Homeकलाअमेरिका : असे रंगले बीएमएम संमेलन

अमेरिका : असे रंगले बीएमएम संमेलन

अमेरिकेतील बीएमएम म्हणजेच अमेरिकेतील मराठी मंडळींचे स्नेहसंमेलन याबद्दल भारतात असतांना अनेक वेळा ऐकले होते आणि त्याबद्दल खूप उत्सुकताही होती. २ वर्षांपूर्वी सॅनहोजे इथे झालेल्या “काय बे” ह्या स्नेहसंमेलनाला जायचा योग आला आणि हे भव्य स्नेहसंमेलन याची देहा, याची डोळा पाहून धन्य झाल्यासारखे वाटले. त्यावेळी ही मी या संमेलनाचे वृत्तांत www.newsstorytoday.com या पोर्टलसाठी लिहिले होते आणि आता पुन्हा लिहिते आहे याचा मला आनंद होतो.

यावर्षी सियाटल येथे हे स्नेह संमेलन ६ ॲागस्ट ते ९ ॲागस्ट होते. “जपूया संस्कृती विणूया नाती“ अशी सुंदर टॅग लाईन असलेला आणि शिल्पा कर्वे हिने तयार केलेला, स्पर्धेतील पहिल्या नंबरचा सुंदर लोगो पाहूनच हा मराठी संस्कृतीचा अनोखा उत्सव आहे ह्याची खात्री होती आणि खरोखर तसेच हे चार दिवसांचे हे संमेलन, एका नव्या उंचीवर होते.

यावेळी अनेक ऐतिहासिक उपक्रम प्रथमच झाले. उदा. उत्तर अमेरिका आणि भारतातील ४०० पेक्षा जास्त कलाकार ह्यात सहभागी झाले होते. फोक आख्ख्यान मध्ये ३७ कलाकार, ५०० किलो वजनांची त्यांची लोकल, पारंपारिक वाद्यं घेऊन आली होती .त्यांनी अतिशय जोशपूर्ण आवाजात आपल्या परंपरेची ओळख करून दिली. ५ नाटकं, ५ एकांकिका, शास्त्रीय नृत्य ह्यांनी कसलेल्या मराठी नटांचा उत्तम अभिनय आणि शास्त्रीय नृत्यातून साकारलेले कल्पक नाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. वाद्यवृंद, रेडिओ मैत्री, अशा कार्यक्रमांनी प्रेक्षकांना डोलायला लावले. आरती अंकलीकर, प्रशांत दामले, ऋषिकेश रानडे, सलील आणि शुभंकर कुलकर्णी ह्यांच्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रथमच १४ कर्तत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. त्यांची भाषणं प्रेरणादायी ठरली. अभिजात मराठीचा प्रथमच विशेष उत्सव झाला. अतिशय अभ्यासपूर्वक माहिती निवडून मराठीचा सुरवातीपासूनचा प्रवास उत्तमरित्या प्रेक्षकां समोर आला.

उत्तर अमेरिकेतली पहिली ज्युरी आधारित कला स्पर्धा, सामुदायिक वैयक्तिक गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीमुळे प्रेक्षक उत्सुकतेने खुर्चीला खिळून होते. यावेळी प्रथमच अधिवेशनातील प्रत्येक प्रमुख सभागृहाला एका दिवंगत प्रसिध्द मराठी महिलेचे नांव देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. ही कल्पना सर्वांनाच आवडली.

२०२६ च्या या अधिवेशनात प्रथमच अधिवेशनाच्या शुभंकरची (moscot) संकल्पना पुढे आली. रेनियर राणी नवतंत्रज्ञान आणि आपली मराठमोळी संस्कृती यांचे प्रतीक असून ती अधिवेशनाच्या ‘स्त्रीत्वाचा सन्मान’ या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते.

कॅलिफोर्नियाच्या महिला कलाकारांनी सादर केलेल्या खुसखुशीत ‘मराठी स्टँड-अप कॉमेडी’ला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता; त्यातच बे एरिया महाराष्ट्र मंडळाने ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकाद्वारे कीर्तन शैलीच्या आधुनिकतेवर एक सुंदर आणि विचार करायला लावणारा संदेश दिला. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच उपस्थितांनी मालवणी प्रॉन्स करी-सोलकढी, खानदेशी चिकन, श्रीखंड-पुरी, रबडी बासुंदी, पावभाजी, पुरणपोळी आणि नागपुरी संत्रा बर्फी अशा अस्सल महाराष्ट्रीयन मेजवानीचा यथेच्छ आस्वाद घेतला.

याशिवाय, एक्झिबिशन हॉलमध्ये शिक्षण, रिअल इस्टेट, सेंद्रिय खाद्यपदार्थ, कपडे, कलाकुसर आणि पर्यटन क्षेत्रातील विविध स्टॉल्स उपस्थितांचे खास आकर्षण ठरले.

यावेळी अमेरिकन सरकारकडून बीएमएमचा विशेष गौरव करण्यात आला.

थोडक्यात सांगायचे तर हे अधिवेशन साहित्यिक, सांस्कृतिक आणि इतरही काही प्रकारांच्या देवाण घेवाणीचे केंद्र ठरल !

— लेखिका : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर