना भावली -५-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुनावळे, पुणे
2) नाना
आज मला कोणीतरी म्हणाले की
तू एवढ्या साहित्य रचना लिहितेस
मग नानांसाठी पण काही ओळी लिही
मला लिहायला सांगितले हे माझे भाग्यच
मग मी शब्दांकडे वळाले आणि विचारले,
“अरे अरे शब्दा, मला मदत करशील का ?
नानांसाठी लिहायला”
शब्द आधी तर निशब्द झाले
मग ते बोलले, “नानांसाठी हो ना,
शब्दांचे खरे ‘अंकुश’ त्यांनीच तर पेरले
जेव्हा शब्दांवर झाला घात
तेव्हा आमच्यासाठी नानांनी केला ‘प्रतिघात’
आम्हा शब्दांना बनवले ‘नटसम्राट’
आता नाना नाही राहिले,
आमच्यात उठला केवढा ‘कोहराम’
झालो आम्ही निशब्द तेव्हा दिसले ‘देऊळ’
केले आम्हा शब्दांनी तिथे ‘गमन’
तिथे जाऊन अक्षरांनी केले ‘अंधा युद्ध’
देऊ झाले अक्षरांनी, ‘हाउसफुल’
अक्षर बोलले देवाला, ‘अब तक छपन्न’ आले
अजून,’तडका’ देणारे येतीलच
अक्षरांचा हा देवांनी बघितला,’प्रहार’
देव बोलले अक्षरांना,
‘गीध’ प्रमाणे घिरट्या घालत का आलात.
सांगा लवकर कोण होणार
आता इथे ‘माफीचा साक्षीदार’
‘पक पक पकाक’ करत सगळेच अक्षर उडू लागले
अक्षर पुन्हा बोलले देवाला,
‘होते नाना एक श्रेष्ठ ‘पुरुष’
होते एक ते वास्तव ‘शागीर्द’
माणसातील ‘आपला माणूस’ कसा हरवला ?
सांगताना शब्द हे शब्दांनाही पाझर फुटला
समजावले मग मी सगळ्या अक्षरांना
“नाहीच विसरणार कोणी नटसम्राट नानांना,”
शब्दरूपी अक्षरांची श्रद्धांजली ही माझी नानांना
— रचना : सौ श्वेता गांधी. (राणी) पुणे
3) नाना पाटेकर
काळाच्या पडद्याआड
जाऊन देखील जो
हृदयाच्या पडद्यावर
कायमस्वरूपी राज करेल
असा एक नटसम्राट,,!!
देवाच्या दारापुढे
कधीही हात न पसरवता
मानवतेची मशाल शेवटच्या
श्वासापर्यंत पेटवून ठेवणारा
खराखुरा देव माणूस,,!!
राजकारणाच्या चिखलापासून
कायमस्वरूपी अलिप्त राहून
प्रत्येक नेत्याला समाजसेवा
कशी करावी याची शिकवण
देणारा एक खरा समाजसेवक,,!!
एखादी भूमिका निभवताना
त्यामध्ये स्वतःचे कला, गुण नाही
तर संपूर्ण जीव ओतून देणारा
एक महान कलाकार,,!!
दिखाव्याच्या दुनियेपासून
कायमस्वरूपी दूर राहून
साधं आणि सरळ जीवन जगणारं
एक असामान्य व्यक्तिमत्व,,!!
निराधार शेतकरी कुटुंबाच्या
पाठीशी उभा राहून प्रत्येकाला
मनापासून आपला वाटणारा
आपल्या मातीतला माणूस,,!!
‘माणूस म्हणून जन्माला आलो
तर माणूस म्हणून मरता यायला हवे’
याची शिकवण संपूर्ण मानव जातीला
देणारा एक खरा महानायक,,!!
फक्त महाराष्ट्राच्या मातीलाच नाही
तर संपूर्ण देशाला पोरका करुन
त्याच्या पुढच्या प्रवासाला
काही न सांगता निघून गेला,,!!
काही न सांगता निघून गेला,,!!
— रचना : पूनम सूलाने- सिंगल
4) शब्दरंगी उरला नाना
सामर्थ्य सम्राट
रंगभूमी तेजोमय
हरवला कलाकार
अभिनयी पाटेकर
लुप्त जाहला आधार
सामर्थ्याच्या सम्राटाने
लाखो हृदय जिंकून
बाॅलिवूड क्षेत्रामध्ये
अलौकीक मिळवून
बाबा आमटे कार्याचा
केला गौरव अमाप
आदिवासी बांधवांना
प्रतिसाद रूपी छाप
देशसेवा करण्यात
शस्त्र हाती योद्धा वीर
गाव दत्तक घेऊन
सहाय्यक देई धीर
साधी रहावे उच्चत्वे
मनी अखंड विचार
नाना नावाची अस्मिता
नेतृत्वात सद्विचार
फाऊंडेशनचे कार्य
आत्महत्या करी रोध
जल समस्या निवारी
कीर्तीवंत देई बोध
शब्दरंगी सिनेसृष्टी
केले पोरके आपणं
परतून यावे नाना
पुष्पांजली समर्पण
— रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई
5) 🌷*नाना*🌷
युगाचा जाहलासे अंत
अभिनयाने तो जिवंत
नियतीने केला हो अंत
लागली सकलाना खंत….
असा काही नटसम्राट
गावेत तयाचे गुणगान
सर्वांस निस्वार्थी सम्राट
खरोखर होता गे शान…
देहात अभिनय भिनला
जगामाजी तो गाजला
मनीमानसि गे राहिला
स्वभावे अमर जाहला…
पाण्यासाठी तो फिरला
गावात प्रश्न सोडवण्यास
वंचितासाठी गहिवरला
गरजूना मदत करण्यास….
स्वधनाचे दान ते केले
आदर्श जगात दाविला
जन्मातच सार्थक झाले
कर्माने सजग राहिला….
अत्यन्त होती गरिबी
अभिनेता असामान्य
राहिला ना तो हिशोबी
दान करून जगतमान्य…
माणुसपण ते जपले
कुणा कधी न भ्यायला
जीवनी साधेसे वागले
समाजासाठी जगला…
— रचना : मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
