Homeलेखजीवन म्हणजे काय ? : 21

जीवन म्हणजे काय ? : 21

आश्वासक शब्द….
प्रत्येकाला आपले सहजीवन सुखी व यशस्वी व्हावे असे मनापासून वाटते. हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपले सहजीवन यशस्वी व्हावे अशी स्वप्न तरुण-तरूणी पहात असतात. याबाबत धर्मेंद्र व राखी गुलजार या दोघांवर एक सुंदर गाणे चित्रित झाले आहे .
‘झिलमिल सितारों का आंगन होगा
रिमझिम बरसता सावन होगा
ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा
प्रेम की गली मे एक छोटासा घर बनायेंगे
कलिया ना मिले तो काटो से सजायेंगे।

आपले सहजीवन सुखी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने प्रयत्न केला तर कुटुंब व्यवस्था अधिक सुदृढ होण्यास मदत होईल. प्रेमविवाहात तर जोडीदार स्वतः निवडलेला असतो त्यामुळे सहजीवन आनंदी, समाधानी करण्याची जबाबदारी त्या दोघांवर अधिक असते. एकमेकांसाठी वेळ देणे, समजून घेणे, सहकार्य, प्रेम आणि विश्वास यातूनच सहजीवन फुलत.

पूर्वीच्या काळात घरात भरपूर माणसे, लहान मुलं असत. आर्थिक परिस्थिती बेताचीच असे, अडचणी असत पण 50- 60 वर्ष निगुतीने संसार करणारे होते. त्यांचे संसार समाधानाचे होत असत.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे हे वास्तव असून संसार किती वर्षे टिकेल हा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. पहिले काही वर्ष रोमांचकारी असतात; नंतर मात्र हळूहळू धुसफुस, ताणतणाव वाढत असल्याचे पाहण्यात येते.

आपले सहजीवन यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. त्यामध्ये प्रेम व एकमेकांवरचा अतूट विश्वास, आदर, सन्मान, गुण व दोषासहित स्वीकार, समजूतदारपणा, मनमोकळा संवाद व सहकार्य या गोष्टीचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.याशिवाय सहजीवन आनंदी होण्यासाठी एकत्र बसून वेळेचे नियोजन करणे, जोडीदार, आई-वडील, मुलं यांच्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच ‘ तुझा पैसा’ ‘ माझा पैसा’ असे न करता आपल्या दोघांचा पैसा असा विचार दोघांनी केल्यास संसार सुखाचा होईल.

आज-काल एक विषय खरच वादाचा झाला आहे. घरातील कामे कोणी करायची हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. एकमेकांच्या साथीने व समजून-उमजून हे प्रश्न मार्गी लागू शकतात.
दोन व्यक्ती एकत्र आल्यास वाद होणे साहजिक आहे पण त्याला गंभीर स्वरूप येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. अयोग्य व मन दुखावेल असे बोलणे टाळता आले तर सहजीवन समाधानी होण्यास मदत होईल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इगो ( अहंकार) बाजूला ठेवणे. खरंतर ही गोष्ट एवढी सोपी नाही पण त्याला पर्यायही नाही. अपेक्षा मर्यादित ठेवल्या तर त्याचे ओझे वाटणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केल्यास घर हे गोकुळ होईल यात शंका नाही.
तू आणि मी असा विचार न करता आम्ही दोघे, आई-वडील, नातलग, मुलं स्नेहीजन असा दृष्टिकोन असला पाहिजे.

सध्या प्रसारमाध्यमांनी धुमाकूळ घातला असून टीव्ही, मोबाईल, व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम इ. च्या अतिवापरामुळे कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या आभासी जगताचा विपरीत परिणाम होतो हे नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणजे कुटुंबात संवाद व सहवास वाढला पाहिजे. सुसंवाद हे कोणत्याही प्रश्नावर रामबाण उत्तर ठरू शकते. प्रसंगानुसार एकमेकांचं कौतुक करणे व जोडीदाराला प्रोत्साहन देणे यातूनही सहजीवन सुखी होऊ शकते. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही हे मान्य करूनच पुढील वाटचाल केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतात.

मुलांचे संगोपन हा सुद्धा आनंदाचा व जबाबदारीचा विषय आहे. मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभला तर मुले अधिक आनंदी व सुरक्षित राहतात हा अनुभव आपणास बऱ्याच ठिकाणी येतो.
या सगळ्या गोष्टी आपणा सर्वांना निश्चितच माहित आहेत. फक्त त्या प्रयत्नपूर्वक अमलात आणणे याची नितांत आवश्यकता आहे.
सध्याची तरुण पिढी खूप शार्प आहे. टेक्नोसेव्ही आहे. शिक्षण व त्यांच्या करिअर बाबत जागृत आहे. गरज आहे ती आपापली स्पेस सांभाळत, एकमेकाला समजून घेत व परस्परपूरक असण्याची. पतिपत्नी हे दोघे जीवनसाथी असतात याचे भान प्रत्येकाला असणे खूप गरजेचे आहे. दोघांचाही व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. आणि हे फक्त सुखी सहजीवनामुळेच शक्य आहे.

कुटुंब सुखी समाधानी असेल तर समाज व देश याची प्रगती झपाट्याने होण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी ‘मैं हूॅं ना’ असा विश्वास दोघांसाठी आश्वासक आहे असे वाटते.
यक्षाने धर्मराजाला एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे गृहस्थाचा मित्र कोण ?
त्याचे सार्थ उत्तर धर्मराजानी दिले ते म्हणजे ‘ पत्नी हाच गृहस्थाश्रमातील माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो.’
हे मैत्रीचे नाते दोघांनी जपले तर निश्चितच सहजीवन सुखी व आनंदी होऊ शकेल.

— लेखन : जयंत वाकोडकर नांदेड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण