“मध्यमवर्ग”
बँकेत जॉईन झाले तेव्हा ब्रँचमध्ये मुख्यतः दोन वेगवेगळे विभाग होते – एक पैशाची देवाणघेवाण करणारे आणि दुसरा बाकी आकडेमोड करणारे. कॉम्प्युटर वगैरे कोणाच्या स्वप्नातसुद्धा आले नव्हते तेव्हा ! काही वर्षांनी टेलर काउंटर ही संकल्पना पुढे आली !
टेलर काउंटर म्हणजे सात हजार पर्यंत रक्कम असेल तर, खात्यातून वजा करून ती कस्टमरला लगेच द्यायची. कस्टमरने कॅशियरकडे जाण्याची जरूर नाही ! भन्नाट वाटले होते तेव्हा.
कोणताही बदल कधीही सहज स्वीकारला जात नाही.
“नको बाबा कॅशची जोखीम. चुकीने पेमेंट गेले तर… सही आपणच पडताळून बघायची. खात्यात रक्कम आपणच शिल्लक आहे का तपासायचे वर त्या कस्टमरला आपणच पैसे द्यायचे ….” नुसती कुरकुर सुरू झाली.
पण ऐकणार कोण ?
जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचे हेड अचानक एकदा एका कॉर्पेंटरला घेऊन आले. पेंडिंग पासबुकं ठेवायचा ड्रॉवर असायचा काउंटर जवळ. त्याला लॉक आणि की करून घेतले.
“ पासबुकं ढकला खालच्या खणात. हा कॅशचा ड्रॉवर. नंतर करून घेऊ सिग्नेचर कार्डसाठी कॅबिनेट.“
दीडशे पानी लहानसे लांबडे रजिस्टर हातात दिले अन म्हणाले, “नोंद करा ह्यात”
सुरू झाले टेलरचे चार काउंटर. मॅनेजरसाहेब रोजच्यापेक्षा जास्तच रुबाबात चालत आले. चारी ‘ टेलर ‘ कडे असे स्नेहार्द्र नजरेने पाहिले, की त्यांची आम्ही अर्भके , नुकतीच जन्मलेली ! मॅनेजर कॅटेगरीला बदल नेहमीच हवा असतो. कुरकुरतो तो बाकीचा स्टाफ.
नाईक कुरकुरली, “ कसली ती किल्ली. धड लागत पण नाही.”
केदारे म्हणाले, “माझ्या ड्रॉवरची लागते. पण उघडायला चावीची जरूरच नाही जोरात हिसका दिला की, अख्खी कॅश बाहेर !
डॉल म्हणाली, “ भगवान पें भरोसा रखो. “
तिनं मला विचारलं ,” तेरा ड्रॉवर क्या कहता है ? ”
“ मेरा ड्रॉवर डर गया है .“ पडलेल्या चेहऱ्याने मी उत्तर दिलं. माझी बोबडीच वळते अजूनही कॅश म्हटलं की.
मध्यंतरी जोक वाचला होता. त्याचा अर्थ असा की देवाचे नाव फक्त एकशे आठ वेळा घेताना सुद्धा चुकायला होते, हजारो नोटा मोजताना कशा बरोबर मोजल्या जातात ? माझ्या बाबतीत हे लागू नाही. मी देवाचे नाव घेताना आणि नोटा मोजताना दोन्ही बाबतीत सारखीच चुकते !
आता कॅश काऊंटिंग मशीन आली आहेत, ते अगदी बरं झालं. कॅश मोजण्यासाठी मशीन असू शकेल असे सायन्स फिक्शनमध्ये देखील वाचलेले नव्हते, त्या काळातला हा किस्सा आहे.
मी ,केदारे ,नाईक आणि डॉल ! डॉलचे नाव तिच्या गोड,गोऱ्या चेहऱ्यामुळे आणि गुबगुबीत, ठेंगू शरीरयष्टीमुळे पडलेले ! घालायची पण ती घोळदार स्कर्ट. बाहुलीसारखे पिंगट केस होते तिचे.
टेलरना १ ते ४ असे क्रमांक दिले गेले.
लेडीज टेलर , की जेन्टस टेलर , की स्पेशालिस्ट ? काही जण चिडवायला येऊन गेले.
डॉलकडे बोट दाखवत केदारे म्हणाले, “ आम्ही तिघे टेलर. ही एलिझाबेथ टेलर.”
“चूप रे. मै डॉलही ठीक हु.”
थोडे दडपण होते ,अशी थोडी चिडवा चिडवी झाली. रुळलो आम्ही सगळे.
लॉक आणि की वापरत नसू फारसे. एकमेकांना सांगून डबा खायला जायचो. विश्वास होता हा एक मुद्दा. शिवाय एक जण जागेवर नसेल तर तिघांनी मिळून कॅश चोरण्याचा तो जमाना नव्हता.
अशा सरावलेल्या वातावरणात एक लक्षात राहील असा किस्सा घडला एके दिवशी. दहीहंडीचा दिवस होता तो . कस्टमर फारसे फिरकत नाहीत ह्या दहीहंडीच्या गोंधळात. ब्रँचसमोर हंडीची तयारी चालू होती. पाण्याचे फुगे, पिचकाऱ्या, ढाकू माकू – ढाकू माकू आवाज , मुलामाणसांचा गलबला , सर्वांच्या अंगात दहीहंडी भिनलेली होती.
तीन पर्यन्त कस्टमर अवर्स होते. ते संपले की पळायचं असा स्टाफचा पवित्रा होता. चार टेलरपैकी मी आणि नाईक दोघींनी कॅश घेतली. केदारे आणि डॉल दोघांचे कॅश ड्रॉवर रिकामे होते.
मी आणि नाईक दोघी डोंबिवलीहून येत असू. ट्रेनचा गोंधळ असला की आम्ही हजर होईपर्यंत केदारे आणि डॉल काउंटर सांभाळत. मग त्याची परतफेड म्हणा, परिमार्जन म्हणा वेळ प्रसंगी आपसूक असे करत असू. केदारे तर दरवाजातून हलत नव्हते. जणू एखादी मॅच चालू आहे.
डॉल डुलत डुलत जाऊन दहीहंडी बघून येत होती.
“ गिर जाता है रे बच्चा लोग ! धबा sssक .” असे म्हणून तिच्या पुरुषी आवाजात हसत होती.
“डॉल तू दिसतेस बाहुली पण हसलीस की वाटतेस बाहुला ! “ केदारेंचा ठरलेला डायलॉग होताच.

एकदाचे तीन वाजले. हिशोब करून उरलेली कॅश दिली की पळायचे होते. नाईक हेड कॅशियरकडे कॅश घेऊन गेली. माझी कॅश उरली होती तीनशे ! शंभरच्या तीन नोटा.. रजिस्टरमध्ये नोटा बुकमार्क असावे तशा ठेऊन दिल्या. बनवलेली चेकबुके घेऊन मी ती सबमीट करायला गेले.
रजिस्टर पुन्हा हातात घेतले तर ते फुगलेले होते. मी चपापले. पाच आणि दहा रु नोटा. काही एक रु देखील.
मोजून तीनशे रुपये होते मात्र ! डिपार्टमेंटमध्ये डॉलशिवाय कोणीच नव्हते.
“ हे काय डॉल ? माझ्या नोटांना पिल्लं झाली की काय ? आणि त्यांच्या आया कुठे गेल्या ?”
“ मुझे क्या मालूम ?
मैने तो आज कॅश लिया ही नही.”
उरलेली कॅश हँडओव्हर करून नाईक पुन्हा जागेवर आली होती.
“ काय झालं ?” तिला झाला प्रकार सांगितल्यावर ती चकीतच झाली.
“ कसा भरोसा ठेवायचा आपण ? “ तिने अस्सल मालवणीत इरसाल शिव्याच दिल्या.
डॉल आहे त्यापेक्षा गोड चेहरा करून बसली होती. जणू तिला काही ऐकू येतच नव्हते. तणतणतच मी कॅश हँड ओव्हर करायला गेले.
हेड कॅशियर म्हणाले , “ किती चिडशील ?
तीनशे रुपये दिसत आहेत की.”
” म्हणजे ? हे सगळं योग्य आहे ? चोरी नाही ही ? ”
“ चोरी नाही. तुझे काही नुकसान झाले का ? “
“ नुकसान नाही, पण दुसऱ्याच्या ड्रॉवरमध्ये हात घालून नोटा बदलून ठेवणं गुन्हा नाही ?
चोरी नाही तर काय म्हणू मी ? ”
“ सोड गं. डॉल चोरी नाही करणार. ती बऱ्याचदा मला अशा मळक्या सळक्या नोटा देते. आज तिने कॅश घेतलीच नाही. तिला एक्स्चेंज कसे करता येणार ? म्हणून तिनं हा कारभार केलेला दिसतो. तू तिच्याकडून अशी सॉइल्ड करन्सी घेतली असतीस ? “
ते पुढे म्हणाले, ” तिचा नवरा हॉटेलच्या गल्ल्यावर बसतो. गिऱ्हाईकं देतात चिल्लर. तो काय करणार ? मग असे एक्स्चेंज करावे लागतात… आता आवर तुझं. गोपालकृष्णाची पूजा केलीस ना, प्रसाद नाही आणलास तो ?”
त्यांनी विषय बदलला.
कारण काहीही असो डॉलने बिलंदरपणा केला होता. निखालस चुकीचे होते हे. हेड कॅशियरकडून डायरेक्ट एक्स्चेंज करता आले असते की तिला. तक्रार तरी काय करणार ?
मॅनेजमेंटचा ह्या आधी अनुभव आलेला होता. लॉक कसेही असो प्रोव्हाईड केले होतेच. ते लावले का नाही ? असा तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होईल, एवढेच.
शिवाय त्यांच्या दृष्टीने अशा घटना बारीकसारीक असतात. मुळातच त्यांना न्याय -अन्याय, वर्तणूक ह्याचे फारसे देणेघेणे नसते.
दुसऱ्या दिवशी कामाची वाटणी करताना सरळ सरळ माझ्या समोर ढीग आणून ठेवला गेला, दस्तुरखुद मॅनेजर स्वतः येऊन सांगून गेले,
“ आज पुरे झाले पाहिजे. माहीत आहे तुला एंट्रीज जास्त आहेत. पण भावंडांपैकी मोठ्या किंवा समजूतदार मुलाला आई जबाबदारी जास्त देते की नाही ? तसं समज. “
मॅनेजमेंटची पॉलिसीच असते अशी. त्यांना रथ पुढे ढकलायचा असतो. काही जण नुसतेच हे sss असा आवाज काढून ढकलायचे नाटक करत असतात.
दीड शहाणे सुटतात. मंद असतात त्यांना कोणी जमेस धरत नसते. ऑफिसमध्ये देखील मध्यमवर्ग असतो, नेटाने संसाररथ चालवणारा, तोच इथे जास्त ताकद लावतो. शहाणा,समजूतदार, बिन तक्रार काम करणारा एम्प्लॉयी असतो तो. त्याला शब्दाचा मार द्यायचीसुद्धा गरज नसते.
नंतर एवढे मात्र केले, लॉक आणि की आम्ही दुरुस्त करून घेतले. एक स्वस्तात धडा मिळाला होता.
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे .
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
