आपल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टलवर नियमितपणे लेखन करणारे कवी – लेखक सुनिल शरद चिटणीस यांना शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे दिला जाणारा यंदाचा “पुस्तक रत्न” हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पुणे येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय शुभंकरोती साहित्य संमेलनात मा. माया यावलकर मुख्य प्रशासिका, मा. सोनाली जगताप संस्थापिका, प्रमुख पाहुणे साहित्य संपदा संस्थापक, कवी मा. वैभव धनावडे, उद्योजक व जेष्ठ साहित्यिक मा. राजीव श्रीखंडे यांचे उपस्थितीत तथा संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध जेष्ठ गझलकार मा. ए के शेख व गझलकारा / समाजसेविका मा. ममता सिंधुताई सपकाळ यांचे शुभहस्ते सुनील चिटणीस यांना प्रदान करण्यात आला.
या साहित्य संमेलनाला साहित्यसंपदा संस्थेचे कवी – लेखक, गझलकारा तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले अनेक कवी, लेखकही सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. शिल्पा चऱ्हाटे यांनी केले. साहित्य संमेलन उत्तम संपन्न झाले.
सुनिल चिटणीस यांच्या “वाचकांच्या भेटीला” या ललित लेख संग्रह पुस्तकाला शुभंकरोती पुस्तक रत्न हा पुरस्कार श्रीराम नवमी म्हणजेच रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी बहाल करण्यात आला.

यावेळी श्री वैभव धनावडे यांनी पुस्तक प्रकाशनात भेडसावणाऱ्या अडचणी अन त्यावर मार्ग कसा काढावा यावर उब्दोधक भाष्य केले. गझलकार मा. ए के शेख व गझलकारा ममताताई सपकाळ यांच्या प्रकट मुलाखती हे या संमेलनाचे वैशिष्ठ होते. दोन्ही मुलाखती रंगतदार झाल्या. रसिक प्रेक्षकांनी उर्स्फुत दाद दिली.

साहित्यसंपदा या गृपचे काही कवी लेखक सदस्य या साहित्य संमेलनात सहभागी झाले होते.
अल्प परिचय
सुनिल चिटणीस यांनी पाच सहा वर्षांपुर्वी त्यांच्या लेखन कार्यास सुरवात केली अन अल्पावधीतच ‘पिंपळपान व पापणपंखी‘ हे दोन काव्य संग्रह तसेच ‘सप्तरंग, झुळूक, वाटचाल, वाचकांच्या भेटीला ‘ हे चार ललित लेख संग्रह अशी एकूण सहा पुस्तके या पुर्वीच प्रकाशित झाली आहेत. यावरूनच त्यांनी थोडक्या काळात साहित्य क्षेत्रात चांगली भरारी मारल्याचे दिसून येते. साहित्यसंपदा प्रकाशन संस्थेने चिटणीसांचे ‘वाचकांच्या भेटीला’ हे पुस्तक शुभंकरोती साहित्य परिवाराकडे पाठवले व ‘पुस्तक रत्न’ या पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड झाली म्हणून कौतुक. पुस्तकाच्या माध्यमातून मानवी भावनांचे सुंदर चित्रिकरण त्यांनी केले आहे व जीवनाच्या विविध विषयांवर भाष्य करून संवेदनशील मनाचे हुबेहुब प्रतिबिंब त्यांनी रेखाटले आहे, असा खास उल्लेख करून शुभंकरोती साहित्य परिवाराने त्यांना ‘पुस्तक रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
जीवनात संकटांची वादळं झेलल्याशिवाय सुखाचा गारवा कळत नाही या उक्ती प्रमाणे पत्निच्या अकाली निधनामुळे त्यांच्या जीवनात दुःखाची वादळं वावटळीसारखी आली होती, त्या वादळातून बाहेर पडायला हृदयस्थ सदगुरुंच्या आशिर्वादाने त्यांनी लेखणी हाती घेऊन अनेक वेगवेगळ्या विषयांवर समर्पक, साहित्यिक दर्जा असणारे लेखन सुरू केले अन त्यातूनच आनंदमय सुखाचा गारवा त्यांना लाभला. अन आता तर त्यांना ‘पुस्तक रत्न’ हा किताब बहाल करणेत आला आहे ही त्यांच्या लेखनाला मिळालेली पोचपावतीच आहे अन हे खरोखर कौतुकास्पदच आहे.
‘शब्द दरवळ’ हा त्यांचा पुढील ललित लेख संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कवी – लेखक सुनिल चिटणीस यांचे, ‘न्यूज स्टोरी टुडे’ पोर्टल परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800