परदेशी व्यक्तिंना नागरिकत्व न देणारे जे काही देश आहेत, त्यातील एक देश म्हणजे “भुतान”! भुतान वर खरे म्हणजे लेखमाला लिहिली पाहिजे, इतका हा विषय मोठा आहे. पण तूर्तास भूतानची सखोल ओळख करून देत आहेत, अभ्यासक श्री सुधीर सेवेकर.
– संपादक
भूतान बाबत लिहिताना बहुतांश लोक तेथील निसर्ग सौंदर्य, वनराई, स्वच्छ हवा, निर्मळ पाण्याचे खळाळते झरे आणि धबधबे अशा उत्तम नैसर्गिक सौंदर्य अशा बाबींवरच प्रामुख्याने लिहितात. मी या देशाला दोनदा भेटी दिल्या असून या देशाचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच मला जाणवले ते शीर्षक मी या लेखाला दिले,” भूतान:स्वत्व जपणारा देश ! “
भूतान आपला मित्र देश आहे. भूतान मधील व्यापार, आर्थिक व्यवहार, सांस्कृतिक, राजकीय संबंध हे सगळे कित्येक शतकांपासून आपल्या देशाशी जोडलेले आहेत. जगातला हा एक छोटासा देश, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर एवढे आहे. परंतु लोकसंख्या मात्र जेमतेम आठ लाखाच्या घरात आहे. तरीही हा एक स्वतंत्र, स्वायत्त आणि आनंदी देश आहे.
भूतानला समुद्रकिनारा नाही. अशा देशांना इंग्रजीमध्ये’ लँड लॉक’ असे संबोधले जाते. त्यामुळे सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार ऊदिनमासाठी या देशाला भारतावरच अवलंबून राहावे लागते. इतकेच नव्हे तर भारत – भूतान यांच्यात वेळोवेळी झालेल्या मैत्री संधीनुसार भुतानची जी सीमा चीन देशाला लागून आहे त्या सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारीही भारतीय लष्कराकडेच आहे. भारतीय लष्कराने महत्त्वाच्या ठिकाणी, सीमेवर सर्वत्र उत्तम बंदोबस्त ठेवून चीन पासून भूतानचे संरक्षण करण्याची तजवीज केलेली आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या तोफा, रणगाडे, लष्करी ठाणे नेमलेली आहेत.
चीन हा देश भूतान या देशाशी मैत्री करण्यास गेले कित्येक दशके उत्सुक आहे . त्यासाठी तो भरघोस आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्यासही उत्सुक आहे. परंतु चिनी लोकांची आणि राज्यकर्त्यांची साम्राज्यवादी वृत्ती म्हणजे दुसऱ्यांचा प्रदेश बळकावण्याची वृत्ती याची भूतानच्या राज्यकर्त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी चीनला आर्थिक व अन्य कुठल्याही क्षेत्रात भूतान मध्ये घुसखोरी करू दिलेली नाही. हे भूतांनचे राज्यकर्ते यांच्या राजकीय परिपक्वतेचे एक लक्षण आहे .
भूतानला मी स्वत्व जपणारा देश असे मुद्दामच म्हटले आहे. कारण तिथे फिरताना भूतानी लोकांची त्यांच्या राजा प्रति असलेली श्रद्धा आणि अभिमान क्षणोक्षणी जाणवत असतो. भूतान मध्ये लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यानुसार तिथे निवडून आलेला पंतप्रधान, मंत्री मंडळ अशी रचना आहे हे खरे. परंतु तरीही भूतानी प्रजेसाठी त्यांचा राजा आणि त्यांचे’ वांगचुक’ हे घराणे नेहमीच वंदनीय ठरत आलेले आहे. गौतम बुद्ध, गुरु पदम संभव या बौद्ध धर्मीय वंदनीय गुरु नंतर भुतानी प्रजा जर कुणाला देव मानत असेल तर ते हे वांगचुक राजघराणे आहे.

राजघराणे म्हटल्यानंतर आपल्याला अत्यंत भव्य अशा राजप्रसादात किंवा राजवाड्यात, चैन विलासाचे जीवन जगणारे कुटुंब समोर येते. मात्र वांगचूक घराणे अजिबात तसे नाही. ते सर्वसामान्य भूतानी प्रजेप्रमाणेच राहते, जगते. त्यांच्याकडे टोलेजंग राजवाडे नाहीत किंवा कुठल्याही ऐशोआरामाची ओढ त्यांना नाही. सर्वसामान्य भूतानी प्रजेशी अत्यंत जवळून जुळून घेतलेले हे घराणे आहे. गेली काही शतके भूतानचे राजे असले तरी सर्वसामान्यांना त्यांच्याविषयी नेहमीच आस्था आणि श्रद्धा वाटत आलेली आहे.
भूतानला स्वत्व जपणाऱ्या देश असे म्हणण्याचे कारण भूतानी लोक त्यांचा पारंपारिक पोशाख, अन्नपद्धती, जीवनपद्धती , उपासना पद्धती या सर्वांना जपणारे आहे. त्यांच्या पारंपारिक पोशाखामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी राजकीय संमेलने किंवा बैठका यामध्ये भूतानचे प्रतिनिधी तात्काळ उठून दिसतात आणि ओळखू येतात. अत्यंत मर्यादित लोकसंख्या आणि निसर्गप्रेम यामुळे भूतान हा भौगोलिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून” झिरो कार्बन कंट्री” म्हणून ओळखला जातो. म्हणजे या देशाच्या हवेत कर्ब वायू नगण्य आहे. म्हणूनच येथील हवा शुद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या डोंगर पर्वतांच्या या छोट्याशा देशात पर्वत शिखरावरून वाहत देणारे झरे, ओहोळ, पाण्याचे प्रवाह अनेक दिसतात. त्याच्याच पुढे नद्या होतात. पारू, थीमपू ही जशी भूतान मधील प्रमुख शहरे आहेत, तसेच तेथील दोन या प्रमुख नद्याही आहेत. या नद्यांमध्ये नागरी वस्तीतील किंवा कुठल्याही मानवी वस्तीतील सांडपाणी सोडले जात नाही .काही ठिकाणी ते सोडले जाते, त्यापूर्वी त्यावर पुरेशी प्रक्रिया करून त्यातील घातक प्रदूषित घटक वेगळे केले जातात. त्यामुळेच भूतान मधील सर्वच नद्या ,ओहोळ ,पाणी प्रवाह हे शुद्ध आहेत. उंचावरून येणाऱ्या या पाणी प्रवाहावरच भूतानने अनेक ठिकाणी भारताच्या तांत्रिक मदतीने वीज निर्मिती केंद्रे उभारलेली आहेत. ही हायड्रो पॉवर केंद्रे हे भूतानचे एक वैशिष्ट्य आणि बलस्थानही आहे. ही अतिरिक्त हायड्रो पॉवर म्हणजे जलविद्युत भूतान भारताला विकते ज्यातून भूतानला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चांगले उत्पन्न मिळते. हायड्रो पॉवर स्टेशन्स उभारण्यासाठी भारताने भूतानला वेळोवेळी मोठी तांत्रिक व अभियांत्रिकी मदत केलेली आहे.

भूतानने त्यांची वनसंपदा नैसर्गिकरित्या वाढू दिलेली आहे. आणि तिचे जतनही केलेले आहे. वनसंपदेमध्ये ज्या वनसंपदेस भरपूर व्यापारी मूल्य मिळते अशाच वृक्षांची लागवड करण्याचा मोह भूतानने टाळलेला आहे. एकाच प्रकारच्या वृक्षांची लागवड मोठ्या क्षेत्रावर करणे याला वनखात्याच्या परिभाषेत” मोनो कल्चर “असे म्हणतात. त्यातून उत्पन्न मिळते हे खरे, परंतु नैसर्गिक विविधता ,नैसर्गिक संतुलन मात्र बिघडते याची भूतानला पूर्ण कल्पना आहे. म्हणून त्यांनी व्यापारी उत्पन्नासाठी मोनो कल्चरचा मोह टाळलेला आहे. म्हणूनच भूतानच्या जंगलात आणि वनसंपदेत नाना प्रकारच्या वृक्षवेली, वनस्पती, यांचे फार मोठे वैविध्य आढळते.
केवळ भूतान प्रदेशातच आढळणारा” ताकीन” नामक एक चतुष्पाद प्राणी हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. हा प्राणी दिसायला बकरी आणि बैल यांच्या संमिश्र स्वरूपा सारखा दिसतो. जगाच्या पाठीवर तो इतरत्र आढळत नसावा. म्हणून त्याच्या संवर्धनासाठी भुतानने स्वतंत्र अभयारण्य उभारलेले आहे. वनसंपदा सतत जपली आहे आणि म्हणून या जंगलात नाना प्रकारचे तृणजीवी व अन्य वन्य प्राणी, नाना प्रकारची माकडे, सरपटणारे जीव ,पक्षी असे वैविध्य आढळते .
हायड्रो पावर नंतर भुतानच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा महत्त्वाचा पैलू पर्यटन आहे .या पर्यटनामध्ये प्रामुख्याने भारतीय पर्यटकांचा समावेश असतो. पूर्वी पासूनच भूतान मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी भूतान सरकारद्वारे पर्यावरण संवर्धन कर लावला जातो. पूर्वी तो कमी असे परंतु आता दर दिवशी दर पर्यटकामागे सुमारे 1200 रुपये असा हा पर्यावरण संवर्धन कर पर्यटकांना भरावा लागतो. त्यातून उभा राहिलेला पैसा पर्यावरण संरक्षण, आणि विकास कामासाठीच वापरला जातो. पर्यटन वाढावे म्हणून भूतानने अत्याधुनिक सेवा सुविधा आणि चैन विलासाची साधने उदाहरणार्थ कॅसिनोज, नाईट क्लब, डान्स बार, दारूचे बार, इत्यादींची कास भरलेली नाही हे इथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
मग पर्यटकांनी भूतान मध्ये काय पाहायचे ? तर भुतानची स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, हिरवीगार वनश्री हे पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्या जोडीलाच बौद्ध मठ, बौद्ध मंदिरे ,बौद्ध वसतीगृह आणि बाग बगीचे पाहण्यासारखी आहेत. भूतान मध्ये बौद्ध धर्म गेल्या सुमारे हजार वर्षांपूर्वीच आला. तत्पूर्वी या प्रदेशात बोनिजम नामक एक धर्म अस्तित्वात होता .त्या धर्मात पशु हत्या, हिंसाचार यांना स्थान होते. जे भूतानवासीयांसाठी कमालीचे उद्वेग जनक होते आणि म्हणून ते दुसऱ्या स्वच्छ साध्या आणि भूतदयायुक्त धर्माची वाट पाहत होते. गुरु पदम संभव या बौद्ध गुरुने भूतानमध्ये बौद्ध धर्म आणला आणि तो झपाट्याने रुजलाही. बौद्ध धर्मीयांमध्ये जे तीन ठळक पंथ आहेत त्यापैकी भूतान देश हा वज्रयान पंथीय बौद्ध देश आहे. बौद्ध धर्म जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये आहे त्यापैकी वज्रयान पंथीय उपासना पद्धती, पूजा पद्धती, भूतानमध्ये पाळली जाते. आणि अर्थातच बौद्ध धर्माचे मूळ तत्वज्ञान म्हणजे विरक्ती, भूतदया, माणुसकी, क्षमा , शांती हे पण वज्रयान पंथात आहेत.
भूतान मध्ये फिरताना आणि त्यांच्या नागमोडी घाटातून प्रवास करताना अनेक ठिकाणी आपल्याला काठ्यांवर विविध रंगांचे आणि आकारांचे ध्वज दिसतात. ते काय आहेत ? तर एका भूतानवासीयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना” प्रेयर फ्लॅग” अर्थात प्रार्थना ध्वज असे म्हटले जाते. ते विविध रंगांचे असतात .प्रत्येक रंगाची काही एक भावना किंवा अर्थ आहे. उदाहरणार्थ पांढऱ्या रंगाचा ध्वज असेल तर तो शांती पसरविण्यासाठी उभारण्यात येतो. असे प्रत्येक रंगांचे अर्थ आहेत आणि त्यानुसार ते ध्वज ठीक ठिकाणी हवेत फडकताना दिसतात.
भूतान वासी बौद्ध धर्मीय आचारसंहितेचे आणि जीवनशैलीचे मनापासून अनुकरण करतात. आणि बौद्ध तत्त्वज्ञानाने घालून दिलेली समाधानाची शिकवण आणि लालसा , हव्यास यांचा त्याग यामुळे भूतान मध्ये आपल्याला चंगळवादी लोक आढळत नाहीत. म्हणूनच संख्येने कमी असले तरी येथील लोक आनंदी असतात. त्यांच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल प्रेम असते. कुठलीही ईर्षा, द्वेष, मत्सर अशा नकारार्थी भावना नसतात. या देशाने विकासाबाबत लोकप्रिय केलेली ” हॅपिनेस इंडेक्स” ही संकल्पना जगाने ही मान्य केलेली आहे. सर्वसाधारणपणे विकासाचे निकष हे दरडोई उत्पन्न, दर कुटुंबात वापरली जाणारी सुख साधने, मोटार गाड्या, विजेचा वापर अशा विविध पद्धतीचे असतात .परंतु भूतानवासीय मात्र समाधान या निकशाला प्राधान्य देतो. नॅशनल हॅपिनेस इंडेक्स म्हणून आज ही संकल्पना जगभर प्रसिद्ध आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येवरही भूतांनचे निर्बंध आहेत .विशिष्ट संख्येपलीकडे ते जादा पर्यटक आपल्या देशात येऊ देत नाहीत. जंगल कटाई करून टोलेजंग इमारती बांधणे किंवा चैन विलासाच्या सोयी निर्माण करणे यावरही भूतान सरकारचे जागरूकतेने लक्ष असते. त्यामुळेच ज्यांना नाईट लाईफ वगैरे चा आनंद घ्यायचा आहे त्यांनी भूतानला येऊ नये. परंतु साधी राहणी ,नैसर्गिक राहणी आणि निसर्गसंपदेचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी मात्र भूतान हे एक उत्तम केंद्र आहे.

— लेखन : सुधीर सेवेकर. छत्रपती संभाजीनगर
— छायाचित्रण आणि संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

भुतान बद्दल खूप छान माहिती मिळाली.
छायाचित्रांमुळे अधिक आकर्षकता आली. धन्यवाद!
सुधीर सेवेकर आपण भूतान बद्दल अतिशय सुंदर माहिती दिलीत!
भूतान बद्दल बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या.