Homeलेखताटी उघडा ज्ञानेश्वरा : ९

ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ९

ब्रह्मपदाची पायरी

अथांग ब्रह्मांड… त्यामध्ये पसरलेले कोट्यवधी आकाशगंगा समूह (सुपरक्लस्टर्स)… त्यातील एका छोट्या समूहात (लोकल ग्रुप) वसलेली आपली मंदाकिनी आकाशगंगा… त्यामधील एक सूर्यमाला… त्यात एक ग्रह (पृथ्वी)… त्या पृथ्वीच्या केवळ २९ टक्के भूभागाचे सात तुकडे (खंड)… त्यातील एका खंडावर वसलेला आपला एक देश… त्यातले एक छोटे राज्य, गाव… त्या गावातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात उभे आपण. आणि तरीही आपल्याला वाटते ‘मी’ म्हणजे कुणीतरी महान! अरे, कसे शक्य आहे हे?

ब्रह्म जैसे तैशापरी । आम्हा वेढिले भूती चारी ।

या पंचमहाभूतांच्या पसाऱ्यातील अनेक ठिपक्यांपैकी आपण एक आहोत… एका कणाने दुसऱ्या कणाला हिणवण्यात काय हशील? मी शून्य, तू शून्य… इथूनच सुरू व्हायचे आणि इथेच मिटायचे; मग कसले आलेत राग-लोभ? इथे सगळे आपल्यासारखेच तर आहेत… फक्त त्यांना आपले म्हणण्याइतका मोठेपणा आपल्या अंगी बाणवायला हवा. कारण एकदा आपले म्हटले की संघर्षाचे कारणच उरत नाही.

हात आपला आपणा लागे । त्याचा करू नये राग ॥
जीभ दाताने चाविली । कोणे बत्तीशी पाडिली ॥

आपल्या हातून काही चूक झाली, तर आपण स्वतःला माफ करतोच ना! ती चूक सुधारून पुढे जातो; इतरांच्या बाबतीतसुद्धा आपल्याला हेच करायचे आहे. कुणी आपल्याला त्रास दिला म्हणून त्यांच्याशी भांडत बसण्यात अर्थ नाही. त्यांचे कर्म त्यांच्यापाशी. आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला, ही स्वतःची चूक मान्य करायची आणि स्वतःला सावरून पुढे निघायचे. बस्स, इतकेच! अर्थात, हे बोलायला जितके सोपे तेवढेच आचरणात आणणे कठीण; पण प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे.

थोडे दुखावले मन । पुढे उदंड साहाणे ॥

एकदा मन दुखावले म्हणून मनात आढी ठेवून बसलो, तर पुढे सगळे जगणेच कठीण होऊन बसते. मुक्त विचार करण्याची आपली क्षमताच कुंठित होते. जखमी शरीर असो की मन, वेळीच उपचार केले नाहीत तर जखम चिघळते, आपल्यालाच विषाक्त (विषारी) करते, कणाकणाने संपवते. म्हणून मन घट्ट करून त्यावर शल्यक्रिया करायलाच हवी. सुई टोचेल, पण वेळीच टाके घालून घेणेच श्रेयस्कर असते. म्हणूनच तर मुक्ताई म्हणतात –

चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदी नाचे ॥

वेळप्रसंगी महादेवांनासुद्धा हलाहल पचवावे लागले, आपण कोण? समोरच्या परिस्थितीला निर्भीडपणे सामोरे जाणे, हेच आपले नियत कर्म. त्यापुढे फार विचार करायचा नाही. मनातील राग, भीती, चिंता सगळे सगळे सोडून द्यायचे. एकदा का ही अडगळ झाडून टाकली, तर नवी उमेद साठवायला भरपूर अवकाश मिळेल. उगाच आपल्या मनाचा कबाडखाना करायचा नाही. अनेक भावना आपल्याला खुणावतील, अडवतील; पण आपण निग्रहाने विवेकाचा मार्ग धरायचा.

मन मारुनि मंथन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

भावनांच्या ओझ्याने स्वतःलाच गुदमरून टाकण्यापेक्षा बुद्धीच्या मार्गाने पुढे जायचे; उजेडाची नवी दिशा आपसूकच सापडेल. अथांग ब्रह्मांडाचे खऱ्या अर्थाने पाईक होण्याची… आपल्यातील ब्रह्मत्व जागवण्याची तीच पहिली पायरी असेल!
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments