अरेरे संपली ती दिवाळी! ही दिवाळी संपल्याची रुखरुख आमचे लहानपण अगदी दुःखी करून जायची. तेव्हा दिवाळीला आम्ही दिवाळीच म्हणायचो. दीपावली वगैरे नाही. त्या काळात आम्हाला शाळेत तीन आठवड्यांची सुट्टी असायची. दिवाळीच्या आधीचा, दिवाळीचा आणि नंतरचा. त्याच्या आधीच एक आठवडा दिवाळीची सुट्टी लागणार, या कल्पनेने आम्हाला कमालीचा आनंद व्हायचा. तो हल्लीच्या पोरांना नाही कळणार. त्या आनंदाचं मुख्य कारण म्हणजे सहा दशकांपूर्वीचा काळ आजच्या तुलनेने गरिबीचा होता. त्यामुळे नवे कपडे, गोडधोड खाणे हे वाट्टेल तेव्हा नसायचं. त्याला सणासारखा मुहूर्त जरूर असायचा आणि दिवाळीचा सण म्हणजे तसा सगळ्या सणांचा बाप! त्याच सुमारास कामगारांना बोनसदेखील मिळायचा. त्यामुळे प्रत्येक कुटुंब आपापल्या ऐपतीपेक्षा दिवाळीत जास्त खर्च करायचं. ‘दिवाळं’ हा शब्द ‘दिवाळी’वरूनच आला असावा.
सुट्टीच्या आधीच आमचं प्लॅनिंग सुरू व्हायचं. कुठे भटकंती करणार, वडिलांनाही दिवाळीत सुट्टी असायची, त्यामुळे घरातली सायकल आपल्या बापाचीच असल्याप्रमाणे आम्ही वापरायचो. दिवाळीचा किल्ला सगळ्यात भारी कसा बनवणार, कोणकोणते फटाके फोडणार वगैरे. हो, पण जसं आम्ही पोरं प्लॅनिंग करायचो, तसे आमचे शाळामास्तरही करायचे. प्रत्येकजण दिवाळीचा गृहपाठ द्यायचा. त्यात कविता पाठांतर, निबंधलेखन, काही गणितं, विज्ञानाचे प्रश्न, भूगोलातील नकाशे, इतिहासातील प्रश्न वगैरे वगैरे. तसा थोडासा म्हणत ते भरपूर गृहपाठ द्यायचे. ‘हा गृहपाठ करणार ना?’ असं विचारल्यावर आम्ही मुकाट्याने ‘होss’ म्हणायचो. दिवाळीच्या सुट्टीनंतर वर्गात एकेकाचा गृहपाठ सार्वजनिकपणे तपासला जायचा. तेव्हा मास्तर लोकांची दहशत होती. त्यांच्या हातात रूळ, छडी, पट्टी ही असायचीच.
तर अशी ही दिवाळीच्या सुट्टीला सुरुवात व्हायची. आम्ही, ‘आपण बुवा सगळा गृहपाठ दिवाळीच्या सणाच्या आधीच पूर्ण करून दिवाळी मस्त एन्जॉय करणार,’ असा दर दिवाळीत संकल्प सोडत असू किंवा तत्सम गप्पा मारायचो. अर्थात, गप्पा मारणे आणि त्या प्रत्यक्षात उतरवणे यात नेहमी अंतर असायचे. सुट्टीच्या पहिल्या दिवशी ‘आजच सुट्टी लागलीये, ते दप्तर नाही बघणार’ म्हणून अभ्यासाला दांडी. दुसऱ्या दिवशी मित्रांबरोबर भटकंतीत वेळ गेला म्हणून, तिसऱ्या दिवशी गोट्या-क्रिकेट खेळण्यात जास्त वेळ गेला, चौथ्या दिवशी आईला फराळाचे पदार्थ करण्यात थोडीशी मदत केली म्हणून… (हां, फराळाचे पदार्थ घरीच केले जात. फराळाचा खमंग वास सर्वत्र दरवळे. एखादाच पेढे-बर्फी सारखा पदार्थ बाजारातील असे.) पाचव्या दिवशी आमच्यात क्रिकेटची मॅच ठरली होती. सहाव्या दिवशी फटाके खरेदी करायला पुन्हा पुन्हा जावे लागले. म्हणजे एकदा मित्राबरोबर तो काय घेतोय हे पाहायला, दुसऱ्यांदा स्वतःसाठी.
आता फटाके आणायला वडिलांनी पाच रुपये दिले की ‘फक्त पाच रुपयांत काय होणार?’ असा आमचा हेका. तो ऐकून ते दहा रुपये देऊन, ‘या उप्पर मात्र एक छदाम मिळणार नाही,’ अशी ताकीद द्यायचे. नंतर आम्ही फटाके आणायचो. त्यात ॲटम बॉम्ब, लक्ष्मी फटाका, इलेक्ट्रिक फटाक्यांची माळ, लवंगी फटाक्यांची माळ, साध्या टिकल्यांपर्यंत आवाजाचे फटाके असायचे. ते बघून आई म्हणे, ‘हे काय नुसतेच आवाजाचे फटाके का आणलेत ? शोभेचे का नाही आणलेत ?’ मग आम्ही आणखी पाच रुपये घेऊन फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्र असले आणायचो. आणखी दुसऱ्या दिवशी आमचा एखादा गरीब मित्र फटाके विकायला आला, तर त्याच्याकडून फटाके घेतलेच पाहिजेत, हे आई-दादांनाही पटायचं. म्हणून अशा रीतीने पुन्हा फटाके खरेदी करायचो. हे मात्र हळूहळू ऐपतीच्या बाहेर जायचं.

आकाशकंदील देखील आम्ही स्वतः बनवायचो. त्यामुळे पंचकोनी चांदण्या जास्त दिसायच्या. त्या काळी आणखी एक प्रकार लोकप्रिय होता, तो म्हणजे किल्ला बनवणे. त्यात खर्च कमी आणि घरातल्या वाया जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी उपयोगात आणायचो. सायकलचे जुने टायर, ट्यूब गेलेले बल्ब, जुन्या वायरी, बांबूच्या कामट्या, नारळाच्या करवंट्या, जुन्या सिनेमांच्या फिल्म्सची वाया गेलेली रिळं वगैरे, जे हाती लागेल ते. घराच्या अंगणात असा मातीचा किल्ला बनवणे हे एक व्यसन होते. हळीव पेरले तर ते लवकर उगवतात, ही माहिती आम्हाला आमच्या आईकडून मिळाली. त्यामुळे आम्ही हळीव पेरायचो आणि दिवाळीच्या सुमारास किल्ल्यात ते छान शेत दिसायचे.
किल्ला म्हटलं की शिवाजीमहाराज पाहिजेतच. बाजारात अनेक छोटेखानी शाडूचे किंवा साध्या मातीचे पुतळे, खेळणी मिळायची. शिवाजीमहाराज हे सगळ्यांचेच दैवत. तसे शिवाजीमहाराज खूप असायचे—उभे, सिंहासनावर बसलेले, घोड्यावर बसलेले वगैरे. त्यातला एक निवडणे कठीण जायचे. बाकी सैन्य, पायदळ, घोडदळ, जनावरे, वाघ, गाय वगैरे प्राणी आणि काळी दाढी असलेले शत्रुसैन्य देखील असायचे. आम्ही मात्र कायम डोंगर-जंगल असा सीन घेऊन किल्ला बनवायचो, त्यामुळे घोड्यावरचे महाराज आमचे आवडते.

किल्ले खूपजण करायचे. आमच्यात स्पर्धा होतीच. साधारणतः सगळ्यांचे आई-वडील सगळ्यांचे किल्ले पाहून कौतुक करत; पण आम्हाला इतरांचे दोष काढताना मजा वाटायची. एकूण कलात्मक दृष्टी ही पुढली पायरी, पण सेन्स ऑफ प्रपोर्शन ही आधीची पायरी. महाराजांच्या पुतळ्यापेक्षा शेजारचे नारळाचे झाड जास्त उंच असायला हवे, ज्यांना हे कळत नसे, त्यांचे किल्ले बघताना मात्र आम्हाला हसू यायचे. कलात्मक दृष्टी नसलेले काही मित्र सिंहासनावरच्या महाराजांना जंगलात बसवत, तर कोणी घोड्यावरचे महाराज किल्ल्यातील दिवाणखान्यात आणत. काही जण तर आपल्या किल्ल्यात दोन ठिकाणी महाराज दाखवत. पण हद्द म्हणजे काही किल्ल्यांतून शिवाजीमहाराज असताना वरती दोरीवरून घरंगळणारे विमानदेखील असे. असो! आज किल्ले जरी नसले, तरी तीच लोकं नाटकं, सिनेमे, सिरियल्स बघतात आणि त्यांचा प्रोग्राम सेन्स सिनेमाचे आर्थिक यश ठरवतो. एनीवे, प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार किल्ले बनवत; पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला निर्मितीचा आनंद मिळे.
फटाके भरपूर आणले तरी दिवाळी चार दिवस चालते, त्यामुळे ते फटाकेसुद्धा पुरवून पुरवून उडवायचे. त्यामुळे लवंगी फटाक्यांचा जरी आम्ही सर उडवायचो, तरी ती श्रीमंती इलेक्ट्रिक फटाक्यांच्या बाबतीत मात्र नसे. एक मिनिटात सगळी माळ धाडधाड फोडण्यापेक्षा ती माळ आम्ही सोडवून त्यातले पन्नास एक फटाके सुटे करायचो आणि एकेक करीत तासभर फोडायचो.
दिवाळीची सुरुवात मात्र नरक चतुर्दशीला पहाटे पहाटे ॲटम बॉम्ब फोडून व्हायची. आई पहाटे आमच्या आधी उठून सगळी तयारी करायची. मग आम्हाला उठवायचा प्रयत्न करे; पण आम्हाला झोप अनावर. पण तेवढ्यात ॲटम बॉम्बचा आवाज ऐकला की मात्र लगेच उठायचो. बाजूला रांगोळी असलेल्या पाटावर बसून सुगंधी तेल, उटणे, मग अभ्यंग स्नानासाठी बाथरूम. त्याकाळी संडास-बाथरूम घरात नसत. बाहेर असत. शिवाय त्यात लाईट नसे. एरवी गरज लागली तर रॉकेलचा कंदील असे; पण दिवाळीच्या दिवसांत मात्र तिथे तिळाच्या तेलाची पणती तेवत असायची. मग नवे कपडे घालून, देवाला नमस्कार करून दिवाळीला सुरुवात व्हायची. हां, पण दिवाळीचे हे चार दिवस अगदी चार दिवसांत संपून जायचे.

अन् मग आठवण यायची ती त्या बदमाश गृहपाठाची. आता इथून आमचे दुःखी दिवस सुरू व्हायचे. एखादा हुशार, अभ्यासू, आगाऊ कार्टा आमच्या घरी येऊन स्वतःचा गृहपाठ पूर्ण झाल्याचं सांगून, ‘तुझा किती झाला?’ अशी चौकशी करायचा. हरकत नाही; पण हे सगळं तो आई-वडिलांच्या देखत विचारायचा. तेव्हा मात्र त्याचा संताप यायचा. असो. असतो एखादा असला खडूस.
पण आम्हाला आता डोळ्यांपुढे आमची मास्तर मंडळी दिसायला लागायची. मग आम्हालाही अभ्यास करणे आले. कविता पाठांतर म्हणजे ती दीर्घ कविता लिहून काढायची आणि पाठ आहे अशी बंडल मारायची. पहिल्या दोन ओळी यायच्या. तेवढ्यात मास्तर दुसऱ्याकडे वळले तर उत्तम; नाही तर मात्र सरळ सरळ, ‘मी सुट्टी लागल्या लागल्या पाठ केली होती; पण आता विसरायला झालीये,’ असं ठोकून द्यायचो. पण असं बोलायला मात्र हिंमत लागते. निबंध म्हणजे भरपूर लिहीत बसायचे. आम्ही एकमेकांचं पाहायचो. मास्तर सगळा वाचायचे नाहीत; पण किती पाने लिहिली आहेत ते बघायचे. त्यामुळे जरा छोटा वाटला, तर तेच ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दांत भरणे आले. हीच कला आज टीव्ही सिरियल लेखकांना उपयोगी पडते आहे.
अशा प्रकारे दिवाळी संपता संपता आम्ही अभ्यासाला लागत असू. तरी शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत तो पूर्ण झालेला नसायचा. तिथे आम्ही आमची तल्लख बुद्धी वापरायचो. उदाहरणार्थ, इतिहासाचा सोमवारी तास असतो, भूगोलाचा मंगळवारी. मग आधी इतिहासाची बंडलबाजी पूर्ण करा. भूगोलाचं सोमवारी रात्री बघू. तसेच गणितात देखील बीजगणित पुढे ढकलले जायचे. हा आमचा दिवाळीच्या गृहपाठाचा गुण आमच्या जीन्समध्ये गेला असावा; कारण पुढे कॉलेजात असतानादेखील दर वर्षी एप्रिलमध्ये परीक्षा असते हे माहीत असूनही आम्ही आधीपासून अभ्यास न करता तो मार्चमध्ये सुरू करत असू.
ही दिवाळीची आठवण झाल्यापासून मी राजकीय नेत्यांना शिव्याशाप देणे बंद केले आहे; कारण ते माझेच बंधू आहेत. इलेक्शन पाच वर्षांनी आहे हे माहीत असूनदेखील ते पहिली साडेचार वर्षे काही काम करत नाहीत. मतदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि हो, हल्ली हा गुण नोकरशाहीत देखील आलेला आहे. दर वर्षी एप्रिल ते मार्चचे बजेट असतं; पण खर्च शेवटी मार्च महिन्यातच एकदम सुरू होतो. असो!
आता बारा महिने मधुमेहाला आमंत्रण देणारे गोडधोड पदार्थ, फटाक्यांना लाजवेल असे ध्वनिप्रदूषण, केवळ जुन्याचा कंटाळा आला म्हणून नवे कपडे आहेत, मास्तरांच्याही हातात छड्या नाहीत; पण त्यामुळेच दिवाळी आल्याचा फार आनंद नाही, संपल्याचं दुःखही नाहीये. अरेरे,🥲😉 गेले ते दिवाळीचे दिवस !
— लेखन : चंद्रकांत कमल सदाशिव बर्वे. निवृत्त संचालक (मुंबई दूरदर्शन)
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
