‘नन्हे दिलं’
श्रीया तोरणे निर्मित हिंदी चित्रपटातून समान संधी, वागणूक आणि सन्मानाचा आग्रह. ‘मला इतर मुलांसारखीच संधी मिळेल का ?’ रघुनाथच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांसमोर उभा राहणारा हा प्रश्न, श्रीया तोरणे निर्मित हिंदी चित्रपट ‘नन्हे दिलं’ पाहिल्यानंतरही मनात रेंगाळतो. कपडे धुण्याचे काम करणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या रघुनाथला इतर मुलांइतकीच संधी, समान वागणूक आणि स्वतःच्या गुणांवर ओळख मिळवण्याचा हक्क आहे. हा विचार एका मुलाच्या कथेतून संवेदनशीलपणे मांडण्याचा चित्रपटाचा प्रयत्न यशस्वी आणि स्तुत्य ठरतो.

सर्वेशने रघुनाथची भूमिका सहजतेने साकारली आहे. तसेच त्याच्या आई वडिलांना मनात असलेला न्युनगंड लपवून रघुसाठी असलेली तळमळ दाखवण्यात यशस्वी झाला. सर्वेशच्या अभिनयामुळे रघुनाथच्या मनातली अस्वस्थता आणि आपल्यालाही संधी मिळावी ही त्याची अपेक्षा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. रघुनाथशी ही जवळीक निर्माण झाली की त्याचा प्रश्नही आपल्याला अधिक भिडतो. सुनील शेट्टी प्राचार्यांच्या भूमिकेत दिसतात. त्यांच्या व्यक्तिरेखेमुळे शाळेची जबाबदारीही अधोरेखित होते. प्रत्येक मुलाला वर्गात आपलेपणा वाटावा आणि आपले गुण दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी शिक्षक आणि शाळेची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा विचार चित्रपट करायला लावतो.

या कलाकृतीतून श्रीया तोरणे यांनी आपल्या रोजच्या वागण्यात सहज दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. एखाद्या मुलाची ओळख त्याच्या आई-वडिलांच्या व्यवसायावरून करून देताना आपण नकळत त्याच्या स्वतःच्या गुणांकडे दुर्लक्ष करतो का ? त्याच्याशी बोलताना, त्याला एखाद्या उपक्रमात सामावून घेताना किंवा त्याच्यावर जबाबदारी सोपवताना आपण इतर मुलांइतकाच विश्वास त्याच्यावर दाखवतो का ? पालक, शिक्षक आणि समाज या तिघांसाठीही हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
‘नन्हे दिलं’ चे प्रेरणादायी वैशिष्ट्य रघुनाथच्या स्वप्नांकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात आहे. त्याची गोष्ट आपल्याला आठवण करून देते की समान संधीची सुरुवात प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने, त्याच्या गुणांनी आणि त्याच्या स्वप्नांनी ओळखण्यातून होते.

महावतार नरसिंह नंतर “नन्हे दिल” चा प्रयत्न हाही मोठा आहेच. अशाच अधिकाधिक कलाकृती तीच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पुन्हा पहायला मिळोत हीच शुभेच्छा.

— लेखन : ओमप्रकाश शर्मा. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
