“हरभरा सँडविच”
आता बरेच लोक आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक होत आहेत. त्यांना सकाळी किंवा मधल्यावेळी हेल्दी नाश्ता लागतो. अशावेळी सर्व महिलावर्गाला पडणारा यक्षप्रश्न म्हणजे असा पदार्थ असायला हवा की जो तेलकट,तुपकट नसेल, खूप मसालेदार तर नसावा पण टेस्टी पण असला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच आणि दिसायला तर इतका आकर्षक पाहिजे की पाहूनच त्या डिशच्या कुणीही मोहात पडले पाहिजे.
भूक नाही.. नको.. म्हणणाऱ्या मुलांनी सुद्धा हा नाश्ता पाहताच टुणकन उडी मारून ताव मारला पाहिजे. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हे बनवायला जास्त वेळ किंवा कष्ट लागता कामा नयेत. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलाना तरी खरंच हा मोठा टास्कच असतो. पण आता काळजी करण्याची मुळीच गरज नाही. अशी बहुगुणी सर्व अटी पूर्ण करणारी सुरेख डिश बनवूया. उत्सुकता वाटतेय ना.. मग वाट कशाची पाहताय.. चला लगेंच..
साहित्य :
1 शक्यतो गव्हाचा सॅन्डविच ब्रेड, प्रत्येक भाजी 1 वाटी. एकदम बारीक चिरलेला कोबी, गाजर, काकडी, सिमलामिरची, अर्धी वाटी कांद्याची पात, कोथिंबीर आणि 1 चमचा किंचित आले + 6..7 लसूण पाकळ्या + 3..4 हिरव्या मिरच्या + आवडत असल्यास 3..4 पुदिन्याची पाने + आणि पाव वाटी कोथिंबीर + अर्धी वाटी कांद्याची पात + अर्धी वाटी मेयोनीज + अर्धी वाटी चीज स्प्रेड + 1 अक्रोड + 4 बदाम यांची एकदम बारीक वाटून घेतलेली पेस्ट, आवडीनुसार खिसलेले चीज,चवीनुसार मिठ, पाव चमचा मिक्स हर्बज, बटर, सजावटीसाठी एकदम पातळ व लांब लांब काकडी, गाजर यांचे काप, कांद्याच्या पातीचे एकसारखे लांब लांब तुकडे.

कृती :
सर्व कट केलेल्या भाज्या एका बाऊलमध्ये घ्याव्यात. काकडीला पाणी खूप सुटते म्हणून आधी किंचीत मिठ लावून पाणी काढून घ्यावे. हे पाणी हिंग, जिरपूड घालून थंडगार बर्फ घालून पिण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि आरोग्यदायक असते त्यामुळे ते वाया घालवू नये. आता भाज्यात चवीनुसार मिठ, मिक्स हर्बज, घालून थोडेसे मेयोनीज,चीज घालून मस्त मिक्स करावे. आणि स्टफींग बनवावे. आता आपले हिरवेगार स्प्रेड सुद्धा तयार केलेले.. मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेच.
नंतर ब्रेडच्या कडा काढून ब्रेडला छान बटर लावून घ्यावे म्हणजे भाज्यांचे स्टफींग थोडेसे ओलसर असले तरी बटर मुळे ब्रेड भिजकट होत नाही. मग एका ट्रे मध्ये ओळीने ब्रेडचे स्लाईस लावावेत त्यावर स्टफींगचा थर द्यावा. मग पुन्हा त्यावर ब्रेडचे स्लाइस ठेवून त्यावर स्प्रेड चा पातळ थर द्यावा. मग पुन्हा एकदा ब्रेडचा थर देऊन त्यावर शिल्लक भाज्याचे स्टफींग छान पसरून पुन्हा आवडीनुसार चीज खिसून घालावे व वरून पुन्हा शेवटचा ब्रेडचा थर द्यावा व त्यावरून सर्व बाजूंनी स्प्रेड पसरून केक प्रमाणे झाकून टाकावे. आता याच्या चारही बाजूंनी (वेळ, पार्टी वगैरे साठी बनवायचे असल्यास) कुंपणाप्रमाणे हिरवीगार् उभी कांद्याची पात लावावी. सँडविचवर काकडी व गाजराच्या पातळ कापाचे रोल्स करून कळ्याप्रमाने सजावट करावी. मग सर्व्ह करताना या सॅन्डविचचे स्लाईस कट करून द्यावेत.
वैशिष्टय :
सकाळी झटपट सँडविच बनवायची असतील तर रात्री भाज्या चिरून एकत्र करून ठेवाव्यात. ब्रेडच्या पण कडा काढून डब्यात झाकून ठेवावा. म्हणजे सकाळच्या घाईचा वेळ वाचतो. बाकी सगळे झटपट बनवता येते. सजावट एरवी सिम्पल चीज खिसून त्यावर चेरी किंवा ड्रायफ्रुट्सचे काप घालून जमेल तशी, केली तरी चालते. हे सँडविच अक्रोड,काजू,चीज आणि कच्च्या भाज्या यांच्यामुळे हेल्दी आणि पोटभरीचे होते. दिसायला तर इतके आकर्षक, मोहक आणि हटके आहे की पाहूनच खाण्याचा मोह आवरता येणार नाही. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यन्त सगळेच आवडीने याचा आस्वाद घेऊ शकतात.

— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
